Veer Savarkar : कारागृहातील सुटकेनंतर सावरकरांनी समाजक्रांतीची सुरुवात कशी केली?

Veer Savarkar : सावरकर केवळ भाषणे देऊन आणि लेख लिहून स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण त्यांचे वर्णन 'कर्ते सुधारक' असे केले पाहिजे.

243
Veer Savarkar : कारागृहातील सुटकेनंतर सावरकरांनी समाजक्रांतीची सुरुवात कशी केली?
Veer Savarkar : कारागृहातील सुटकेनंतर सावरकरांनी समाजक्रांतीची सुरुवात कशी केली?

डॉ. गिरीश पिंपळे

मे १९२१ मध्ये इंग्रज सरकारने सावरकरांना अंदमानहून भारतात आणले. (Veer Savarkar) पण त्यांची तुरुंगातून सुटका केली नाही. त्यांना अलीपूर (कोलकाता), रत्नागिरी आणि येरवडा (Yerwada Jail) येथील तुरुंगात ठेवण्यात आले. अखेरीस जानेवारी १९२४ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली; पण तीदेखील दोन बंधने घालून. ती बंधने अशी होती – १) राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि २) जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा सोडायचा नाही. सुरुवातीला ही बंधने फक्त पाच वर्षांसाठी होती. पण पुढे सरकारने ही मुदत वाढवत १३ वर्षांपर्यंत नेली. यापैकी पहिल्या बंधनाचे सावरकरांनी एका मोठ्या संधीत रूपांतर केले आणि हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याची फार मोठी चळवळ उभी केली.

(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये)

७ बेड्यांच्या जोखडातून समाजाला मुक्त करणारे ‘कर्ते सुधारक’

त्यांनी आपल्या देशाच्या इतिहासाचा गाढा अभ्यास केलेला होता. हिंदूंची राज्ये कशामुळे लयाला गेली, हिंदू समाज (Hindu society) कशामुळे मागे राहिला, याचे चिंतन त्यांनी अनेक वर्षे केले होते. या परिस्थितीचे एक प्रमुख कारण त्यांच्या लक्षात आले होते – हिंदू लोकांचा देवभोळेपणा आणि कालबाह्य झालेल्या अनेक रूढी – परंपरांना चिकटून राहण्याची त्यांची मनोवृत्ती. त्या काळी हिंदू समाजात ७ बंद्या होत्या – सिंधुबंदी (समुद्र न ओलांडणे), रोटीबंदी (दलित व्यक्तीबरोबर भोजन न करणे), वेदोक्तबंदी (स्त्रियांना आणि दलितांना वेद वाचण्यास बंदी), बेटीबंदी (दलित आणि सवर्ण यांच्यात विवाह न होणे), स्पर्शबंदी (दलितांना सवर्णांनी स्पर्श न करणे), व्यवसायबंदी (दलित व्यक्तींना इतर व्यवसाय करण्यास बंदी) आणि शुद्धीबंदी (इतर धर्मात गेलेल्या व्यक्तीला शुद्ध करून परत हिंदु धर्मात आणण्यास बंदी).

सावरकरांनी या बंद्यांचे वर्णन ‘बेड्या’ असे केले आणि या बेड्यांमुळे हिंदू समाज जखडून गेला आहे, त्याची अधोगती होत आहे, असे ठाम प्रतिपादन केले. विशेष म्हणजे ते केवळ भाषणे देऊन आणि लेख लिहून स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण त्यांचे वर्णन ‘कर्ते सुधारक’ असे केले पाहिजे. त्यांच्या या महान कार्यामुळे हिंदू समाजात क्रांतीच घडून आली.

स्पर्शबंदीच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी केलेले कार्य

या क्रांतीची सुरुवात झाली, स्पर्शबंदी या बेडीवर त्यांनी केलेल्या प्रहारामुळे. झाले असे की, त्या काळी दलित आणि सवर्ण यांच्या मुलांना शाळांमध्ये स्वतंत्र बसवले जात असे. या प्रथेमुळे मुलांवर अगदी लहानपणीच अतिशय चुकीचा संस्कार होत होता. सावरकरांनी ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी आघाडी उघडली. सनातनी विचारांच्या हिंदूंनी त्यांना जोरदार विरोध केला; पण सावरकर आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. त्यांनी याबाबत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची मदत मागितली. कर्मठ हिंदू आपल्या मुलांना मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातील मुलांशेजारी बसवायला मात्र कोणताच आक्षेप घेत नसत. ही गोष्ट सावरकर आपल्या भाषणात सतत लक्षात आणून देत असत. सनातनी हिंदूंना उद्देशून ते म्हणत, ”अरे, आपल्या स्वत:च्या धर्माच्या लोकांना तुम्ही कुत्र्या-मांजरांपेक्षाही वाईट वागवता हे योग्य आहे काय?”

ही पद्धत बंद व्हावी; म्हणून त्यांनी जिल्हा दंडाधिका-यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ”जे गडबड करतील, त्यांना निर्बंधांचा इंगा दाखवा…महाशय, जिल्हा दंडाधिकारी या नात्याने तुम्ही अस्पृश्य मुलांच्या प्रश्नात निर्बंधांचे संरक्षण द्यावे, अशी तर माझी इच्छा आहेच, पण त्याबरोबरच एक सद्गृहस्थ म्हणून तुम्ही या प्रकरणी मानवी सहानुकम्पा दाखवावी, अशीही माझी तुम्हाला विनंती आहे.”

(हेही वाचा – App Based Cabs : मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल)

सामाजिक क्रांतिकारक म्हणून इतिहासात सावरकरांची नोंद

सावरकरांनी याबाबत अतिशय चिकाटीने आपला संघर्ष सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सर्व जातीच्या मुलांना एकत्र बसवण्यात येऊ लागले. याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्याने पाहणी केली आणि शेरा लिहिला, ”अस्पृश्य मुलांना इतरांबरोबर सरमिसळ बसू देण्यात येत आहे आणि त्यांच्या बाबतीत कोणताही दुष्ट भेदभाव न होता त्यांना शिक्षण घेता येत आहे. हा श्री. सावरकर यांच्या व्याख्यानांनी घडून आलेला सुपरिणाम आहे.”

सावरकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे – ”मी समुद्रात उडी मारली होती, ही गोष्ट तुम्ही विसरलात, तरी चालेल; पण माझे सामाजिक सुधारणांच्या (Social reforms) बाबतीतील विचार तुम्ही विसरू नका.” त्यांचे हे उद्गार खूप महत्त्वाचे आणि दिशादर्शक आहेत. या सामाजिक क्रांतीची सुरुवात, वर सांगितलेल्या लढ्यापासून झाली. इतिहासात सावरकरांची नोंद केवळ राजकीय क्रांतिकारक नव्हे, तर सामाजिक क्रांतिकारक अशीदेखील झाली आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. त्यांनी प्रारंभ केलेली सामाजिक क्रांती अद्याप – म्हणजे १०० वर्षे उलटूनसुद्धा पूर्ण झालेली नाही. ते काम पिढ्यान् पिढ्या चालणारे आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

(लेखक हे सावरकर साहित्याचे अभ्यासक आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.