स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ५७वा आत्मार्पण दिन; सावरकरांच्या जीवनप्रवासाची रंग-रेषांमधून मांडणी

254

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘अनबिलिव्हेबल सावरकर, भगूर ते अंदमान’ या विषयावरील योगेंद्र आर. पाटील यांचे चित्रप्रदर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आले आहेे. त्या निमित्ताने…

माझे आयुष्य जगण्याचे नियमन बिघडल्यामुळे माझ्यात प्रचंड शारीरिक अस्वस्थता व मानसिक अस्थिरता आली. दुर्बलता एवढी शिगेला पोहचली की शरीर, मन व बुद्धी निष्क्रीयतेकडे जाऊ लागले. प्रत्येक गोष्ट मला समस्या वाटू लागली, प्रश्नांचा प्रचंड गोंधळ होऊ लागला, त्यामुळे सगळीकडे जणू काळोखच आहे, असे वाटू लागले. अशा सुन्न व भयानक वातावरणात सावरकर वाड्:मय हाती लागले. सावरकर विचारांनी नवचैतन्य निर्माण झाले. खिन्न मनाने उभारी घेतली. माझी सर्व गुंतागुत उकलायला लागली. सावरकर विचारांनी माझे तन, मन नवनिर्मितीसाठी आसूसु लागले. मला त्यातून ईश्वरी प्रसाद मिळाल्याचा भास होऊ लागला.

परतीचा मार्ग काढण्याची जादू सावरकर विचारांमध्ये

परिस्थिती शंभर टक्के जरी आपल्या विरोधात गेली, तरी त्यातून परतीचा मार्ग काढण्याची जादू सावरकर विचारांमध्ये आहे. जीवन अस्थिर होण्याची जाणीव जेव्हा मला होऊ लागली, तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकते हा विश्वास मला सावरकर विचारांमधूनच मिळाला. ज्या विचारांच्या ध्यासाने अंधारातून मी माघारी फिरलो त्या विषयाचा चरित्र नायक रंग आणि रेषांमधून मांडण्यासाठी अवघे शरीर व मन तयार झाले. काळोखाची रजनी संपली व चैतन्यमय रेषा रंग आकार बाहेर पडू लागले.

अंदमानात महाकाव्ये लिहिली

जिवनात आपल्या मनाच्या विरोधात काही थोडे जरी झाले तरी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याजवळ रडगाणे असते. अश्रुंचे हौद भरलेले असतात, मात्र इतरांसाठी आपल्याला थोडासाही त्याग करता येत नाही, झिजता येत नाही. या भावनेने कोण जगतो? कोण तळमळतो? मात्र उलट अर्थी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी स्वत:सह आपल्या कुटुंबाचे मातृभूमीसाठी संपूर्ण समर्पण करून काळ्यापाण्याची शिक्षा, त्या मरण यातना भोगतांना अंदमानच्या त्या भयानक काळकोठडीत गळ्यात ५० वर्षांच्या शिक्षेचा बिल्ला असतांना विचलित न होता सावरकरांच्या मनात पुढील जिवनासंबंधी कोणते विचार आले असतील? हे रहस्य उकलण्याची माझी धडपड आहे. बाल सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या घेतलेल्या प्रतिज्ञेसाठी प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. त्याकरिता जेवढे आघात सोसावे लागले ते त्यांनी एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे सोसले. त्या आघातांचे त्यांनी आपल्या जिवनावर मळभ येऊ दिले नाही. सूर्य किरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर पडावे तसे सावरकर आपल्या तेजाने प्रत्येकवेळी ही दु:खे फोडून बाहेर पडत क्रांतीची ही धगधगती ज्योत त्यांनी अखेरपर्यंत तेवतच ठेवली. तिच्यावर आपल्या वैयक्तिक दु:खाचे मात्निन्य येऊ द्यायचे नाही, काजळी चढू द्यायची नाही, या निर्धाराने हा महामानव जगला. अंदमानात त्यांनी महाकाव्ये लिहिली. सावरकारांच्या या अफाट उर्जेच्या रहस्याचे मला एवढे आकर्षण झाले की मी त्यांच्या प्रेमापोटी अंदमानला जाऊन त्यांच्या कोठडीत नतमस्तक झालो व माझ्यासाठी सावरकर कोठडी महातीर्थ झाली. तिथेच मला सावरकर चित्रमालेच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली.

भारत जाणून घ्यायचा असेल तर सावरकर एक राजमार्ग

कविता आणि क्रांती ही दोन परस्पर विरोधी तत्वे एकाच मानवी हृदयात नादतांना दिसतात. असे सावरकर हे जगातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे सावरकर हे एक अनाकलनीय गूढ रहस्य आहे हे रंगरेषांमधून मांडण्यात माझी भूमिका बालकाची आहे. जीवन समजून घ्यायचे असेल तर सावरकर हा एक सफल मार्ग आहे. भारत जाणून घ्यायचा असेल तर सावरकर एक राजमार्ग आहे. सावरकरांचे आपल्या मातृभूमीवर जसे आणि जितके प्रेम होते तसे मातृभूमीवर प्रेम असणारा माणूस इतिहासात सापडत नाही. सावरकरांनी शरीराचा कणकण व वेळेचा क्षणक्षण मातृभूमीसाठी बहाल केला होता. जिवनातील सर्व उत्तमोत्तम गुणांचा समुच्चय आणि त्या समुच्च्याचे शिखर म्हणजे सावरकर. अहंकारी इंग्रज सत्ताधीशांनाही ज्याची प्रचंड भीती वाटायची असे जगात एकच नाव होते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हा माणूस भारतात जन्मला हे खरं म्हणजे भारताचे भाग्यच. आसीम त्याग, अलोट राष्ट्र प्रेम, निष्कलंक वैज्ञानिक दृष्टी, उदात्त ध्येय, विशाल कल्पकता, संतकवीचे भावमाधुर्य, कृतीशुरता, प्रचंड बुद्धिवाद, ललीतरम्यता धैर्य, जीवनाकांक्षा आत्यंतिक तळमळ, रसरशीत व दाहक विचारांची अफाट उंची तेवढीच खोली असे सावरकरांचे पैलू दिसतच राहावे इतके व्यापक व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

सावरकरांचे हे असामान्य व्यक्तिमत्त्व कलेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात माझा खारीचा वाटा आहे. पण कामात तन्मयता आहे मनात ध्येय आहे. हातात सरस्वतीचे वरदान आहे आणि हृदयात सावरकर नावाचे तुफान आहे व प्रवासात दाही दिशा आहेत. माझ्या या कार्यात माझे गुरु प्राचार्य राजेंद्र महाजन, पत्नी जयश्री व मुलगी साक्षी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत हे माझे भाग्यच आहे.

लेखक – योगेंद्र रघुनाथ पाटील, प्रसिद्ध चित्रकार 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.