माझी जन्मठेप : अनोखा रंगमंचीय आविष्कार

134
‘माझी जन्मठेप’च्या अभिवाचनाच्या रंगमंचीय अविष्काराचा पहिला प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सादर करण्यात आला. या संकल्पनेविषयी…
‘प्रणाम भारत’ या क्रांतिकारी उमाजी नाईक, मदनलाल धिंगरा व राजगुरू यांची शौर्यगाथा अधोरेखित करणाऱ्या नाट्य प्रयोगानंतर, नाट्यसंपदा कला मंच आता नवीन व अनोखा रंगमंचीय आविष्कार सादर करीत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी  जन्मठेप’. गाणी, गप्पा यातून मनोरंजन होते, परंतु गंभीर विषयातूनही एका वेगळ्या प्रकारचे, एका वेगळ्या स्तरावरचे मनोरंजन होऊ शकते हा माझा विश्वास आहे.
‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने।
लब्धप्रकाश- इतिहास-निसर्ग माने।
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे।
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे!’‘स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम वंदे।’‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’
‘शत जन्म शोधितांना…’

यांसारख्या तेजस्वी कल्पना ज्या व्यक्तिमत्वाने लिहिल्या, त्या व्यक्तिमत्वाचा स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी सुद्धा अपमान होतो, अवमान होतो, त्यांचे राष्ट्रोद्धारातील योगदान पूर्णपणे विसरले जाते, याबद्दल केवळ खंत करीत न बसता, हे धगधगते ज्वालाकुंड असलेले व्यक्तिमत्व आजच्या पिढीपर्यंत पोहचवावे, आजच्या काळाच्या संदर्भात त्यांचे असलेले महत्व, नव्या पिढीच्या अपेक्षांनुसार थोडक्या काळात आणि थोडक्या वेळेत, यथाशक्ती, यथामती पोहोचवावे या दृष्टीने केलेला हा प्रपंच.
समर्थ भारताचे स्वप्न पाहणारे विनायक दामोदर सावरकर म्हणजे आयुष्यभर पेटवलेला ज्वलंत यज्ञ, हे तर खरेच, पण स्वतःबरोबरच दक्षिणेतील एम. पी. टी. आचार्य, बंगालमधील उल्हासकर दत्त, सुभाषचंद्र बोस, महाराष्ट्रातील सेनापती बापट, डॉक्टर खानखोजे आणि पंजाबातील भगतसिंग, मदनलाल धिंग्रा अशा अगणित देशप्रेमींवर, त्यांच्या आयुष्यभर, यांच्या कार्याचा उमटलेला अमिट ठसा आणि त्यासाठी सर्वस्व झुगारून देण्याची त्यांनी केलेली कृती. या अपरिमित ऊर्जेचा, कृतिप्रवण तत्त्वज्ञानाचा शोध घेण्यासाठी ‘माझी जन्मठेप’ हे एकमेव पुस्तक सुद्धा परिपूर्ण आहे, असे आम्हाला वाटले. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयींनी योजलेली विशेषणे आणि आजच्या काळातील सावरकरांच्या विचारांची संयुक्तिकता शोधण्याचा, ‘माझी जन्मठेप’वर आधारित हा ग्रंथ वाचनाचा रंगमंचीय आविष्कार. या प्रयोगाच्या उभारणीत सहयोग मिळाला तो स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा.
सावरकरांनी सोसलेले कष्ट वाचले की अगदी स्वतःच्या आयुष्यातील छोटे -मोठे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम्स वाटतच नाहीत. त्यामुळे सावरकर हे केवळ देशासाठी प्रेरणा नाहीत तर प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील एक प्रेरणा आहेत. आत्मबळ म्हणजे सावरकर, आत्मतेज म्हणजे सावरकर, आत्मबलिदान म्हणजे सावरकर. ज्यांच्या नसानसात फक्त आणि फक्त देशभक्ती वाहत होती, अशा महान व्यक्तिमत्वाच्या एका अभूतपूर्व साहित्याचा एक छोटासा भाग होण्याची संधी मिळणे हे या जन्माचे सार्थक होण्यासारखे आहे.
– मुग्धा गाडगीळ – बोपर्डीकर, कलाकार
माझी जन्मठेप या ५०० पानांच्या ग्रंथाचे २ सव्वा दोन तासांत बसणारे संकलन करण्याचे शिवधनुष्य उत्तमरित्या पेलले ते अलका गोडबोले यांनी. या प्रयोगासाठी, उत्तम आवाज, मराठी भाषेवरचे प्रभुत्व, अभिनयाची आवड आणि विषयाचे गांभीर्य असणारे कलाकार शोधणे गरजेचे होते. मग सोशल मीडियाचा वापर करून ऑडिशन मागवण्यात आल्या. ६३ ऑडिशनमधून एक छान ६ तरुण मुलामुलींची टीम उभी राहिली. दीड महिना वाचनाच्या तालमी सुरू झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द उच्चारायला खूप कठीण. ती जबाबदारी उचलली जेष्ठ रंगकर्मी सुहास सावरकर यांनी. ४० वर्षांचा अनुभव असलेले जेष्ठ दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर यांनी या मुलांवर नाट्य संस्कार आणि दिग्दर्शन केले.
लेखक – अनंत वसंत पणशीकर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.