सावरकरांची (Veer Savarkar) सामाजिक समरसता अगदी त्यांच्या बालपणापासूनच दिसत होती. अंदमानमध्येही त्यांनी समरसतेचा संदेश दिला होता. त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात ही समरसता प्रकर्षाने जाणवत असली, तरी सावरकरांचे सबंध आयुष्य या तत्त्वावर बेतलेले आहे, असे वक्तव्य दादर (मुंबई) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह-कार्यवाह आणि हिंदुस्थान पोस्टचे मुख्य संपादक स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) यांनी केले.
(हेही वाचा – भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन २ महिन्यांत धावणार: Ashwini Vaishnaw)
विविध मार्गांनी हिंदुत्वाचं काम
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ दहिसर-बोरीवली आयोजित एका विशेष कार्यक्रमात स्वप्नील सावरकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. ‘समाज क्रांतिकारक सावरकर’ या विषयावर त्यांनी प्रबोधन केलं. या प्रसंगी बोलताना त्यांनी सावरकरांच्या जीवनातील विविधांगी कार्याला स्पर्श केला. स्वप्नील सावरकर म्हणाले, “स्वा. सावरकरांनी आपले सबंध आयुष्य देश कल्याणासाठी अर्पण केलं. हे करत असताना त्यांनी विविध मार्गांनी हिंदुत्वाचं काम केलं. कलेच्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्व आणि सामाजिक समरसतेचा विचार पोहोचवला. तसेच आज नॅरेटिव्हबद्दल खूप चर्चा होत आहे. सावरकरांनी नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी देखील कार्य केले आहे.”
विचारक होऊन स्वतःच्या बुद्धिने हिंदुत्वाचे कार्य करा
श्रोत्यांशी संवाद साधताना स्वप्नील सावरकर पुढे म्हणाले, “सावरकरांनी बुद्धिवाद जोपासला आणि केवळ आंधळे अनुयायी निर्माण करण्याऐवजी त्यांनी बुद्धिमान विचारक निर्माण करण्यावर भर दिला. महात्मा गांधींचे केवळ अनुयायी निर्माण झाले. ते गांधींचीच री ओढत पुढे चालले आहेत. त्यामुळे तिथे क्रांती होऊ शकली नाही. नवा विचार जन्म घेऊ शकला नाही. मात्र सावरकरांनी विचारक निर्माण केल्यामुळे इथे रोज नवकल्पना मांडल्या जातात. जगाकडे पाहण्याचे स्वतंत्र दृष्टीकोन निर्माण होत आहे; म्हणून खरे सावरकरवादी या नात्याने आता त्यांचे विचारक होऊन आपल्याला स्वतःच्या बुद्धिने हिंदुत्वाचे कार्य करायचे आहे.”
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ दहिसर-बोरीवली या संस्थेने १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. सहयोग मंदिर, दहिसर येथे सावरकरांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. डॉ. शिरीष ठाकूर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा समजावून सांगितली. त्यानंतर लेखक जयेश मेस्त्री यांचे ’सावरकरांची काव्यसंपदा’ या विषयावर छोटे व्याख्यान झाले. जयेश मेस्त्री यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने सावरकरांची प्रतिभा समोर ठेवली. सावरकर हे उत्कृष्ट प्रेमकवी होते, हे शंकर वैद्यांचं वक्तव्य अधोरेखित केलं.
प्रतिभा क्षमतेच्या माध्यमातून सावरकर घराघरात पोहोचतील – जयेश मेस्त्री
या प्रसंगी जयेश मेस्त्री म्हणाले, “हिंदुत्व आणि क्रांतिकार्यासोबतच सावरकरांच्या विविध गुणांची चर्चा झाली पाहिजे आणि ते गुण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यांची काव्य प्रतिभा हा एक महत्वाचा गुण असून त्यावर कार्यक्रम आयोजित करुन रसिकांना त्या काव्यांचा मनमुराद आस्वाद घेता आला पाहिजे. या विविध प्रतिभा क्षमतेच्या माध्यमातून सावरकर घराघरात पोहोचतील.”
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सौ. अनुराधा परब यांनी सावरकरांच्या एका भाषणाचे अभिवाचन केले. सावरकरांनी (Veer Savarkar) लेखण्या मोडून बंदुका हातात घ्यायला का सांगितल्या, हे सावरकरांच्याच शब्दांत श्रोत्यांना अनुभवता आलं. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच सावरकरांनी रचलेल्या शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी सुरेंद्र तन्ना, नरेंद्र केणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community