वीर सावरकरांचा ५७वा आत्मार्पण दिन; शोध हा नवा – शतजन्म शोधिताना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्त ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’ हा भव्य, देखणा कार्यक्रम ‘शतजन्म’च्या नृत्य दिग्दर्शिका, जेष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. रुपाली देसाई यांच्या ‘संस्कृती कल्चरल अकॅडमी’ या संस्थेने त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दि. २६ फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी ६ वाजता मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित केला आहे. करोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीनंतर ‘शतजन्म’ पुन्हा एकदा रंगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देदीप्यमान आयुष्यावर आधारित या कार्यक्रमात सावरकरांच्या अजरामर गीतांबरोबरच त्यांनी लिहिलेली लावणी, पोवाडा, फटका, त्यांच्या नाटकातील प्रवेश, त्यांची छायाचित्रं, त्यांच्या भाषणाची झलक, सावरकर चित्रपटातील दृश्य या साऱ्या माध्यमातून सावरकरांचं बहुआयामी व्यक्तिमत्व अधोरेखित होतं.

स्मरण ‘शतजन्म’च्या पहिल्या प्रयोगाचं

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ३०-३२ वर्ष सहवास लाभलेले माझे वडील कै. श्री. पु. गोखले यांच्या सांगण्यावरून मी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं काम पाहू लागले. युवा पिढी आकृष्ट होईल असा कार्यक्रम करावा असं मनात असतानाच जेष्ठ गायिका वर्षा भावे यांच्या सहकार्यानं आम्ही ११ गाण्यांचा एक छोटासा कार्यक्रम सादर केला. ‘हा कार्यक्रम सगळ्यांना आवडला तर आपण सावरकरांवर भव्य कार्यक्रम करु’ असं मी वर्षाला सुचवलं होतं. कार्यक्रम सगळ्यांनाच खूपच भावला. तो दिवस होता २५ फेब्रुवारी २००७. माझी कल्पना स्मारक समितीने मान्य करून कार्यक्रमासाठी २७ मे २००७ हा दिनांक निश्चित झाला. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून कार्यक्रमाला अर्थ साहाय्य तर केलंच पण संहितेसाठी अतिशय मोलाची मदत केली.

मला कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव असला तरी कार्यक्रम उभा करण्याचा अनुभव नव्हता. स्वातंत्र्यवीरांचं दहा हजार पानांचं साहित्य आणि बारा हजार ओळींच्या काव्यातून अडीच तासाच्या कार्यक्रमाची निर्मिती करायची होती. लोकांना माहीत नसलेलं आणि आजच्या घडीला योग्य आहे तेच सांगायचं निश्चित होतं. सावरकरांचं रत्नागिरीतील तेरा वर्षांच्या काळातलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेली मराठी प्रतिशब्दांची निर्मिती, पाकिस्तान, चीन, तिबेट याविषयीच्या त्यांच्या विचारांकडे तत्कालिन सरकारनं केलेलं दुर्लक्ष, सैनिकीकरणाचा पुरस्कार, हिंदुत्व या साऱ्या गोष्टी सांगणं आवश्यक होतं. त्याचवेळी घरात उद्भवलेल्या अनंत अडचणींमुळे संहिता लेखनासाठी जेमतेम पंधरा दिवस हाती आले.

गाण्यांची निवड आणि संगीत याची जबाबदारी जेष्ठ गायिका वर्षा भावे हिनं उचलली. सावरकरांचं काव्य वाचताना लावणी, फटका, भावगीतं तर गवसलीच पण ती वाचून आश्चर्याचे धक्केही बसले. वर्षाच्या स्वररचनांना कमलेश भडकमकरनं छान सजवलं. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी रुपाली देसाईनं पेलली. प्रत्येकाचं काम स्वतंत्रपणे सुरू असलं तरी वर्षा, कमलेश आणि माझी एकत्र भेट झाली ती कार्यक्रमाला केवळ बारा पंधरा दिवस असताना. रात्री दहा वाजता भेटायचं ठरलं. ‘ही काय भेटण्याची वेळ आहे?’ असा सूर घरात उमटलाच. मी शिवधनुष्य हाती घेते आहे याचा मला अंदाज होता. पण आमच्या त्यादिवशीच्या चर्चेतून तो घरच्यांनाही आला. शतजन्मचा पहिला प्रयोग दूरचित्रवाणीवर दाखवला जावा अशी इच्छा होती. ईटीव्हीचे तत्कालीन अधिकारी संजय दाबके यांच्या सूचनेनुसार संतोष आयाचित यांची भेट घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा कार्यक्रम म्हणजे त्यात करमणूक काय असणार? असा इतर अनेकांप्रमाणे त्यांचाही प्रश्न होता. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्यावर, कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाला ते आनंदानं तयार झाले. टीव्हीसाठीच्या ध्वनिचित्रमुद्रणाचाही अनुभव नव्हता. त्याची माहिती वर्षा, कमलेशच्या भेटीत मिळाली. शेवटच्या धावपळीत विनोद पवार, महेंद्र पवार सामिल झाले आणि त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. अजित दांडेकर यांनी नेपथ्य, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजनेची जबाबदारी पेलली. सावरकरांनी लिहिलेला, संपादित करूनही सात मिनिटांचा होत असलेला तानाजीचा पोवाडा केवळ तीन दिवसात तयार करून नंदेश उमप यांनी कार्यक्रमात जान आणली. निवेदनासाठी माझ्या जोडीला दूरदर्शनचा वृत्त निवेदक शैलेश दातार होता. माझ्या आग्रहाखातर संगीत उत्तरक्रिया नाटकातल्या वेडीच्या प्रवेशाचं अमिता खोपकर, सचिन देशपांडे यांनी वाचन केलं. आता मात्र अंगावर काटा आणणारा तो प्रवेश प्रत्यक्ष सादर केला जातो.

गोव्यातील प्रयोगांच्या वेळी काही गोंधळामुळे अगदी शेवटच्या क्षणी वेडीच्या भूमिकेसाठी धावून आलेली अंजली अमडेकर आता मात्र आमची नेहमीची ‘वेडी’ आहे तर थोरले माधवराव पेशवे यांच्या भूमिकेत असतात दीपक वेलणकर. रंगभूषा, वेशभूषेची जबाबदारी शिवानी दिनेश हिनं संभाळली. पहिल्या प्रयोगात सहभागी झालेल्या नवोदित कलाकारांनी आज प्रतिथयश कलाकार म्हणून नावलौकिक मिळवला आहे. जवळच्यांचं आजारपण, जन्म आणि मृत्यू या तीन वेगवेगळ्या घटनांनी रंगीततालीम आणि २७ मे या प्रयोगाच्या दिवशीही माझी परीक्षा पाहिली. शुभारंभाच्या सहा वाजताच्या प्रयोगासाठी मी साडेचार वाजता पोहोचले. पण सर्वांच्याच मेहनतीमुळे, सहकार्यानं पहिला प्रयोग अप्रतिम झाला. नटवर्य प्रभाकर पणशीकर, रामदास भटकळ या मान्यवरांबरोबरच स्मारकाचे अध्यक्ष मिलिंद गाडगीळ, विक्रमराव सावरकर, स्वामिनी सावरकर कार्यक्रमाला उपस्थित होते. मिलिंद गाडगीळ त्यावेळी कर्करोगानं त्रस्त होते. केमो थेरपी चालू असतानाही त्यांनी मला संहिता तपासून दिली.

संगीत, नृत्य, नाट्य यांनी सजलेला सावरकरांच्या कार्यकर्तृत्वावरचा ‘शतजन्म’ हा पहिलाच कार्यक्रम. साहजिकच सावरकर प्रेमींच्या प्रतिक्रियांचं दडपण होतं. आईचाच कार्यक्रम, त्यामुळे हजर रहायलाच हवं या विचारानं आलेल्या माझ्या विशीतल्या लेकानं कार्यक्रम संपताच, ‘आम्हाला सावरकरांबद्दल काहीच माहीत नव्हतं, तू ग्रेट आहेस’ असं म्हणत मला मारलेली मिठी ही मला मिळालेली खूप मोठी पावती होती. कारण त्या पिढीसाठीच हा कार्यक्रम होता. ‘संहिता उत्तम आहे. त्यातली एकही ओळ बदलण्याची आवश्यकता नाही’, असं मिलींद गाडगीळ यांनी सांगितलं. ‘तू इतकं मोठं काम केलं आहेस की आता आणखी काही कार्य केलं नाहीस तरी चालेल’ असं म्हणत विक्रमरावांनी शाबासकी दिली. सावरकरांवर असा कार्यक्रम होऊ शकतो अशी कल्पनाच केली नसल्याची बहुतेकांची प्रतिक्रिया खूप समाधान देणारी होती. ‘शतजन्म’च्या तीन तासांच्या पहिल्या प्रयोगाचं, वीस मिनिटांच्या जाहिरातींसह कोणतीही काटछाट न करता १० जून २००७ला ईटीव्हीवर प्रक्षेपण झालं. ‘सावरकर’ या दुर्लक्षित व्यक्तिमत्वाला एका वाहिनीनं दिलेली ही मानवंदना हे ही शतजन्मचं मोठं यश. ज्यांच्या प्रेरणेनं मी सावरकर स्मारकाचं काम पाहू लागले ते माझे वडील त्यावेळी हयात नव्हते ही बोच मात्र सततची आहे. शतजन्मचे पासष्टच्या वर प्रयोग झाले असले तरी या कार्यक्रमाचं सर्वात मोठं यश म्हणजे ‘शतजन्म’ नंतर उभे राहिलेले वीर सावरकरांवरचे अनेक कार्यक्रम. शतजन्मसाठी स्वरबद्ध केलेली गीतंच आज बहुतेक कार्यक्रमात गायली जातात.‘शतजन्म’चा प्रयोग आणि त्याची निर्मिती हा माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ‘तुमच्या जीवनाचं सार्थक झालं’, ही जेष्ठ कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया हीच आहे माझी ‘शतजन्म’बद्दलची भावना.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here