डॉ. गिरीश पिंपळे
क्रांतिकारकांचे मुकुटमणी अशी ओळख असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर स्वत:विषयी काय विचार करत असत याची अगदी छोटीशी झलक आपण या लेखात पाहू या.
चापेकर बंधूंच्या हौतात्म्याने छोटा विनायक अतिशय अस्वस्थ झाला. त्या वेळी त्याने घेतलेली शपथ अगदी प्रसिद्ध आहे. तो दिवस त्याच्या आणि देशाच्याही दृष्टीने महत्त्वाचा ठरला. वीर सावरकर याबाबत लिहितात – ‘माझा जीवनक्रम बदलून टाकणारी, माझ्यापुरती मी आज कोणतीतरी महनीय गोष्ट केली आहे असा दृढ संस्कार त्यादिवशी माझ्या मनावर झाला आणि तो पुन्हा कधीही पुसला गेला नाही.’
पुढे १९१० मध्ये त्यांनी फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उडी टाकून सुटकेचा अतिशय साहसी प्रयत्न केला. दुर्दैवाने तो प्रयत्न फसला. वीर सावरकर अंतर्मुख झाले. दोनच शक्यता त्यांना स्पष्टपणे दिसत होत्या, एकतर फाशी किंवा काळेपाणी. अशा परीक्षा घेणाऱ्या काळात त्यांनी स्वत:च्या भावना कशा प्रकट केल्या? तर कविता लिहून! वीर सावरकर हे अभिजात कवी होते याची साक्ष देणारा हा प्रसंग. आपले आत्मबल टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी ‘आत्मबल’ याच नावाची अजरामर कविता रचली. ते म्हणतात – ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला? ’ वीर सावरकरांचा भक्कम आत्मविश्वास या कवितेच्या शब्दाशब्दांतून प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे हे शब्द खरे ठरले आहेत कारण त्यांच्या मृत्यूला अर्धशतक उलटून गेले आहे तरीही अजून त्यांचे विस्मरण झालेले नाही – ते ‘अनंत’ आहेत.
अंदमानच्या तुरुंगात नानी गोपाळ नावाचा एक क्रांतिकारक होता. त्याला त्या तुरुंगातील छळ सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या केली. इतरही अनेक कैदी खूप निराश झाले होते. ते वीर सावरकरांना भेटले आणि आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटते असे सांगू लागले. वीर सावरकरांनी त्यांना धीर दिला आणि सांगितले, ‘आज आपला या जगतात अपमान होईल; पण असाही एक दिवस येईल की अंदमानच्या याच कारागारात आपले पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानचे राजबंदिवान राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील!’ वीर सावरकरांचा हा दुर्दम्य आशावाद काळपुरुषाने खरा ठरवला आहे!
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम)
१९२१ मध्ये सरकारने अंदमानच्या तुरुंगातून त्यांची सुटका केली आणि कोलकाताजवळ अलीपूर येथे असलेल्या तुरुंगात ठेवले. वीर सावरकरांनी मार्सेलिसजवळ मारलेल्या उडीमुळे त्याच्याबद्दल काही दंतकथा पसरल्या होत्या. त्या तुरुंगातील एक कैदी थोडा बिचकतच त्यांच्यापाशी आला आणि त्याने विचारले ‘तुम्ही मार्सेलिसजवळ किती दिवस समुद्रात पोहत होतात?’ त्या कैद्याला असे वाटत होते की आपल्याला आता काहीतरी थरारक दीर्घकथा ऐकायला मिळेल. पण वीर सावरकर लगेच उत्तरले ‘छे, छे! मी जेमतेम दहा मिनिटे पोहलो असेन तेवढ्यात किनारा गाठला गेला.’ त्यांच्या या उत्तराने तो बंदिवान काहीसा खट्टू झाला असे वीर सावरकरांनी लिहून ठेवले आहे. याठिकाणी त्यांची दोन गुणवैशिष्ट्ये दिसतात. एकतर त्यांना तो प्रसंग मीठमसाला लावून सांगता आला असता आणि स्वत:चे उदात्तीकरण करता आले असते. पण ते त्यांनी अजिबात केले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या घटनेची नोंद इतिहासात अचूकपणे झाली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. त्याप्रमाणेच ते वागले. म्हणजे व्यक्ती म्हणून आणि इतिहासकार म्हणूनही ते प्रामाणिकच राहिले.
एका बाजूला स्वातंत्र्यवारी सावरकर हळूवार असे प्रेमकाव्य लिहिणारे तरल मनाचे कवी होते तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धांची चिरफाड करणारे चिकित्सक बुद्धीचे सुधारक होते. याबाबत त्यांनी स्वत: काय म्हटले आहे ते पहा ‘माझ्या लहानपणापासून माझी भावना जितकी उत्कट तितकी माझी बुद्धीही तर्कट पडल्यामुळे दोघी सख्ख्या पण भांडखोर बहिणीप्रमाणे परस्परांचा पाणउतारा करण्यासाठी टपून बसण्यातच त्यांच्या परस्परप्रेमाची करमणूक चाललेली असते.’
वीर सावरकरांचे अवघे जीवन अनोखे होते तसेच त्यांचे मृत्युपत्रही अनोखे होते. त्यांनी त्यात म्हटले होते ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे माझे प्रेत शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये; तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात नेले जावे…माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबियांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंड-प्रदान, त्याला काक-स्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’
वीर सावरकर आयुष्यभर विज्ञानवादी होतेच; पण मृत्यूनंतरही विज्ञानवादीच होते याची साक्ष त्यांच्या या मृत्युपत्रातून पटते यात शंकाच नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community