विनायकाची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली. आईनंतर आईच्याच मायेने येसूवाहिनीने त्यांच्यावर प्रेम केलं, सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढलं आणि देशासाठी लढलं सुद्धा! विनायकराव परदेशात असतांना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन्ही स्त्रिया उघड्यावर पडल्या. अशा अवस्थेत आपल्या परमप्रिय वहिनीला लिहिलेल्या पत्रात विनायकराव म्हणतात,
तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती
रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच
तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती
रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच
‘सांत्वन’ नावाचं हे सावरकरी काव्य ! इतकी उलथापालथ घडूनही, आभाळाहून मोठं संकट येऊनही आपली वहिनी, आपली बायको, खंबीरपणे सगळ्यावर मात करेल हा त्या स्त्रीवर दाखवलेला विश्वास, विनायकरावांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असला तर स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: जबाबदारीने संकटाशी सामना करावा असेच तात्या सुचवतात, होय ना!
विनायक जिथे वाढला तो भाग आणि तो काळ एका संकुचित, रूढीग्रस्त मानसिकतेत जगणारा. रांधण्यात आणि वाढण्यात जन्म घालवावा बायकांनी, बाकी रमूच नये कशात अशीच तेव्हाची रीत. पण चूल आणि मुल वाट्याला येण्याआधीच ज्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण दुर्दैवाने ओढून नेले, अशांचे अभाग्यांचे काय? अशांच्या भाळी लिहिल्या होत्या अबोल यातना फक्त! या निष्पाप स्त्रियांच्या वेदनांना शब्दरूप दिलय विनायकाने. बालविधवांचे दु:खस्थिती कथन हे विनायकाचे काव्य अशा अनेक मूक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. ‘ही विवाहव्यवस्था आहे ही वैधव्यव्यवस्था’ असा करडा सवाल विनायकराव करतात तो उगाच नाही, स्त्रीने सती जाणे हे धर्माला मान्य नाहीच शिवाय ते माणुसकीलाही लाज आणणारे आहे असं विनायकराव सप्रमाण पटवून देतात हे विशेष!
आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी
गुलामगिरी मान्यच नव्हती तात्यांना! माझी भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये, तिची गुलामगिरी संपावी तशीच आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी, मुक्तपणे तिने करावा संचार या मताचे होते तात्या! ‘राज्याची सूत्र हाती घेतो तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जिच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे!’ असं म्हणत सहजीवनाचा केवढा आदर्श सांगितलाय तात्यांनी! ‘स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नीतीमत्ता, पक्षपाती नि टाकाऊ आहे’ हे तात्यांचे वाक्य वाचले की वाटते हा माणूस वैचारिकदृष्ट्या सगळ्या समकालीन नेत्यांच्या किती पुढे गेला असेल, किती प्रगल्भ असेल.
आजच्या बायका तात्यांचा सल्ला खुबीने राखताहेत
हा माणूस सौंदर्याचा उपासक होता. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत्त महन्मधुर त्याचा ध्यास घेतलेला होता. जीवनात कुठल्याही बाबतीत कुरूपता त्यांना नकोच होती. आपल्या दूरस्थ वहिनी आणि पत्नीला ‘नवकुसुमयुता’ असं लोभसपणाने म्हणणारे विनायकराव समस्त स्त्रीवर्गाला सांगतात…’, ‘लावण्यवती कुमारीनो, जननिंनो, तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीला, तुमच्या सौंदर्याला आपल्या पूर्वपुण्याईचं वरदान माना आणि ते सौंदर्य जपा! हल्लीच्या आधुनिक काळात, सौंदर्य प्रसाधने वापरा, खुलून दिसा!’ …विनायकराव हा विचार अशा काळात सांगत होते जिथे त्यांचे हे शब्द ऐकून बायका गालातल्या गालात, खुदकन हसून लाजेने चूर होण्याचीच शक्यताच जास्त होती, पण आजच्या बायका तात्यांचा हा सल्ला खुबीने राखताहेत खऱ्या…!
एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरले
एके ठिकाणी मॅझिनीच्या विचाराचा संदर्भ देतांना विनायकराव म्हणाले, ‘पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाहीत.’ हा विचार देऊन आताशा पन्नास वर्ष उलटूनही गेली असावीत. तात्यांच्या कल्पनेतली शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होतांना फार वर्ष लागलेले नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरले. आज घराघरात आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई मोठ्या अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, वादळ पेलते आहे आणि लढते आहे. तिच्या प्रत्येक भरारीसोबत एक नवं आव्हान तिच्यासमोर उभ आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अश्या कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुद्धा नाहीत. या मुक्या वेदना समोर येतील तेव्हा काय होईल? कोणते नवे प्रश्न उभे रहातील? यापैकी अगदी सगळ्याच नाही पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या ‘सावरकरी’ विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे!
लेखक – पार्थ बावस्कर, सावरकर साहित्य अभ्यासक