Veer Savarkar Jayanti 2023: ‘शोध हा नवा- शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमातून वीर सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन

309

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्ताने २८ मे रोजी ‘शोध हा नवा- शतजन्म शोधिताना’ हा कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड निर्मित ‘शोध हा नवा- शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमींनी उपस्थिती लावली होती.

वीर सावरकारांची अलौकिक प्रतिभा आणि कार्यकर्तृत्वार आधारित दृकश्राव्य, नृत्य, नाट्य, संगीतमय कार्यक्रमातून सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितिन सरदेसाई यांचा स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते वीर सावरकरांचे स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वीर सावरकरांच्या १४०व्या जयंती दिवशी सावरकरांच्या कुटुंबियांकडून सावरकर स्मारकात माझा गौरव होणे ही भाग्याची बाब असल्याचे नितिन सरदेसाई म्हणाले.

New Project 2023 05 28T164124.824

स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त क्रांतिकारक नसून ते उत्तम साहित्यिक, नाट्यलेखक, विचारवंत, दुरदृष्टी असलेले द्रष्टे राजकारणी, विज्ञानवादी, इतिहास संशोधक, पत्रकार आणि अस्पृश्यता निवारक होते. वीर सावरकरांनी आंग्ल भाषेतील अनेक शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द निर्माण केले, जे आज मराठी भाषेत प्रचलित झाले आहेत. १० हजार पानांचे साहित्य आणि १२ हजार कवितेच्या ओळी लिहिणाऱ्या वीर सावरकरांच्या साहित्याच्या आधारे ‘शोध नवा – शत जन्म शोधिताना’ या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निवेदनाची धुरा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सांभाळली. तसेच श्रीराम केळकर यांनीही निवेदन केले. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन, वर्षा भावे, नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई, संगीत संयोजन कलमेश भडकमकर यांचे होते. ‘जयोस्तु ते…’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ‘ने मजसी ने परत या मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ गाण्याने कार्यक्रमांचा समारोप झाला.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023: धर्म स्वातंत्र्यवीर सावरकरांचा)

दरम्यान या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मनसे नेते नितिन सरदेसाई, श्रीमंत जाधव, विजय पाडवल, अॅड. रमेश सिंग, हरिश्चंद्र शिंदे यांचा सत्कार केला.

New Project 2023 05 28T164241.457

असा झाला कार्यक्रम

  • आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकला, त्यांच्या या वीरश्रीचे वर्णन करणारा वीर सावरकर यांनी लिहिलेला पोवडा उपस्थितांमध्ये चेतना जागृत करून गेला.
  • सावरकर यांनी लिहिलेली लावणी रसिकांना सभ्यतेची आणि नैतिकेची शिकवण देवून गेली.
  • सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची लिहिलेली आरती आणि त्यांचे गुणगान गाणारे ‘हे हिंदू शक्ती…’ या गाण्यांनी रसिकांमध्ये शिवरायांप्रती अभिमान जागृत केला.
  • पुरी येथे श्री जगन्नाथाच्या भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वीर सावरकर यांनी या रथोत्सवाच्या भव्योदत्त कल्पनेचे केलेले शब्दचित्र म्हणजे जगन्नाथाचा रथोत्सव, त्याचेही उत्तम सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. हे गीत रसिकांना थेट श्री जगन्नाथाच्या रथोत्सवाची अनुभूती देऊन गेले.
  • पानिपतचे युद्ध झाले, पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला, पण दुर्दैवाने हे युद्ध मराठे हरले. पानिपत पुण्याच्या उत्तरेला आहे, त्यामुळे उत्तर जिंकण्याची जी क्रिया ती ‘उत्तरक्रिया’ असा संदेश सावरकर यांनी दिला. त्या हरलेल्या पानिपत युद्धाचा सूड घ्या, असा संदेश वीर सावरकर यांनी या नाटकातून दिला. या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करण्यात आला, ज्याने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.

New Project 2023 05 28T164332.945

  • रत्नागिरीत स्थानबद्ध असताना वीर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे महान कार्य केले. त्यावेळी त्यांनी पतीत पावन मंदिर उभारून पूर्वास्पृश्यांना गाभाऱ्यात जावून देवाचे दर्शन घेवू दिले, त्यावेळीची पूर्वास्पृश्यांची अवस्था वीर सावरकर यांनी ‘मला देवाचे दर्शन घेवू द्या…’ या गीताच्या माध्यमातून मांडली, या कार्यक्रमात हे गीत नृत्याच्या आधारे सादर करून कलाकारांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले.
  • जातीपातीत अडकलेल्या हिंदूंना तुम्ही एक आहात असा संदेश देणारे वीर सावरकरांचे ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू..’ हे काव्य आजही हिंदू समाजाला लागू पडते, याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले.
  • कार्यक्रमाच्या संहितेतून वीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजप्रबोधनाचे महान कार्य अधोरेखित झाले. परदेशात असताना आपल्या मातृभूमीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेले असताना वीर सावरकर यांना सागराला साद घालत ‘ने मजसी ने परत या मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ हे गीत स्फुरले. या गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
  • ज्येष्ठ गायिका वर्षा भावे यांनी गायलेले कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘शतजन्म शोधिताना’ आणि मयूर सुकाळे यांनी गायलेला पोवाडा विशेष दाद मिळवून गेला.
  • अशा रीतीने वीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा, फटका, त्यांच्या नाटकातील प्रवेश, त्यांची छायाचित्रे, सावरकर चित्रपटातील दृश्य या साऱ्या माध्यमातून सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व या नाटकातून अधोरेखित झाले. वीर सावरकर यांचे विचार हे स्वतंत्र्य भारताच्या ७५ वर्षांनंतरही तंतोतंत लागू पडतात. सांप्रत काळात देश आणि धर्माचा अभिमान बाळगत असताना प्रसंगानुरूप कसा विचार करायला हवा, याचे मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या संहितेतून उपस्थित राष्ट्रप्रेमी रसिकांना झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.