Veer Savarkar: स्वार्थी खुलासे करण्याऐवजी सावरकरांचे साहित्यातील स्थान समजून घ्या!

41
विद्याधर नारगोलकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली (All India Marathi Sahitya Sanmelan Delhi) येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाचे आयोजन पुण्यातील सरहद संस्थेने (Sarhad Institution) केले आहे. त्या संस्थेचे संस्थापक संजय नहार (Sanjay Nahar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (swatantryaveer savarkar) छायाचित्र नसल्याबद्दल आपले विचार सांगितले. ते म्हणतात, महाराष्ट्रात दोन वैचारिक गट होते, जहाल गट व मावळ गट. मवाळ गटाचे गोपाळ कृष्ण गोखले व जहाल गटाचे लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांची छायाचित्रे घेण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र घेतले नाही. (Veer Savarkar)

महाराष्ट्रात मवाळ आणि जहाल हे गट होते, ते राजकारणात दिसून येतात. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कार्य करणारऱ्यांच्या विचारांचे ते दोन प्रवाह होते. ते प्रवाही विचार साहित्यासाठी व आपल्या फायद्यासाठी घेणे ही अरसिक वृत्ती म्हणावी लागेल. साहित्यात जर असे विचार घ्यायचेच असतील, तर जहाल गटाचे पु. भा. भावे आणि मवाळ गटाचे पु. ल. देशपांडे यांची छायाचित्रे घ्यायला पाहिजे होती. हे दोघेही पूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. महत्त्वाची गोष्ट दोघेही सावरकरी साहित्याला व त्यांना मानत होते. पु. भा. भावे यांची विचारधारा सावरकरांच्या विचारधारेत मिसळणारी होती. पण पु. ल. देशपांडे यांनी अंदमानच्या कोठडीत सावरकरांना वाहिलेली श्रद्धांजली नहार यांनी ऐकावी व मग सावरकरांचे साहित्यातील स्थान समजून घ्यावे.

येथे पु. ल. देशपांडे यांनी सावरकरांची सांगितलेली आठवण नहार आपल्यापुढे ठेवतो. महाराष्ट्रातील म्हैसाळ या गावी श्री. देवल यांनी समाजातील दलित स्त्रियांना घेऊन त्या काळी सहकारी दूध संस्था काढली होती. तेथील कार्यक्रमात स्वागतासाठी देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी तेथील त्या महिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तु ते श्री महन्मंगले” हे गीत सुंदर आवाजात व तालात सादर केले, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. त्यानंतर ते म्हणाले, सावरकरांचे खरे कार्य आपण करीत आहात. हा सावरकरांच्या (Veer Savarkar) साहित्याचा झंकार आहे.

(हेही वाचा – गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक)

पुण्यात झालेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षस्थान मवाळ गटाचे भाई वैद्य हे पुण्याचे महापौर असल्यामुळे त्यांच्याकडे होते. त्या कार्यक्रमाचे स्वागत गीत म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर या कवीचे “जयोस्तुते श्री महन्मंगले” या काव्यानेच झाले. ९२ वर्षांपूर्वी म्हणजेच २२ फेब्रुवारी १९३३ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रत्नागिरी येथील भागेश्वर मंदिरात शिवू भंगी या सावरकरांच्या विद्यार्थ्याने गीतेचा १२ वा अध्याय म्हणून,

मी तहान जल तो जाण / मी कुडी माझा तो प्राण /
मी भक्त नि तो भगवान / चरण त्याचे शिवुं द्या / 
मला देवाचे दर्शन घेऊ द्या /
डोळे भरून देवास मला पाहू द्या // 

हे कवी सावरकरांनी (Veer Savarkar)रचलेले गीत म्हणून मंदिरात प्रवेश केला. त्या वेळची परिस्थिती डोळ्यासमोर उभी करून हे गीत आपण त्या भावात म्हणाल, तर नहार, आजही आपल्या नेत्रातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ही त्या साहित्यिकाची सरस्वतीची सेवा आहे.

सावरकरांचा ‘भाषा शुद्धी’ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, सावरकर मराठी शब्द वापरा, असे सांगत. पुण्यातील सुप्रसिद्ध विद्वान दत्तो वामन पोतदार हे १९३६ मध्ये रत्नागिरीस सावरकरांना जाऊन भेटले, ते म्हणतात ‘आम्ही भाषा शुद्धीवरच बोललो.’ पोद्दार म्हणाले, ‘’तात्याराव आम्ही जे परकीय शब्द आत्मसात केले आणि पचवून टाकले ही आमची विजय चिन्हे आहेत.’’ असे म्हणताच सावरकर ताडकन म्हणाले, ‘’दत्तोपंत चुकताय आपण. ती काही आमची विजय चिन्हे नाहीत. ते आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.’’ या सावरकरांच्या म्हणण्यात काय चूक होती? स्वराज्य स्थापन होताच शिवरायांनी रघुनाथ पंडितांना राजव्यवहार कोष करण्याची आज्ञा केली. ही कर्तव्यदृष्टी होती, म्हणूनच सावरकरांनी परराज्याचे जू झुगारण्याच्या प्रयत्नाबरोबरच परकीय भाषांचंही जू झुगारायला शिकवलं.

(हेही वाचा – Transfer : १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर बदली यांची वन विभागात बदली)

भाषाशुद्धीवर सावरकरांनी पहिला लेख १९२५ मध्ये लिहिला आणि शेवटचा लेख केसरीमध्ये १९५१ मध्ये लिहिला, अशा प्रकारे सतत २५ वर्षे मराठीच्या भाषाशुद्धीचा नेटाने प्रचार करीत होते; म्हणूनच नू.म.वि. हायस्कूलचे प्रशाळा झाले. अत्रे हे प्रिन्सिपॉल होते, त्याचे आचार्य झाले. वेलणकर सांगलीच्या मिलचे १९४० पर्यंत मालक होते; पण ३० जुलै १९४१ ला सावरकर सांगलीला गेले व मालकाचे ते धनी झाले. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीत आणि दैनंदिन व्यवहारात सावरकरांमुळे ३०० ते ४०० मराठी शब्द महाराष्ट्राला वापरायची सवय झाली. (Veer Savarkar)

‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’ या संदेशामुळे सावरकरांचे जे भाषण अत्यंत गाजलं, त्या १५ एप्रिल १९३८ ला मुंबईत झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना त्यांनी व्यासांच्या महाभारतातल्या वचनाचाच आधार दिला. ते म्हणाले, आजच्या राष्ट्रीय परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे. तेव्हा तरुणांचं पहिलं कर्तव्य आहे ‘सैनिकी शिक्षण’ ! कारण सर्व साहित्यिकांचा सम्राट जो व्यास त्यानेच स्पष्टपणे सांगितले आहे की, (म.भा.१२-७८-१८)

अमर्याद प्रवृत्ते च शत्रुभि: संगरे कृते /
सर्वे वर्णाश्र्च दृश्येयु: शस्त्रवंतो युधिष्ठिर //

हे सध्याच्या परिस्थितीत ‘सैनिकी शिक्षणाचे महत्त्व’ या राष्ट्रासाठी सांगण्याचे कार्य दिल्लीत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्याचे उद्गाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र व्यासपिठावर लावून महाराष्ट्र हा भारताचा खड्ग हस्त झाला पाहिजे, ही त्यांची गर्जना हिंदुस्थानभर दुमदुमण्यासाठी आपण त्याचे श्रेय घ्यावे आणि मनाचा मोठेपणा दाखवावा, हीच विनंती.

(लेखक ‘पुणे सार्वजनिक सभा’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळा’चे अध्यक्ष, तसेच हर घर सावरकर समितीचे कार्यकर्ता आहेत.)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.