- मंजिरी मराठे
‘एक देव, एक देश,
एक भाषा, एक जाती,
एक जीव, एक आशा’
हा मंत्रोच्चार करत स्वातंत्र्यवीर सावरकर १९२१ मध्ये अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून बाहेर पडले आणि रत्नागिरी कारागृहात सव्वा दोन वर्षांसाठी पुन्हा बंदिस्त झाले.
साऱ्या हिंदूंनी एकसंध समाज व्हावे
आपला इतिहास हा पराभूतांचा इतिहास आहे, असं आपल्या मनावर सतत बिंबवलं जातं आणि आपणही ते खरं धरून चालतो. पण इतिहासाच्या अभ्यासातून सावरकरांनी (Veer Savarkar) असं दाखवून दिलं की, आपण जिंकत होतो, पण पुन्हा, पुन्हा परकीय आपल्याला पराभूत करत होते. कारण आपण एक होऊन लढत नव्हतो, कित्येकदा तर आपण एकमेकांविरुद्ध लढलो. त्यामुळे आपण साऱ्या हिंदूंनी एकसंध समाज म्हणून एकत्र यायला हवं असं त्यांना वाटत होतं.
क्षात्रतेजच नष्ट करणाऱ्या महात्म्याची वाट रुंदावली
१९२० मध्ये जहाल विचारांच्या लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि आपलं क्षात्रतेजच नष्ट करणाऱ्या ‘अहिंसा परमो धर्म:’ या विचारानं चालणाऱ्या महात्म्याची वाट चांगलीच रुंदावू लागली. त्याच महात्म्यानं मुस्लिमांचं लांगूलचालन करण्यासाठी हिंदूंचा तर अजिबातच नाही पण भारतातील मुस्लिमांचाही काडीमात्र संबंध नसलेल्या खिलाफत चळवळीत आपणहूनच उडी घेतली. ‘खिलाफत नव्हे आफत’ असं सांगणाऱ्या सावरकरांना, खिलाफतीत देशाच्या फाळणीची बीजं दिसत होती. गांधीवादी व खिलाफत चळवळीतील बंदिवानांची आणि सावरकरांची (Veer Savarkar) रत्नागिरी कारागृहात भेट होत असे. गांधीवाद्यांचं दुटप्पी वागणं, आम्ही गांधींच्या मागे नाही तर गांधी आमच्या मागे आहेत ही खिलाफतवाद्यांची दर्पोक्ती, यातून देशाचं राजकारण कुठल्या दिशेला चाललं आहे, हे सावरकरांना जाणवत होतं.
रत्नागिरीतील एकांत कोठडीत ‘हिंदुत्व’ संकल्पनेला शब्दरूप दिलं
ब्रिटिश या आपल्या शत्रूला देशाबाहेर घालवण्यासाठी, दुसऱ्या शत्रूनं – अफगाणिस्थानच्या अमानुल्लानं हिंदुस्थानवर स्वारी करून एकमेकांच्या साहाय्यानं ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकायची अशी गांधींची आत्मघातकी कल्पना होती त्यानुसार गांधी-अमानुल्ला करार ठरला होता. हिंदूंचं अस्तित्वच पूर्णपणे धोक्यात आलं होतं, अशा परिस्थितीत जाती, पंथ, भाषा आणि प्रांतात विभागलेल्या हिंदूंनाच, हिंदू म्हणजे कोण याची ओळख करून देण्याची वेळ आली आहे, हे जाणून सावरकरांनी (Veer Savarkar) रत्नागिरी कारागृहात, ६x८ फुटांच्या एकांत कोठडीत आपल्या मनातल्या ‘हिंदुत्व’ संकल्पनेला शब्दरूप दिलं. इंग्रजीत लिहिलेला हा त्यांचा पहिला ग्रंथ १०१ वर्षांपूर्वी, १९२३ मध्ये ‘मराठा’ या टोपणनावानं अधिवक्ता विश्वनाथ विनायक केळकर यांनी प्रकाशित केला. १९२६- २७ च्या सुमारास सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायण सावरकर यांनी त्या इंग्रजी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.
प्रारंभ झाला १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा
आता पुढची पायरी होती ती हिंदू संघटनाची, समाज सुधारणांची. सावरकरांनी थोडी थोडकी नाही तर १४ वर्ष कठोर कारावास भोगला होता. आता आवश्यकता होती कारागृहातून मुक्तता मिळवण्याची. हिंदू समाजाला विळखा घालून बसलेल्या सप्तशृंखला तोडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायात स्थानबद्धतेची बेडी ठोकून घेतली.
६ जानेवारी १९२४ ला येरवडा कारागृहातून मुक्तता झाल्यावर, ८ जानेवारीला सावरकर रत्नागिरीला पोहोचताच प्रारंभ झाला, १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा. या तेरा वर्षांच्या ‘वनवासात’, ब्रिटिशांच्या ‘नजरेखाली’ असूनही त्यांनी अफाट सामाजिक कार्य केलं. केवळ रत्नागिरीतील अस्पृश्यता नष्ट केली नाही, तर जात्युच्छेदन चळवळ उभारली. आपल्या पूर्वास्पृश्य बांधवांना मंदिर प्रवेशच नाही, तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळवून दिला. त्यांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला. पण १०० वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपण जातीजातीत विभागले जात आहोत. भलेही आपण सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असू, पण एक समाज म्हणून आपली अधोगतीच होत आहे. आपापसातली तेढ प्रचंड वाढते आहे, मतांच्या राजकारणासाठी जाणूनबुजून वाढवली जात आहे. त्यामुळे आज आवश्यकता आहे हिंदूंच्या एकजुटीची. हिंदुस्थानातच हिंदूंच्याच अस्तित्वासाठी लढण्याची.
सावरकरांना अपेक्षित समर्थ संघटित हिंदूसमाज उभारणे अत्यावश्यक
६ जानेवारी २०२४ पासून साजरं होणारं ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष’ हे केवळ ‘सावरकर सन्मान वर्ष नाही, तर तो जागर आहे हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा’. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की माझी मॉर्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. आपण उडीही विसरलो आहोत आणि हिंदू संघटनही. सावरकरांनी (Veer Savarkar) मांडलेल्या हिंदू संघटन विचारांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे १९४७ ला देशाची फाळणी आपल्या नशिबी आली. त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपणही सावरकरांना अपेक्षित समर्थ संघटित हिंदूसमाज म्हणून उभं राहणं अत्यावश्यक ठरतं.स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्तानं संघटित होऊया. आपलं अस्तित्वच धोक्यात आलं असताना आवश्यकता आहे जागं होण्याची, हिंदूंनी ताकद दाखवण्याची.
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)
Join Our WhatsApp Community