१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातून मुक्तता झाली. या घटनेला शनिवारी, ६ जानेवारी २०२४ला १०० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिनाचे औचित्त्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने ठाणे कारागृह ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘ठाणे एनफिल्ड क्लब’ यांनी या बाईक रॅलीकरिता सहकार्य केले. ठाणे कारागृहातील क्रांती स्तंभाजवळ राष्ट्रगीत गायनानंतर या बाईक रॅलीची सुरुवात झाली.
या बाईक रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्निल सावरकर आणि स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, तसेच हिंदुत्ववादी संघटना आणि ठाण्यातील सावरकरप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असलेला रथ अग्रभागी होता. ठाणे कारागृहातून रॅलीला सुरुवात झाली. बाईकवर भगवे झेंडे लावण्यात आले होते.
बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘अभिवादन’…
या रॅलीचे नेतृत्व ‘ठाणे एनफिल्ड क्लब’च्या सौ. योगिता कारखानिस यांनी केले. मुक्ती शताब्दी यात्रेनिमित्त मिळालेल्या या संधीविषयी त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाण्यासाठी आम्ही सगळे जण भारावलेले आहोत. वीर सावरकर यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांना आज ऐतिहासिक दिनानिमित्त बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही अभिवादन करत आहोत. त्यामुळे या कार्यात सहभागी झाल्याबद्दल अतिशय आनंद होत आहेच शिवाय खूप अभिमान आणि प्रेरणादायी वाटतेय.
वीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा…
रॅलीत सहभागी झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र गानू यांनी ‘सावरकर मुक्ती शताब्दी यात्रे’निमित्त वीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले की, सावरकर स्मारकाने जेव्हा ‘मुक्ती शताब्दी यात्रा’ साजरी करण्याचं ठरवलं, तेव्हा मी स्वत:हूनच या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा होम मांडला त्यांच्या तुरुंगातून मुक्तता होण्याच्या शतकोत्तर दिवशी मला काहीतरी काम करायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. या कारागृहापासून मुक्ती शताब्दी यात्रेनिमित्त बाईक रॅलीला सुरुवात झाली.
वीर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची कैद्यांना भेट…
ठाणे कारागृहातील १८ ते २५ वयोगटातील कैद्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र गानू म्हणाले की, ‘याच वयाचे असताना वीर सावरकर यांनी पदवी घेतली. विलायतेत गेले, बॅरिस्टर झाले, पण त्यांनी आपली विद्वत्ता कैदी, कैद्यांचे हक्क, त्यांचे शिक्षण आणि ज्या सुविधांपासून ते वंचित आहेत त्याबाबत त्यांना जागरुक केले. अंदमानात त्यांनी कोलू फिरवला, पण त्याचबरोबर पंजाबी, उर्दू, बंगाली या भाषाही ते शिकले. त्यातून उत्तम साहित्य निर्मिती केली. स्वातंत्र्यवीरांचा एक गुण जरी आत्मसात केला, तरी आयुष्य धन्य होईल. या वेळी वीर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके तरुण कैद्यांना भेट देण्यात आली.
क्रांतिकारकांचे बलिदान युवा पिढीला कळणे आवश्यक…
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांनी मुक्ती शताब्दी यात्रेनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, वीर सावरकर यांची कारावासातून मुक्तता झाली. या दिवसाला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलंय, त्यांची माहिती युवा पिढीला कळणं आवश्यक आहे. मुक्ती शताब्दी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅलीत सावरकरप्रेमी बुलेट रायडर्स, ६० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला आहे.
View this post on Instagram
ठाणे कारागृहातून सायंकाळी ४ च्या सुमारास निघालेली ही बाईक रॅली दादर येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकात सायंकाळी ६.३०च्या सुमारास पोहोचली. या रॅलीचा मार्ग कोर्ट नाका-तलावपाळी-गोखले रोड-तीन हात नाका-आनंदनगर-प्रियदर्शनी-सायन ब्रिज-सेना भवन-शिवाजी उद्यान-दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे सांगता असा होता.
Join Our WhatsApp Community