- डॉ. नीरज देव
हे मातृभूमि! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले |
तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला ||
सावरकरांच्या (Veer Savarkar) या केवळ काव्यपंक्ती नाहीत, तर त्यांच्या राष्ट्र समर्पित जीवनाचे यथार्थ भाष्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सशस्त्र क्रांतिकार्याचे तत्त्वचिंतक महर्षी आणि हिंदुत्वाचे मंत्रदृष्टे ऋषी होते. त्यामुळेच त्यांच्या चरणांना स्पर्श करणे एम एन रॉय सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साम्यवादी महर्षीला प्रेरणास्पद तर पूजनीय डॉ. हेडगेवारांसारख्या अद्भूत हिंदू संघटकाला परम वंदनीय वाटत होता. डाव्या उजव्यांना सावरकर (Veer Savarkar) या ना त्या दृष्टीने देशपिता वाटत होते. त्यांच्या या राष्ट्र केंद्री विचार अन् जीवनादर्शामुळेच आचार्य अत्र्यांना ते जन्मजात देशभक्त वाटतात, तर वचनेश त्रिपाठींना राष्ट्र स्वरुप वाटतात. याचाच अर्थ सावरकर देशभक्तीचे जिवंत प्रतीक होते.
अशा सावरकरांना (Veer Savarkar) ‘भारतरत्न’ प्रदान करावे. ही मागणी सातत्याने सावरकरांच्या हयातीपासून आजही उठतेच आहे. साधकबाधक विचार करता ती पुरेशीही नाही आणि सावरकरांच्या भव्योदात्त जीवनाला साजेशीही नाही. सावरकरांनंतर राजकारणात उतरलेले नि आज टाकाऊ ठरलेले नेता ‘राष्ट्रपिता’ नि स्वातंत्र्यापासून हिंदू हिताची आस वाहणारा, ज्याच्या पावलांना अनुसरुन चालले तरच राष्ट्र टिकणार अशा खऱ्याखुऱ्या राष्ट्रपित्याला केवळ नि केवळ एक नागरी सन्मान! स्वार्थ नि चरितार्थ साधता साधता अनेकांना खैरातीसारखा वाटला जाणारा सन्मान, सावरकरांच्या (Veer Savarkar) निःस्वार्थ त्यागाला कसा काय गौरवान्वित करु शकणार?
सावरकर प्रसिद्ध होते, १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे लेखक म्हणून. १८५७चे स्वातंत्र्यसमर इतिहासाला ज्ञात आहे, पहिल्या महायुद्धापासून ते १९४७ पर्यंत देशाला हजारो देशभक्त सैनिकांचा अखंड पुरवठा करणारे म्हणून. गदरपासून आझाद हिंद सेनेपर्यंत प्रत्येक स्वातंत्र्यसेनेचे प्रेरणास्रोत म्हणून सावरकरच दिसतात. महाकालीला आवाहन करायला सावरकरांना (Veer Savarkar) महासरस्वतीचे व्यासपीठही चालते. सावरकरांचे अभिनव भारत, सावरकरांचा सैनिकीकरणावरील जोर, त्यांचा सैन्याच्या अद्ययावतीकरणाचा आग्रह या साऱ्या बाबी त्यांना भारताच्या अनभिषिक्त सेनापतीचा दर्जा देऊन जातात. आधुनिक भारतातील अशा सेनापतीचा गौरव परमवीर चक्र सारख्या सर्वोच्च पुरस्कारानेच कदाचित होऊ शकेल.
पण मनात प्रश्न उठतो, सावरकरांना परमवीर चक्र दिले तर त्यांच्या हिंदुत्व निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीपातींचे उच्छेदन इत्यादी जनप्रबोधनाचे काय? त्यांच्या भाषाशुद्धी, लिपी सुधारणा आंदोलनाचे काय? त्यांच्या राष्ट्र पोषक साहित्य निर्मितीचे काय? या बाबी विना पुरस्कृतच राहतील. मग पुन्हा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’कडेच वळावे लागेल. म्हणजेच वीर सावरकरांचा सन्मान करायला परमवीर चक्र आणि भारतरत्न या दोहोंचे मिश्रण असणारा एखादा नवाच पुरस्कार शोधावा लागेल आणि तो दिल्यावरही सावरकरांची (Veer Savarkar) निरलस, नि:स्पृह अन नि:स्वार्थ देशभक्ती अपुरस्कृतच राहील. मग यापेक्षा जर सावरकरांचा आत्मार्पण दिन ‘देशभक्ती दिन: एक दिन देश के लिए!’ म्हणून साजरा केला तर! तेच उत्तम ठरेल राधाकृष्णनांचा जन्मदिवस शिक्षक दिन, विश्वेश्वरैय्यांचा अभियांत्रिक दिन, विवेकानंदाचा युवा दिन तसाच सावरकरांचा आत्मार्पण दिन देशभक्ती दिन!
या दिवशी सुटी नाही घ्यायची, भाषणबाजी करीत नाही बसायचे तर प्रत्येकाने आपापले नियत कार्य प्रामाणिकपणे करीत, त्यातून येणारा नफा, २६ फेब्रुवारी रोजीची कमाई देशाच्या नावे करायची. अर्थात सावरकर (Veer Savarkar) आत्मार्पण दिनाची मेहनत आणि मेहनताना देशासाठी वापरायचा. त्यातून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग सैन्याचे अद्ययावतीकरण, अद्यावत शस्त्रांची खरेदी नि नवीन शस्त्रांचा शोध, नागरिकांचे (विशेषतः हिंदुंचे) नि विद्यार्थ्यांचे सैनिकी प्रशिक्षण यासाठीच केला जावा. सावरकर जन्मभर देशाला फक्त देतच राहिले याप्रकारे मरणोत्तर ही सावरकर भारताला काही तरी देतच राहतील हा संदेश यातून देता येईल असे मला वाटते, याप्रमाणे वर्षातील केवळ एक दिवस देशासाठी वापरुन आपण सावरकरांना कृतीशील श्रद्धांजली अर्पुया! तीच सावरकरांनाही रुचेल यात शंकाच नाही.
(लेखक व्यवसायाने मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएच डी समतुल्य सन्मानपत्राने तसेच महाराष्ट्र शासनाच्या सावरकर वीरता पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Join Our WhatsApp Community