Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नरेंद्र मोदी ह्यांचे हिंदुत्व

171
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नरेंद्र मोदी ह्यांचे हिंदुत्व
  • अरविंद विठ्ठल कुळकर्णी

‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे सावरकरांच्या राजनीतीचे प्रमुख सूत्र होते. राजकारण म्हणजे विधी, निर्बंध, सावरकरांना नको असलेल्या पण अजूनही प्रचलित असलेल्या शब्दात सांगायचे म्हणजे कायदा सिद्ध करण्याची संकल्पना करणे, त्यानुसार समाजाचे चलनवलन होण्यासाठी त्या संकल्पित विधी प्रस्तावाला अधिकृत शासकीय मान्यता मिळविणे, त्यासाठी आणि त्यापूर्वी लोकांचा विश्वास संपादन करणे, म्हणजे राजकारण असे सांगता येईल. समाज किती प्रगत आहे हे तो ज्या विधिविधानावर चालतो त्यावरून कळते. त्या विधिविधानामध्ये समाजाच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब नीट पडले आहे की नाही ह्यावरून समाजाचे राजकीय संतुलन कसे आहे ते कळते. समाजाचे विधिविधान करण्याचे अधिकार आपल्याकडे म्हणजे हिंदुमहासभेकडे असावे ह्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर म्हणजे १९३७ ते १९४७ ह्या काळात राजकारण केले. (Veer Savarkar)

स्वतंत्र भारतात काँग्रेस पक्ष सत्तारूढ झाला तर होणाऱ्या विधिविधानात मुसलमानांना अमर्याद सोयीसवलती दिल्या जातील आणि हिंदूंवर अन्याय होईल अशी भीती सावरकरांना वाटत होती. म्हणून त्यांनी १९४५-४६च्या निवडणुकीत, ‘तुमची सद्सद्विवेक बुद्धी आणि काँग्रेस’ ह्या पर्यायातून सावधपणे निवड करा असे आवाहन जनतेला केले होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवण्यातच आपली मोक्षप्राप्ती आहे असे मानले. स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर सावरकरांनी केलेले पहिले मोठे आणि त्यांचे ध्येयधोरण विस्ताराने शब्दांकित करणारे भाषण म्हणजे हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून कर्णावतीला १९३७ मध्ये त्यांनी केलेले भाषण. स्वतंत्र भारतात मुसलमानांना विधिसंमत जे अधिकार प्राप्त होतील त्यापेक्षा एकही जादा अधिकार हिंदू मागणार नाहीत असे आश्वासन निसंदिग्ध शब्दात त्यांनी दिले होते. तरीसुद्धा मुसलमानांना इस्लामी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भरपूर अधिकार देण्यात आले. हिंदू संस्कृतीच्या विषयात हिंदूंना तसे अधिकार देण्यात आले नाहीत. उलट त्यांचेवर जाचक निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय हित पुढे सरकण्याच्या दृष्टीने अन्यायकारक असमतोल निर्माण झाला. भारतातील मुसलमान मूळचे हिंदूच आहेत. त्यामुळे ते हिंदू संस्कृतीपासून दूर आणि विरोधात जाणार नाहीत अशी दक्षता विधिविधान करताना स्वतंत्र भारताने घेणे आवश्यक होते, पण ती काळजी घेतली गेली नाही. (Veer Savarkar)

येथे राजकारणाच्या हिंदूकरणाला सुरवात होते. हिंदुहित आणि राष्ट्रहित समकक्ष आहे. भारत हे प्राचीन काळापासून आजपर्यंत राष्ट्र म्हणून जे काही ज्ञात आहे त्या असण्याला हिंदुहित जपल्यामुळे पुष्टीच मिळते आणि हानी होत नाही. पण जर हिंदुहित जपले नाही तर त्याचा दुष्परिणाम राष्ट्राच्या स्वतंत्रतेवर, अखंडतेवर, एकात्मतेवर आणि सार्वभौमत्वावर होतो. म्हणून हिंदुहिताला हानी पोचेल असे राजकारण कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये असे सावरकर बजावत असत. स्वतंत्र भारतात कोणत्याही लोकसमुदायावर अन्याय न करता पण हिंदूहित जपलेच पाहिजे ह्या उद्दिष्टाने आणि निष्ठेने नित्य कर्तव्यरत राहणारा पहिला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. संविधानाचा अनुच्छेद ३७० विसर्जित करणे हे एकच उदाहरण पुरेसे आहे. नेहरूंच्या आशीर्वादाने आणि सहकार्यातून निर्माण झालेले, अब्दुल्ला घराण्याकडे चालवायला दिलेले, प्रत्यक्षात इस्लामी आतंकवाद्यांनी चालविलेले काश्मीर राज्य, भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला आव्हान देत हिंदूंच्या छाताडावर पाय रोवून ७५ वर्षे उर्मटपणे उभे होते. मोदींनी ते पंतप्रधान म्हणून मिळालेल्या शासकीय अधिकारात काय होते आहे ते कळायच्या आत भुईसपाट केले. आता इतर राज्यात हिंदू जसे मोकळेपणाने व्यवहार करू शकतात तसे ते काश्मीरमध्ये करू लागले. भविष्यात काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित होण्याचा धोका होता तो टळला. काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र बनविण्याचा आंतरराष्ट्रीय कट होता. मोदींनी तो उधळला. हिंदुहित आणि राष्ट्रहित समकक्ष ह्या समजुतीतून मोदींनी पावले उचलली आणि पांडवांपासून राजा हरिसिंगापर्यंतचे हिंदूंचे काश्मीर हिंदूंना परत मिळाले. काश्मीर खोऱ्यात हिंदू स्त्रियांची मासिक पाळी इस्लामी आतंकवाद्यांच्या भीतीने ऐन तिशीत बंद पडत होती. मोदींनी त्यांना अभय दिले. काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश झाला होता. काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा वटवृक्ष पुन्हा पल्लवित होऊ शकतो असा विश्वास मोदींनी निर्माण केला. (Veer Savarkar)

(हेही वाचा – ४ जूनला भाजपा आणि एनडीएचा विजय निश्चित; Amit Shah यांचा विश्वास)

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या देशात ते हिंदू आहेत म्हणून हिंदूंचा धार्मिक छळ होत असेल आणि त्यांना तेथे राहणे आपत्तीजनक होत असेल तर त्यांनी विश्वासाने भारतात परत यावे, येथे त्यांना निर्वासित म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून सन्मानाने जीवन जगता येईल असे विधिविधान पंतप्रधान मोदींनी संसदेकडून करवून घेतले आणि त्याप्रमाणे गेली कित्येक वर्षे निर्वासित म्हणून अधांतरी लटकत भारतात राहात असलेल्या हिंदूंना नागरिकत्वाचे अधिकार कागदोपत्री अर्पणही केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अभूतपूर्व वैशिष्ट्य हे आहे की त्याने अल्पसंख्यांकांना त्यांचे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट, तो त्यांचा अधिकारच आहे अशा विश्वासाने निर्माण करून दिले. बहुसंख्यांकांना त्यांचे राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार नाकारला आणि त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित केले. बहुसंख्यांकांनी कसे जगायचे ते स्वतंत्र भारतात अल्पसंख्यांक ठरवू लागले. बाराशे वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यावरील काँग्रेस संस्कृतीने निर्माण केलेला हा कलंक पुसून टाकण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. ते राजकारणाचे हिंदूकरण करीत आहेत आणि त्यामुळे राष्ट्रकारणही सुरक्षित राहिले आहे. (Veer Savarkar)

हिंदूंच्या सैनिकीकरणाचे दोन अर्थ आहेत. भारताची सेनादले आणि त्यांची आयुधे इत्यादी सरंक्षणसामुग्री इतकी आधुनिक, धारदार आणि शक्तिशाली झाली पाहिजेत की जगातील दुष्टांना त्याचा धाक वाटला पाहिजे आणि सुष्टांना आधार वाटला पाहिजे. काँग्रेसच्या राज्यात हे उलटे होते. स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिंदू-मुसलमान ऐक्य आणि अहिंसा ह्या दोन संकल्पनांना अतोनात महत्व प्राप्त झाले आणि त्यातून स्वतंत्र भारताची परराष्ट्र नीती आकारास येत गेली. अर्थातच हिंदुहिताकडे दुर्लक्ष झाले. सेनादलांकडे अनावश्यक बांडगूळ म्हणून काँग्रेस राज्यकर्त्यांनी पाहिले. सेनादलांवर लोकनियुक्त सरकारांचा अंकुश पाहिजे हे खरे पण सेनादलाचे इतर सरकारी खात्यांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्र असते आणि त्यांची कार्यशैलीही वेगळी असते. त्या कार्यशैलीला यशप्राप्तीच्या दृष्टीने काहीसे अनिर्बंध संचार स्वातंत्र्य हवे असते. काँग्रेस राज्यात ते मिळत नव्हते. मोदींनी ते स्वातंत्र्य त्यांना दिले. मोदींनी परदेशी राष्ट्रांशी डोळ्याला डोळा भिडवून बोलण्याची भाषा केली. शेजारी राष्ट्रांचे संदर्भात वेळ पडल्यास घरात घुसून मारण्याची भाषा केली. हे पहिल्यांदा घडत होते. त्याचा भारतीय सेनादलांवर आणि शेजारी राष्ट्रांवर अनुकूल परिणाम दिसून आला. हिंदूंच्या सैनिकीकरणाचा दुसराही अर्थ आहे. हिंदू मानसिकता अनुशासनबद्ध, वेळेचे महत्व ओळखणारी, प्रतिकारक्षम आणि उत्सुक, अखंड सावधान आणि युद्धमान अवस्थेत असणारी अशी सावरकरांना हवी होती. मोदी प्रत्येक भारतीयाला आत्मनिर्भर करू पाहत आहेत. तो हिंदूंचे सैनिकीकरण ह्या धोरणाचा भाग आहे. (Veer Savarkar)

सावरकरांनी ‘हिंदुत्व’ ग्रंथ लिहिला. हिंदू समाज, संस्कृती आणि राष्ट्र ही संकल्पना साफ पुसून टाकण्याचा खटाटोप ब्रिटिश, मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्या संघटनांकडून कळतनकळत आणि कमीजास्त प्रमाणात होत होता. ते राष्ट्रीय संकट होते. ते संकट परतवून लावण्यासाठी हिंदूंना बळ मिळावे आणि त्यासाठी आवश्यक ते आत्मभान त्यांना प्राप्त व्हावे म्हणून ‘हिंदुत्व’ ग्रंथाची निर्मिती झाली. हिंदू परंपरांचा गौरव करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मुंबईत १७ मे ह्या दिवशी शिवाजी उद्यानावर लोकसभा निवडणुकीची जी प्रगट सभा झाली त्यात ते म्हणाले, ‘जिन्हें कोई पुछता नही, उनको मै पूजता हूं.’ ह्यात एका अर्थाने हिंदुत्व आहे. आपल्याला अत्यंत उदात्त आणि विजिगीषू संस्कृतीचा असाधारण वारसा लाभलेला आहे, आपल्याला राष्ट्र बनण्याचा आणि जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने महासत्ता बनण्याचा हक्क आहे ही ईर्षा निर्माण करण्यासाठी सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ह्यांचे गेल्या दहा वर्षांतील ध्येयधोरण आणि व्यवहार पाहिला म्हणजे त्यांनी राष्ट्र निर्माता सावरकरांचा हा ग्रंथ मन:पूर्वक वाचला आहे असे वाटते. हिंदूंचा ह्या देशाशी काही संबंध नाही. ते बाहेरून आले आहेत असा सिद्धांत मांडण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. हिंदूंचा इतिहास हा पराभूत लोकांचा इतिहास आहे अशी मांडणी ब्रिटिशांनी केली. आपण काही कारणाने हा देश सोडून गेलो तरी हिंदू आपल्या बौद्धिक पारतंत्र्यात निरंतर राहतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. हे भ्रम परतवून लावण्यासाठी झुंजणाऱ्यांमध्ये सावरकर अग्रणी होते. काँग्रेसने मुसलमानांकडे मतपेढी म्हणून पाहिले. त्यांच्या मतांसाठी हिंदूंना कायम त्यांच्या धाकात ठेवण्याचा कट काँग्रेसने रचला. हिंदूंच्या स्वातंत्र्याचा करता येईल तेव्हढा संकोच काँग्रेसने केला. अर्थात मुसलमानांच्या क्रूरतेला काँग्रेस नेहमीच घाबरत होती. सत्य हे आहे की ब्रिटिशांना आणि काँग्रेसला भारत जसा घडायला हवा होता तसे घडू न देण्यात सावरकर आणि मोदी हे दोन नरपुंगव कारणीभूत ठरले. ब्रिटिशांनी जेवढा सावरकरांचा द्वेष केला, तेव्हढा काँग्रेस मोदींचा करीत आहे. (Veer Savarkar)

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.