स्वातंत्र्यवीर सावरकर हे निश्चयी मनाचे होते. एखादे कार्य हाती घेतले की, ते तडीस नेईपर्यंत कधी ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या या गुणाचे दर्शन अंदमानपर्व, रत्नागिरीपर्व, हिंदुमहासभा पर्व आणि सांगतापर्व या त्यांच्या आयुष्याच्या चार टप्प्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. मृत्यूच्या समयीदेखील त्यांच्यातील या गुणाचा अनुभव स्वत: त्यावेळी त्यांच्या सान्निध्यात राहिलेले प्रसिद्ध डाॅ. सुभाष पुरंदरे यांनी घेतला. तात्यारावांचे शरीर थकले होते, त्यामुळे आता माझा राष्ट्राला, समाजाला आणि स्वतःला असा कुणालाच उपयोग नाही, म्हणून मी आत्मार्पण करत आहे, असे सांगत तात्यारावांनी स्वत:चा आत्मा अर्पण केला. तात्यारावांवर तेव्हा उपचार केलेले डाॅ. सुभाष पुरंदरे यांचे त्यांच्याच शब्दांतील अनुभव…
सावरकर आणि पुरंदरे कुटुंबामधील कौटुंबिक संबंध
माझे वडील हे तात्याराव सावरकर आणि त्यांच्या कुटुंबांचे डॉक्टर होते. त्याआधी माझ्या वडिलांचे चुलते म्हणजे माझे आजोबा हे तात्याराव सावरकर यांचे डॉक्टर होते. म्हणजे सावरकर कुटुंबाचे डॉक्टर म्हणून आमची ही तिसरी पिढी आहे. माझे चुलते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आमच्या घरात सगळे जण हिंदू महासभेचे कार्य करत होते. आम्ही मूळचे विरार येथील आगाशीचे आहोत. तेथील हिंदूंना पोर्तुगिजांनी ख्रिश्चन बनवले होते, त्यावेळी माझे आजोबा त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून काही वर्षे काम करत होते. त्याचवेळी ते धर्मांतर झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्यांचे शुद्धीकरण करायचे. दादर येथे हिंदू महासभेची कचेरी होती, आमचे भवानी शंकर येथे मोठे घर होते. त्या घराच्या गॅलरीत हिंदू धर्मातून ख्रिश्चन झालेल्या हिंदूंना आणले जायचे. ज्यांना पुन्हा हिंदू व्हायचे आहे, विशेषतः ज्या दाम्पत्यांना हिंदू बनून विवाह करायचा असेल त्यांचा विवाह आमच्या घरी लावून दिला जायचा. तात्याराव सावरकर यांना हे कार्य खूप आवडायचे. त्यांनी आमच्या आजोबांना ‘शुद्धीवीर’ अशी पदवी दिली होती, पण ती कधी जाहीररीत्या दिली नव्हती. त्याची वाच्यता अधिक झाली नव्हती. अशाच शुद्धीकरणाच्या एका कार्यक्रमात तात्याराव प्रत्यक्ष हजर होते. माझे आजोबा गेल्यानंतर माझे वडील आणि मी तात्यारावांच्या घरी जाऊ लागलो. त्यांच्या घरच्यांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध होते आणि अजूनही आहेत. तात्यारावांशी मी कधी राजकीय विषयावर बोललो नाही, कारण माझी तेवढी हिंमतच झाली नाही. एवढ्या महान व्यक्तीशी आपण काय बोलणार आणि मीही त्यामानाने लहानच होतो.
(हेही वाचा भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भव्य थीमपार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्र्यांची घोषणा)
अंदमानात निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्ल्याने कायमचे पोटाचे दुखणे
तात्यारावांनी केव्हाही मला बोलावले तरी मी हजर असायचो. तात्यारावांचा आणि त्यांच्या घरच्यांचा माझ्या आजोबांवर जितका विश्वास होता, तितकाच माझे वडील आणि माझ्यावर होता. तात्यारावांना पोटाचे दुखणे खूप होते. तेव्हा ते मला म्हणाले होते की, ‘मी अंदमानात शिक्षा भोगत असताना जे काही खाल्ले ते इतके निकृष्ट होते की, मला कायमचे पोटाचे दुखणे झाले आहे.’ त्यांना फारसे काही पचत नव्हते, सहज पचेल असेच अन्न ते खात असत. तात्याराव भरपूर जेवले असे मला कधी आठवत नाही. पेज, भात, लापशी असे साधे जेवण ते जेवायचे. पुढे पुढे त्यांचा आजार इतका वाढला की, त्यांच्या पोटात नेहमी दुखायचे.
…आणि तात्यारावांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला
एक दिवशी त्यांनी मला बोलावले आणि मला त्यांनी लिहिलेला एक लेख वाचायला दिला. ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ असे त्याचे शीर्षक होते. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, यापुढे तुम्ही आमच्याकडे डॉक्टर म्हणून येऊ नका. मात्र इतरांसाठी आमच्याकडे नेहमी येत चला. मी या लेखात जे लिहिले आहे त्याप्रमाणे मला आत्मार्पण करायचे आहे. कृपा करून मला काही औषधे देऊ नका. कुठल्याही प्रकारचे औषध मी घेणार नाही. तुम्ही मला नेहमी नुसते भेटत जा. त्यावेळी मी चकीत झालो. माझ्यापुढे प्रश्न पडला की, इतक्या महान व्यक्तीला औषधाविना कसे ठेवायचे? माझ्याबरोबर डॉ. अरविंद गोडबोले होते. त्यांना मी कळवले. त्यानंतर त्यांनीही पाहिले, तेही हिंदू महासभेचे होते. मी आणि डॉ. गोडबोले दोघांनी त्यावेळीचे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आर.व्ही. साठ्ये यांना बोलावले. मग आम्ही सगळ्यांनी ठरवले की, जर इतक्या महान व्यक्तीला उपचार नको आहेत, तर मग त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. म्हणून आम्ही काही केले नाही. त्यानंतर तात्यारावांची तब्येत दिवसेंदिवस झपाट्याने ढासळत गेली. फक्त काही दिवस तात्यारावांच्या मुलाच्या आग्रहाने डॉ. मराठे यांच्या सहकार्याने तात्यारावांना ऑक्सिजन दिला. बाकी काही नाही. ना ग्लुकोजच्या बाटल्या लावल्या, ना दुसरे काही दिले.
तात्याराव कौतुकास्पद व्यक्तीमत्व
मला तात्यारावांचे नेहमीच कौतुक वाटायचे. ‘मी मृत्यूला घाबरत नाही’ असे म्हणणारे असे अनेक रुग्ण मी पाहिले. माणूस कितीही शूर असला तरी शेवटच्या क्षणाला तो म्हणतोच, ‘डॉक्टर काही तरी करा, मोठ्या डॉक्टरला बोलवा. हॉस्पिटलमध्ये न्या’, असे म्हणत विनवण्या करतो. तात्यारावांच्या बाबतीत ते उलट होते. तात्यारावांनी मला सांगितले होते की, मी जे हे करतोय ते जाणूनबुजून करतोय. माझा आता राष्ट्राला, समाजाला आणि स्वतःला असा कुणालाच उपयोग नाही. माझी प्रकृती ढासळत चालली आहे. मला जगण्याचा हक्कच नाही आणि ही आत्महत्या नाही हे माझ्याच ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ या लेखात मी लिहिले आहे. त्यात त्यांनी सगळे दिलेले आहे. तात्यारावांच्या घरच्यांनाही मी तपासत होतो, आईंना अनेकदा तपासले आहे. त्यांची मुलगी प्रभाताई, चिपळूणकर कुटुंब या सगळ्यांवर मी उपचार करायचो. तात्याराव गेल्यानंतरही मी त्यांच्या मुलाचा आणि कुटुंबाचा डॉक्टर होतो.
– शब्दांकन : नित्यानंद भिसे
Join Our WhatsApp Community