दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपले सण – उत्सव हे शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी असतात. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपल्याकडील पंचांगात चांद्र आणि सौरपद्धतीचा मेळ घातलेला असतो. श्रावण महिन्यात चिक्कार पाऊस पडत असतो. हलका आहार घेतला तरच शरीराचे आरोग्य चांगले राहते म्हणून श्रावण महिन्यांत उपवास करण्यास सांगण्यात आले आहे. (Diwali 2023)
दिवाळी सारखा सण थंडीमध्ये येतो . थंडीमध्ये भूक जास्त लागते. शरीराला तेल-तुपाची आवश्यकता असते. म्हणून दिवाळीचा सण थंडीमध्ये येतो. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला की शरीराचे आरोग्य चांगले राहते. उत्सवाच्यानिमित्ताने आप्तेष्ट , मित्रमंडळी एकत्र येतात. एकत्र येण्याने मनाला आनंद प्राप्त होतो. उत्सव साजरा करीत असतांना माणसे दैनंदिन जीवनातील चिंता, दु:ख विसरून जातात. गावातील उत्सवात तर संपूर्ण गावातील माणसे एकत्र येतात म्हणून उत्सव हे मनाचे आरोग्य राखण्यात मदत करीत असतात.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आश्विन महिन्यात शेतातील धान्य घरात आलेले असते. घरे समृद्ध झालेली असतात. म्हणून दीपावलीचा आनंददायी सण आश्विन महिन्याच्या अखेरीस येत असतो. दरवर्षी दिवाळीचा सण आपण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत असतो. परंतु दिवाळीच्या सणातील प्रत्येक दिवसाचे पारंपारिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आपणास माहीत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच ! नव्या पिढीतील मुले फार हुशार आहेत. ती आपल्या पालकांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाबद्दल नक्कीच प्रश्न विचारीत असतात.
‘हे’ आहे वसूबारसचे महत्व
आश्विन महिन्याला ‘ आश्विन ‘ का म्हणतात याला वैज्ञानिक कारण आहे. कारण या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी अश्विनी नक्षत्र पूर्वेला उगवून , रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र अश्विनी नक्षत्रात असतो. म्हणून या महिन्याला ‘ आश्विन ‘ असे नाव देण्यात आले आहे. आश्विन कृष्ण द्वादशीला ‘ वसुबारस- गोवत्स द्वादशी ‘ म्हणतात. ही द्वादशी प्रदोषकाल व्यापिनी हवी. प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने गोवत्सद्वादशी, वसूबारस आहे.
गोवत्स द्वादशी – वसुबारस या दिवशी एकभुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी गाईची वासरासह पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. गाय- वासराची पूजा करून त्यांना गोड जेवण देण्याची पद्धत आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. गाईचा दूधासाठी आणि बैलांचा शेतीकामासाठी उपयोग होत असतो. ‘ गाई, बैल, वासरे यांची नीट काळजी घ्या ‘ असाही संदेश वसुबारस या सणाद्वारे दिलेला असतो.
गाय-वासराची पूजा करून तिच्यापाशी प्रार्थना करतात—-
तत: सर्वमये देवि सर्वदेवैरलड्.कृते ।
मातर्मममाभिलषितं सफलं कुरु नन्दिनि ॥
——“ हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. “
या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत.उडदाचे वडे , भात व गोड पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला ‘ बछवाॅंछ ‘ असे म्हणतात.
देव-दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या व्रतासंबंधी एक कथा सांगण्यात आली आहे. अर्थात पुराणातल्या या कथांचा शब्दश: अर्थ घ्यावयाचा नसतो तर प्रतिकात्मक अर्थ लक्षात घ्यायचा असतो.
एक वृद्ध बाई होती. तिची एक सून होती. त्यांच्या गोठ्यात गुरेही होती. गव्हाळी मुगाळी वासरेही होती. एक दिवस ती वृद्ध सासू शेतावर गेली. तिने जाताना सूनेला सांगितले की “ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. “ खरं म्हणजे तिला सांगायचे होते की गहू आणि मूग शिजवून ठेव. पण सुनेने अर्थ वेगळाच घेतला. तिने गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. वृद्ध सासू घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला. सासू आणि सून दोघीही घाबरून गेल्या. सासू देवापुढे धरणे धरून बसली. देवाला विनवू लागली.-“ अरे देवा, तू कोपू नकोस. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर. “ देवांने वृद्ध बाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली. त्यांना गोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली.
या कथेचे तात्पर्य काय ? या कथेपासून कोणता बोध घ्यायचा ? तर मोठ्या वडीलधार्या माणसांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट नीट ऐकून घ्यायची. समजले नाही तर नम्रपणे पुन्हा विचारून नीट समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणेच करायचे. सध्या गाई-गुरे , वासरे आजारी पडली तर जनावरांसाठीही दवाखाने आहेत. आजारी गुरांना लगेच दवाखान्यात नेऊन औषध द्यावयास हवे. तसेच त्यांची योग्य निगा राखली पाहिजे. या कथेद्वारे आणखीही एक गोष्ट लक्षांत येते. त्या वृद्ध सासूने झालेल्या चुकीबद्दल सुनेला शिक्षा केली नाही. ती चूक अजाणतेपणाने झाली होती. तिच्या हातून अजाणतेपणाने घडलेल्या अपराधासाठी क्षमा करण्याची विनंती तिने देवाला केली.
गाय ही इतकी उपयुक्त आहे की भारतासारख्या शेतीप्रधान देशात त्यामुळेच तिला देवता, माता म्हणून संबोधले गेले आहे. गाईमध्ये तेहतीस कोटी देवता आहेत असंही म्हटलं जातं. इथे ‘ कोटी ‘ हा शब्द संख्यावाचक नाही. कोटी म्हणजे प्रकारचे ! गाईमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता असतात . ती अत्यंत उपयुक्त आहे, एवढाच त्यामागचा अर्थ आहे.
दीपावलीचा सण हा सर्व सणांचा राजा मानला जातो. शेतातील धान्य घरात आल्याने आर्थिक संपन्नता आणि मनातील उत्साह यामुळे दीपावलीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाचा प्रारंभ आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात रहात होते त्यामुळे झाला असावा असे काही संशोधकांचे मत आहे. प्रभू रामचंद्रानी रावणाचा वध केला म्हणून दीपोत्सव करून लोकांनी त्यांचे स्वागत केले असेही सांगितले जाते. दिवाळीचा सण जवळ आला की घरात स्वच्छता केली जाते. घरात नको असलेले सामान बरेच असते. या निमित्ताने ते बाहेर काढून टाकले जाते. घर स्वच्छ करून घराला नवीन रंग दिला जातो. दिवाळीसाठी नवीन खाद्य पदार्थ करण्यात महिलावर्ग मग्न असतो. तर मुले आकाश कंदिल , किल्ले करण्यात आणि दिव्यांची रोषणाई करण्यात दंग झालेली असतात. कलावंत मंडळी घराच्या दरवाजासमोर रांगोळी घालण्यात एकरूप झालेली असतात. दिवाळीचे आनंद व उत्साहात स्वागत करण्यासाठी सारे सज्ज झालेले असतात.