मुंबई महापालिकेच्या दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील समुद्र किनारी असलेल्या वीर बाजीप्रभू उद्यान (नारळी बाग) आता लखलखत्या चंदेरीच्या तेजात न्हाऊन निघणार आहेत. या दोन्ही उद्याने ग्लो गार्डन म्हणून विकसित केली जात आहे. या उद्यानात विविध विद्युत रोषणाईच्या माध्यमातून रंगछटांची चित्रे साकारली जाणार आहे, ज्यामुळे लहान मुलांसह तरुण आणि मोठ्यांनाही ही उद्याने भुरळ पाडणार आहे. अशाप्रकारे विकसित केले जाणारे मुंबईतील पहिले ग्लो गार्डन ठरणार आहे.
दादर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाजवळील आणि चौपाटीच्या लगत असलेल्या वीर बाजीप्रभू देशपांडे उद्यानाचा विकास आता मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत केला जात आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी सूचवलेल्या कामांच्या अनुषंगाने महापालिकेच्या जी उत्तर विभागाने सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे उद्यानाचा समावेश केला असून हे उद्यान आता ग्लो गार्डन म्हणून विकसित केले जाणार आहे.
महापालिकेने यासाठी निविदा मागवली आहे. त्यानुसार कंत्राटदाराची अंतिम नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. या ग्लो गार्डनमध्ये विविध विद्युत रोषणाईच्या थिमचा वापर केला जाणार आहे. ज्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई ही प्राणी, फुले, पक्षी तसेच इतर नक्षीकाम आदींच्या माध्यमातून जमिन, येथील खुले प्रेक्षागृह, भिंत, झाडे आदींवर पाडले जाणार आहे. ज्यामुळे हे उद्यान रात्रीच्या वेळी अधिक चमकून निघणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारे मुंबईत ग्लो गार्डनची निर्मिती झालेली नाही. त्यामुळे हे मुंबईतील पहिले ग्लो गार्डन ठरेल असा त्यांचा विश्वास आहे.
( हेही वाचा: सातमकरांवर पुन्हा शिवसेनेने केला अन्याय: विभागप्रमुख पदावरून हटवून प्रमोद शिंदेंची नियुक्ती )
सौंदर्यीकरणाअंतर्गतच हे उद्यान ग्लो गार्डन म्हणून बनवले जात असले तरी अशाचप्रकारे वीर कोतवाल उद्यान, धारावीतील उद्यानही ग्लो गार्डन बनवण्यात येणार आहे. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उदयाने, विविध चौक आणि रस्तेही अशाप्रकारच्या विविध आकर्षक रोषणाईने सुशोभित केले जात आहे. विविध विजेच्या खांबाबरही या विद्युत रोषणाईच्या थिमचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील विजेच्या खांबांवर जास्वंदाच्या फुलाची प्रतिकृती तर सिद्धिविनायक मंदिर परिसरात गणपतीची प्रतिकृती अशाप्रकारच्या थिमचा वापर केलेला आहे.
Join Our WhatsApp Community