चंद्रशेखर साने
या वर्षीचे मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या दिनांकांना दिल्ली येथे होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (swatantryaveer savarkar) नाव या साहित्य संमेलनातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. कोणत्याही महाद्वाराला, सभागृहाला किंवा व्यासपिठाला सावरकरांचे नाव देण्यात आलेले नाही; इतकेच काय परंतु त्याची प्रसिद्धीका (किंवा फ्लायर) यामध्ये सुद्धा सावरकरांचे छायाचित्र नाही. (Veer Savarkar)
याविषयी काही जणांनी प्रश्न उपस्थित केला असता संयोजकांनी जहाल गटाचे म्हणून लोकमान्य टिळकांचे (Lokmanya Tilak) आणि मवाळ गटाचे म्हणून गोपाळ कृष्ण गोखल्यांचे नाव दिले आहे; म्हणून सावरकरांचे नाव दिले नाही, असा अजब पवित्रा घेतला. जहाल किंवा मवाळ गट, भारतीय स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांतीकारक, समाज क्रांतिकारक आणि राजकारणापलीकडे जाऊन सावरकर एक मोठे साहित्यिकही होते, हे जणू काही त्यांच्या गावीच नाही.
कोणता साहित्यप्रकार स्वातंत्र्यवीरांनी हाताळला नाही? चरित्रकार, आत्मचरित्र, पत्रकार, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, जागतिक स्तरावर पोचलेले इतिहास ग्रंथलेखन, प्रबोधन करणारे निबंधलेखन इतकेच काय पण माहितीपटात आणि चित्रपटात सुद्धा सावरकरांची गीतकार म्हणून नोंद आहे. प्रसिद्धीकेच्या छायाचित्रात घेतलेली सर्वच नावे साहित्यिक आहेत असे म्हणायचे आहे का संयोजकांना? मागच्या वर्षी सुद्धा नाशिक येथे हाच प्रकार झालेला होता. भगूरवासियांनी जोरदार आक्षेप घेऊन साहित्य संमेलनाच्या कार्यक्षेत्रात सावरकरांचे नाव घालण्यात थोडेसे यश मिळवले होते. हिंदुत्व (Hinduism) हा विचार मांडणारा प्रत्येक लेखक हा स्वागत समितीला किंवा आयोजकांना अस्पर्श असतो काय? मोठे कथाकार, लेखक कै. पु. भा. भावे हे अध्यक्ष झाले होते, तेव्हा त्यांचे संमेलन उधळवण्यात हिंदुत्वविरोधी विचारांचे लेखक साहित्यिक आणि कार्यकर्ते आघाडीवर होते. निवडून आलेल्या अध्यक्षांना बोलू न देण्याचा प्रयत्न करणे हाच तर सरळ सरळ फॅसिझम होता.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेत Facial Biometric Attendance ची सक्ती, पण मुख्यालयातच मशिन्सअभावी बोंबाबोंब)
काही काळापूर्वी ४० पेक्षा जास्त पुस्तके लिहिणारे लेखक, काही सहस्र संख्येने व्याख्याने आणि प्रवचने देणारे वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांचा अर्ज काहीतरी निमित्त करायचे म्हणून, तुम्ही मुंबईतून अर्ज भरला; पण तुम्ही सदस्य मात्र पुण्यात असे फुसके कारण देऊन फेटाळण्यात आला अशी माझी माहिती आहे. संस्था एकच. तुम्ही योग्य ठिकाणाहून अर्ज भरा, अशी साधी सूचना देऊन हा प्रश्न मिटवता आला असता. थोडक्यात हिंदू, हिंदुत्व म्हटलं की, कोणत्या विचारसरणीच्या प्रभावाने या गोष्टी घडतात, हे स्पष्ट आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर साहित्यिकाला मराठी साहित्य संमेलनातून दूर ठेवणे म्हणजे सुरांवाचून संगीत, तालावाचून तबला, पाण्यावाचून मासा आणि शाईवाचून लेखणी. सावरकरांचे नाव आणि गौरव नसलेले मराठी साहित्य संमेलन केवळ दरवर्षीची औपचारिकता म्हणून साजरे करायचे तर करावे. आमच्या दृष्टीने असे मराठी साहित्य संमेलन म्हणजे प्राणांवाचून कुडी असल्यासारखेच आहे.
(हेही वाचा – Hinduja Brothers Net Worth : हिंदुजा बंधूंनी असा केला आपल्या साम्राज्याचा विस्तार)
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे आजीव सदस्य, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारिणी सभासद आणि हर घर सावरकर समितीचे सभासद आहेत.)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community