प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला होता; वादावर वेदांताच्या अनिल अग्रवालांचं ट्वीट

वेदांता- फाॅक्सकाॅन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेले असताना यावर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचे अग्रवाल म्हणाले आहेत. जुलैत महाराष्ट्र सरकारने कसोशीने प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

( हेही वाचा: वेदांताचा दुसराही प्रकल्प, महाराष्ट्राचा विचार – अनिल अग्रवाल )

अनिल अग्रवाल यांच्या या ट्वीटमुळे आताच्या सरकारला दिलासा मिळणार आहे. तसेच सरकारने केलेल्या दाव्यांनाही पाठबळ मिळणार आहे. अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करुन हे स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्यातील मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात नवीन सरकार आले. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आले. हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनीही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून चर्चा करुन प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारने त्यांना दिलेली ऑफर आणि सवलत त्यांनी मान्य केली. त्यांनी गुजरातमध्ये हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here