वीर सावरकर आणि यमुनाबाईंची डोंगरी कारागृहातली भेट

352

सावरकरांची देशभक्ती किती उत्कट होती याचे उदाहरण देताना मला डोंगरी कारागृहातली त्यांच्या पत्नी यमुनाबाई विनायक सावरकर यांची भेट आठवतेय. त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दोन जन्मठेप म्हणजे २५ + २५ = ५० वर्षे. ५० वर्षे आपण तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही, कदाचित आपले प्रेत बाहेर पडेल अशी परिस्थिती असताना सावरकरांची मनःस्थिती किती दृढ. भायखळ्याच्या तुरुंगात एक इंग्रज गृहस्थ सावरकरांना म्हणाले, ‘अखेर सरकारने असेच ठरविले की तुमची एक जन्माची जन्मठेप भरल्यानंतर पुढच्या जन्माची दुसरी जन्मठेप भरायची.’ यावर सावरकर म्हणाले, ‘तर मग त्यातल्या त्यात ही समाधानाची एक गोष्ट आहे की, हिंदू धर्माचा पुनर्जन्माचा सिद्धांत तरी सरकारने एकदा मानला आणि ख्रिस्ती धर्माची पुनरुत्थानाची कल्पना सोडून दिली.’

कोणत्याही प्रतिकूल प्रसंगी सावरकर खंबीर असायचे. आपण चित्रपटात विरहाचा सीन पाहतो आणि आपण भावूक होतो. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात हा सीन प्रत्यक्षात घडला आहे. विरहाच्या सीनमध्ये बऱ्याचदा नायक आणि नायिक अतिशय भावूक होतात, रडतात, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणतात. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. डोंगरीच्या कारागृहात सावरकरांना भेटायला त्यांच्या पत्नी आणि मेहुणा आला होता. आपला पती लंडनला शिकायला गेला होता. बॅरिस्टर बनून परत येईल अशी त्यांच्या पत्नी यमुनाबाईंची अपेक्षा होती. अंगात कोट असेल, विलायती कपडे असतील. परंतु इथे चित्र मात्र वेगळे होते. सावरकर तुरुंगात होते आणि त्यांच्या पायात बेड्या होत्या.

(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)

अशा अवस्थेत आपल्या पतीला पाहुन काय वाटले असेल त्यांच्या पत्नीला? सावरकर विशीतले तरुण होते आणि त्यांचे सबंध तारुण्य तुरुंगात जाणार होते. तारुण्याचा कोणताच उपभोग त्यांना आता घेता येणार नव्हता. त्यांच्या पतीव्रता पत्नीचीही तीच अवस्था. तत्कालीन परिस्थिती पाहता ही अंतिम भेट होती. सावरकरांनी आपल्या पत्नीकडे पाहिले आणि हसून विचारले, ‘काय, मला पाहिल्याबरोबर ओळखलेत का? केवळ कपडे बदललेत. मी तोच आहे. ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होवू लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करुन घरटी बांधणे, यालाच जर संसार म्हणायचे असेल तर असा संसार कावळा चिमणीही करतात, पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, तर आपण आपली चार चूल बोळकी फोडून टाकली, पण त्यायोगे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल.’

हा संवाद सिनेमातला नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यातला आहे. कोणत्याही फिल्म मेकरला असा सीन सुचणार नाही. आपण कल्पना तरी करु शकतो का की, सावरकर आणि त्यांच्या पत्नी अगदी तरुण आहेत आणि आता त्यांची पुन्हा भेट होऊ शकणार नाही. त्यांची पत्नी पतीव्रता आहेत आणि सावरकरांनी प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे एकपत्नीव्रत घेतले होते. त्यांच्या पत्नीला सबंध आयुष्य आपल्या पतीशिवाय काढायचे होते आणि भयाण अशा अंदमानच्या कारागृहातच सावरकरांच्या आयुष्याचा शेवट होईल, अशी ती परिस्थिती होती. त्यांची विद्वत्ता, शिक्षण व्यर्थ जाणार होते. अशा प्रसंगी वर नमूद केलेला सावरकरांचा संवाद खूप महत्त्वाचा ठरतो आणि त्यांच्या पत्नी तरी किती खंबीर असतील हो! काय सहन केले असेल त्या माऊलीने. महत्त्वाचे म्हणजे या प्रसंगी देखील दोघे देशावर चर्चा करतात. आपला संसार मोडला पण पुढे या त्यागातून अनेकांचा संसार उभा राहणार आहे ही सावरकरांची भावना आहे. वीर सावरकरांवर टीका करण्याऐवजी त्यांच्या आयुष्यातील अशा प्रेरक प्रसंगांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या चरित्राचे पारायण झाले पाहिजे. कारण त्यांच्या चरित्रातूनच भविष्यकाळातील अनेक लोकोत्तर महात्मे जन्माला येणार आहेत.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.