स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या २६ फेब्रुवारी या दिवशी येत असलेल्या ५७ व्या आत्मार्पणदिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर यांनी २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांमधून स्वातंत्र्यवीरांना नव्या पिढीसमोरही अतिशय संवेदनात्मक पद्धतीने सादर करून आदरांजली वाहिली जाणार आहे.
शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ या विषयावरील योगेंद्र आर. पाटील यांच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर- राजे यांच्याहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, पाचोरा येथील श्रेयस मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयंत पाटील, अंजली गवळी आदींचा समावेश आहे.
शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘माझी जन्मठेप’ वर आधारित नाट्याविष्कार सादर होईल. सायंकाळी ६ वाजता हे अभिवाचन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर सभागृहात करण्यात येईल. ‘माझी जन्मठेप’च्या अभिवाचनाच्या रंगमंचीय अविष्काराचा हा पहिलाच प्रयोग आहे. याची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची असून दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे. संकलन अलका गोडबोले, शब्दोच्चारासंबंधातील मार्गदर्शन सुहास सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांचे तर प्रकाश योजना शाम चव्हाण यांची आहे. या अभिवाचनामध्ये अभिजीत धोत्रे, अमृता कुलकर्णी, नवसाजी कुडव, जान्हवी दरेकर, शंतनू अंबाडेकर, मुग्धा गाडगीळ- बोपर्डीकर, कुंतक गायधनी हे कलाकार सहभागी होणार आहेत. नाट्यसंपदा कलामंचची निर्मिती असलेला हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने सादर होत आहे.
रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या ५७ व्या आत्मार्पणाच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य आणि कार्यकर्तृत्वावर आधारित दृकश्राव्य, संगीतमय भव्य कार्यक्रम ‘शतजन्म शोधताना’ सायंकाळी ६ वा होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र मिलटरी स्कूल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांची ही निर्मिती आहे. संस्कृती कला मंदिर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
Join Our WhatsApp Community