बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’या हिंदी चित्रपटाचा प्रीमियर शो गुरुवारी, (२१ मार्च) पुण्यात पी.व्ही. आर. पॅव्हिलिओन मॉल येथे आयोजित करण्यात आला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते रणदीप हुड्डा (Actor Randeep Hooda) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar Premiere Show) यांची सिनेमामध्ये प्रभावी व्यक्तिरेखा साकारली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
वीर सावरकरांची कार्यगाथा, देशासाठी त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्या गोष्टी आताच्या पिढीला व विद्यार्थ्यांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या युवापिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशभक्ती वाढवली पाहिजे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला वीर सावरकर कोण होते, त्यांनी आपले जीवन देशासाठी कसे समर्पित केले. याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. (Veer Savarkar Premiere Show)
क्रांतिकारकांच्या स्मृतिंना मिळेल उजाळा…
अभिनेते रणदीप हुड्डा यांची विशेष उपस्थिती या प्रीमियर शोला लाभली. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना रणदीप हुड्डा यांनी चित्रपट करताना आलेले अनुभव, शारीरिक, मानसिक परिश्रम, चित्रपट प्रदर्शित करताना आलेले अनुभव, अडथळ्यांवर केलेली मात याविषयी उपस्थितांना माहिती दिली. चित्रपटाबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, ‘मी हा चित्रपट देशाच्या विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या आठवणींना उजाळा मिळावा बनवला आहे.’
नामवंत मान्यवरांची लाभली उपस्थिती…
प्रीमियर शो वेळी पुण्यातील नामवंत मंडळी हजर होती. यामध्ये राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे माहानगर भाग संघचालक रविंद्रजी वंजारवाडकर, एअर मार्शल भूषण गोखले, सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, अभिनेते क्षितिज दाते, आरोह वेलणकर, मनोज पोचत, अमित परांजपे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि इंद्रजित साठे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे उपस्थित होत्या. कुणाल टिळक यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या (Veer Savarkar Premiere Show) प्रिमियर शोचे आयोजन केले होते. शैलेश टिळक यांनी या कार्यक्रमाविषयी आभार प्रदर्शन केले.