स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१वी जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेकानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कला दालना’चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन बुधवारी, २३ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध रिस्टोरेशन आर्किटेक्ट व कन्सल्टंट चेतन रायकर, ‘लोकल बंधन’चे सागर पगार आणि मराठी संवर्धन मंडळाच्या सुप्रिया दरेकर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने सईशा प्रोडक्शन्स निर्मित आणि प्रस्तुत असलेल्या या कलादालनाचा उद्देश शिवकालिन संस्कृती, परंपरा, छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व आणि पराक्रमाची ओळख जगाला करून देणे हा आहे.
या प्रदर्शनाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१वी जयंती आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा शिवराज्याभिषेक वर्षसोहळा आपण साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दैवत होतं. त्यामुळे यावर्षी शिवसंस्कार, संगीत शिवस्वराज्यगाथा अशा भव्य उपक्रमांचे आयोजन आम्ही केले आहे.
(हेही वाचा – FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा अर्जेंटिनाकडून लाजिरवाणा पराभव, पुरुषांचा मात्र पेनल्टी-शूटआऊटवर विजय)
शिवसंस्कार कलादालनाची संकल्पना आणि संकलन
शिवकालिन संस्कृती, आपल्या परंपरा, आपले सण, लोककला, गडकिल्ले, शस्त्रास्त्र, परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा विविध विषयांवरील चित्रकाव्यांनी हे ‘शिवसंस्कार कलादालन’ समृद्ध आहे. या उपक्रमात काही विशेष रंगीत चित्रांसाठी चित्रकार राम देशमुख यांचे विशेष साहाय्य लाभले आहे. या कलादालनाची संकल्पना, लेखन, काव्य अनिल नलावडे यांचे असून, निर्मिती प्रमुख आणि संकलन पद्मश्री राव यांनी केले आहे.
कलादालनाची वेळ
संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा सर्वच विषयांवर आधारित १०० चित्रकाव्यांचे भव्य कलादालन ४ दिवस म्हणजेच दि. २३ ते २६ मे २०२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये उभारण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे दालन सर्वांसाठी खुले आहे.
हेही पहा –