- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वत:चा उदो उदो करण्यासाठी ‘चित्रगुप्त’ या नावानं ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलं आणि स्वत:च स्वत:ला ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी लावून घेतली हे आरोप नित्याचेच आहेत. पण ते मुळातच चुकीचे आहेत, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ हे पुस्तक लिहिलेलेच नाही. तसेच पुस्तकात कुठेही ‘स्वातंत्र्यवीर’ असा उल्लेख नाही.
‘स्वातंत्र्यवीर’ उपाधी बद्दल सांगायचं तर हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच श्री. सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिलेल्या १५ ऑगस्ट १९२४ ला प्रसिद्ध झालेल्या सावरकरांच्या संक्षिप्त चरित्राचं नावच होतं, ‘स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र’. १९२४ मध्येच येवला येथील एका राष्ट्रीय शाळेच्या वार्षिक समारंभात नाशिकचे कवी काशिनाथ रघुनाथ वैशंपायन यांनी सावरकरांचा उल्लेख ‘स्वातंत्र्यवीर’ असाच केला होता. (दोन तात्या : लेखक : डॉ. बा. वा. दातार) १९२४ मध्ये विदर्भसिंह, नाटककार वीर वामनराव जोशी यांनी नाशिकमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर असाच केला आहे. (स्वातंत्र्यवीर सावरकर, रत्नागिरी पर्व : लेखक : आचार्य बाळाराव सावरकर ) पुढे ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी नियमित वापरली जाऊ लागली.
१९२६ मध्ये ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ हे पुस्तक मद्रासहून प्रकाशित झालं आणि त्यानंतर १९८७ मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीला डॉ. रविंद्र रामदास यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी असं मत व्यक्त केलं आहे की, या पुस्तकाचे लेखक सावरकर आहेत आणि त्यांनीच सावरकरांचा उल्लेख ‘वीर सावरकर’ असा केला आहे. त्यामुळे तोच पुरावा म्हणून सादर होऊ लागला. ‘लिहू का ?’ या पहिल्या भागापासून ‘नाशिकला प्रयाण’ इथपर्यंतचे सावरकरांच्या आत्मवृत्तातील भाग २६ जुलै १९३१ ते २९ नोव्हेंबर १९३१ पर्यंत ‘हुतात्मा श्रद्धानंद’ या पत्रात प्रकाशित झाले. त्यानंतर ‘हुतात्मा श्रद्धानंद’ पत्र बंद झाले. पुढे १९४९ मध्ये सावरकरांचे आत्मचरित्र ‘माझ्या आठवणी’ प्रसिध्द झालं.
१९३१मध्ये प्रसिद्ध झालेल्या आत्मवृत्तात आपल्या आठवणी सविस्तर लिहिणारे सावरकर १९२६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ या पुस्तकात आपल्या जवळच्यांबद्दल अगदी मोघम लिहितात हे कसं शक्य आहे? १९२६मध्ये सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे त्यांना सगळ्यांची नावं लिहायची नसतील अशीदेखील शक्यता नाही. कारण १९०९ मध्ये त्यांचे जेष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेप ठोठावल्यापासूनच सावरकर घराण्याबद्दलची सर्व माहिती उघड झाली होती.
पुस्तकातल्या अतिशय वरवर केलेल्या लिखाणाबद्दलची उदाहरणंच द्यायची तर,
- लेखक चित्रगुप्त लिहितात, “…दामोदरपंतांना तीन मुलं होती, सर्वात मोठे गणेश, विनायक… आणि नारायणराव. सावरकरांनी स्वत:च जर हे पुस्तक लिहिलं असेल तर ते आपली बहीण ‘मैना’चा उल्लेख कसा विसरतील?
- सावरकरांचं लग्न १९०१ मध्ये झालं. सावरकरांना आपले सासरे भाऊराव चिपळूणकर यांच्याविषयी नितांत आदर होता. अंदमानातून आपला धाकटा भाऊ नारायणराव यांना लिहिलेल्या प्रत्येक पत्रात (जी शासन दरबारी आधी वाचली जात) सावरकरांनी आपल्या पत्नीची चौकशी केली आहे, तिच्यासाठी निरोप दिले आहेत. “थोर पोर – दीन पोर! तिची मूक पण उत्कट ध्येयनिष्ठा पाहिली म्हणजे तिची कीव येते आणि धन्यताही वाटते,” अशा भावना व्यक्त करणारे सावरकर आपल्या पत्नीच्या, सासऱ्यांच्या नावाचा उल्लेखही आत्मचरित्रात करणार नाहीत?
- उघड कार्यासाठी ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना करण्यापूर्वी सावरकरांनी त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे या सहकाऱ्यांच्या साथीनं ‘राष्ट्रभक्तसमूह’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. तो त्यांच्या कार्याचा पाया होता. ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ या पुस्तकात राष्ट्रभक्तसमूह, म्हसकर, पागे हे शब्दही नाहीत.
- महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर १९०२ मध्ये पुण्याला आले. तेव्हा बाबाराव सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेचा कार्यभार सांभाळला त्याबाबत पुस्तकात काहीही लिहिलेले नाही.
- सावरकरांचे वडील दामोदरपंतांचा वाचनाचा दांडगा व्यासंग होता. तिन्हीसांजेला सगळं कुटुंब एकत्र बसून पुस्तकांचं वाचन होत असे, त्यावर चर्चा होत असे. बालपणीच सावरकरांनी अनेक विषयांचे मराठी, इंग्रजी, संस्कृत ग्रंथ वाचले होते. वाचन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे घराच्या एका अडगळीतल्या कोपऱ्यातील जुन्या घाणेरड्या फळीवर असंख्य पुस्तकं, मासिकं फेकलेली होती, ही वाक्यच पटणारी नाहीत. सावरकर असं लिहिणं शक्यच नाही. सावरकर त्यांच्या आठवणीत लिहितात, “रविवारची माझी करमणूक म्हणजे त्या फळ्यांवरच्या पोथ्या आणि पुस्तके पुन्हा काढून, पुन्हा चाळून, पुन्हा लावून ठेवणे ही.”
- घरातील पितळेची दुर्गेची मूर्ती हे सावरकरांचं प्रेरणास्थान होतं असं ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ या पुस्तकात लिहिलं आहे. दुर्गा ही अष्टभूजाच आहे. शिवाजी महाराजांना दर्शन देणारी, आपली तलवार देणारी ही भवानीमाता म्हणूनच ओळखली जाते. सावरकरांच्या घरात जी देवी होती ती अष्टभूजा भवानी म्हणूनच ओळखली जात असे. त्यामुळे सावरकरांनी त्या देवी मातेबद्दल लिहिताना एकदा तरी अष्टभूजा भवानी असा उल्लेख केलाच असता.
- सावरकर ‘माझ्या आठवणी’मध्ये लिहितात, ‘माझ्या वयाच्या नवव्या वर्षीच आई वारल्यामुळे…” आणि ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ या पुस्तकात लिहिलं आहे, विनायकाची आई वारली तेव्हा त्याचं वय साधारण दहा असेल. सावरकरांसारखा प्रखर बुद्धीमत्तेचा मनुष्य आपल्या आईच्या बाबतीत अशी चूक करणार नाही.
- प्लेगच्या साथीत भारतीयांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या रँडचा वध करून हसत हसत फासावर चढणाऱ्या चापेकर बंधू, रानडे यांच्यापासून प्रेरणा घेऊनच सावरकरांनी घरातल्या अष्टभूजा देवीसमोर देशस्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. त्या हुतात्म्यांचा नामोल्लेखही सावरकर आपल्या चरित्रात एकदाही करणार नाहीत हे अशक्य आहे.
- तीच गोष्ट त्यांच्या येसूवहिनींबाबतची. सावरकरांसाठी आई, बहीण, मैत्रीण, मार्गदर्शक, सहकारी अशा अनेक भूमिका निभावणाऱ्या येसूवहिनींबद्दल सावरकरांना नितांत आदर होता. त्यामुळे स्वत:च्याच चरित्रात ते येसूवहिनीचा उल्लेख, “… गणेश आणि त्याची तरुण धाडसी पत्नी..” असा कसा करतील?
- याशिवाय आपला जवळचा, लहानपणापासूनचा मित्र, प्रत्येक अडीनडीला सोबत असलेल्या सहकाऱ्याचा उल्लेख नाव न घेता, रामभाऊ दातार असा न करता औपचारिकपणे श्रीयुत दातार असा कसा करतील?
१९२६ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा “सावरकरांच्या जवळच्या सहकाऱ्याने लिहिलेले” अशी त्याची जाहिरात करण्यात आली होती. राजगोपालाचारी आणि मद्रासमध्ये राहणारे व्ही. व्ही. एस अय्यर या पुस्तकाचे लेखक असतील असा एक प्रवाद आहे. राजगोपालाचारी यांनी लिहिले का याबद्दल अधिकृत माहिती नाही आणि पुस्तक प्रसिद्धीपूर्वी ३ जून १९२५ ला व्ही. व्ही. एस अय्यर यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे सत्य समोर येऊ शकलं नाही.
पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानातल्या खटकणाऱ्या गोष्टी पाहता हे पुस्तक सावरकरांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील घटना माहीत असलेल्या पण त्यांचे नातेसंबंध, नावं, आपली संस्कृती याबद्दल अनभिज्ञ असलेल्या, लंडनमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यानं ते लिहिलं असावं पण ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ हे पुस्तक लिहिणारे सावरकर निश्चितच नाहीत.
लेखक – मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.
Join Our WhatsApp Community