भायखळा प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे! – केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या उप महानिरीक्षक

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'भारत का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील प्रेक्षागृहामध्ये शुक्रवार, १९ मार्च २०२१ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे देशपातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले असून याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या उप महानिरीक्षक (वने) सोनाली घोष यांनी केले.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘भारत का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील प्रेक्षागृहामध्ये शुक्रवार, १९ मार्च २०२१ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थानिक आमदार यामिनी जाधव, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण ) ज्योती बॅनर्जी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, सिनेअभिनेत्री हेडन, “ई” विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर तसेच प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.

(हेही वाचा : भाजप नगरसेविकेची काँग्रेस नगरसेवकाविरोधात तक्रार!)

यावेळी बोलतांना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या उप महानिरीक्षक (वने) सोनाली घोष म्हणाल्या की, ज्यावेळी या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्धारित झाले, त्यावेळी पश्चिम घाटापासून प्रारंभ करून “आशियाई हत्ती” हा विषय निर्धारित करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ज्यापद्धतीने दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे बघता केंद्र सरकारच्या या संपूर्ण उपक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले असल्याचे त्या म्हणाल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी मुंबई महानगरपालिकेला धन्यवाद दिले. स्थानिक आमदार यामिनी जाधव यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे चांगल्या प्रकारे जतन व संवर्धन करीत असल्याबद्दल प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी व त्यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र असल्याचे त्या म्हणाल्या. अंध व दिव्यांग मुला-मुलींनी याठिकाणी ज्या पद्धतीने सादरीकरण केले त्याबद्दल डॉ. सुमित पाटील व त्यांचे विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन करित असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रत्येक मुंबईकरामध्ये प्राणिसंग्रहालयाची एक वेगळी आठवण! – अश्विनी भिडे

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने या अभियानाच्या शुभारंभाची जी जबाबदारी दिली होती, ती यशस्वीपणे पूर्ण करु शकल्याबद्दल आनंद होत असून यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारी असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबईमध्ये जडणघडण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला या प्राणिसंग्रहालयाची एक वेगळी आठवण असून त्यादृष्टीने सोयी-सुविधा देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. देशभरातील एकूण ७५ प्राणिसंग्रहालयामध्ये ७५ आठवड्यांच्या कालावधीदरम्यान विविध ७५ प्रजातींच्या प्राणी-पक्ष्यांच्या संवर्धन जागृतीकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झाली असून पुढील ७५ आठवडे म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अशा प्रकारचे विविध कार्यक्रम देशभरातील ७५ प्राणिसंग्रहालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

नागरिकांकरिता ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रक्षेपण!

देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या शुभारंभाचा मान मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये १२ मार्च २०२१ रोजी गजराज पूजन, १३ मार्च रोजी आशियाई हत्ती अनारकलीची ऑनलाईन ऍक्टिव्हिटी, १४ मार्च रोजी स्वतः बनवा हत्ती कार्यशाळा, १५ ते २१ मार्च दरम्यान नागरिकांकरिता ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रक्षेपण – ज्यामध्ये लोगो मेकिंग, फोटोग्राफी, टि- शर्ट पेंटिंग, पेपर क्वीलिंग, निबंध लेखन इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. १७ मार्च २०२१ रोजी चित्रकला स्पर्धा (मनपा शिक्षण विभागातील कला अकादमीच्या शिक्षकांकरिता) तसेच बिवाश पांडव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. १८ व १९ मार्च रोजी प्राणिसंग्रहालयाची सहल/नेचर ट्रेल, तर २० मार्च २०२१ रोजी आनंद शिंदे यांचे चर्चासत्र व २१ मार्च २०२१ रोजी ‘तुम्हीच व्हा तुमचे मार्गदर्शक’ ( मतिमंद आणि अंध मुलांकरिता एका विशेष कार्यक्रम) आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here