वीर सावरकरांचे समाज सुधारकांविषयीचे विचार…

195

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी, समकालीन अनेक समाजसुधारक होऊन गेले. परंतु सावरकर हे द्रष्टे सुधारक होते. एकाचवेळी क्रांतिकार्य आणि समाज सुधारणा हे अत्यंत कठीण काम होते. टिळक आणि आगरकर यांच्यात जो वाद झाला, त्याला उत्तर सावरकरांनी दिले आहे असे म्हणावे लागेल. आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा हा प्रश्न तात्यारावांनी निकालात काढला. स्वातंत्र्य चळवळ आणि सुधारणा या गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत.

अनेक सुधारकांनी लोकांच्या धर्मभावना दुखावल्या. सुधारणा होत असताना धर्मभावना दुखावण्याची शक्यता अधिक असते. सावरकर म्हणतात, ‘ज्याला जे सत्य वाटेल त्याने ते प्रकटपणे उपदेशावे. जो धार्मिक वा सामजिक आचार लोकहिताला विरुद्ध जातो आहे वा असत्यावर आधारलेला आहे तो तसा असल्याविषयी युक्तिसंगत चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकास असावा.  जोपर्यंत तो प्रचार सभ्य, युक्तियुक्त नि सदिच्छ आहे, केवळ मत्सरग्रस्त हेतूने व्यक्तिशः कोणाची विषयांतरपूर्वक मानहानी करीत नाही, तोवर कोणाच्याही धर्मभावना दुखविल्याचा दोष  त्या प्रचाराने घडला असे समजता कामा नये.’

(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)

सुधारणेसंबंधी सावरकरांनी आपले मत विस्तृतपणे मांडले आहे. केवळ बडबड करणारे बोलघेवड्या सुधारकांना सावरकर सुधारक मानत नाहीत. तर इतरांनी काही करायची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेणारे खरे सुधारक असतात असे सावरकरांना वाटते. त्या काळी सनातन्यांचे आणि सुधारकांचे खूप वाद होत. बऱ्याचदा सुधारकांवर बहिष्कार घातला जायचा. त्यावर सावरकर म्हणतात, ‘आम्हा सुधारकांना जसा सुधारणा करण्याचा अधिकार आहे तसा ह्या प्रामाणिक सनातनी वर्गाला बहिष्कार घालण्याचा अधिकार आहे. तेही आपले धर्मबंधूच असल्याने सुधारकांनी त्यांच्यावर ते बहिष्कार घालतात म्हणून रागवू नये; त्यांचा द्वेष तर केव्हाही करु नये. तर त्यांचे मतपरिवर्तन होईतो त्यांनी घातलेल्या बहिष्काराचा त्रास आनंदाने सोसावा.’

मात्र आताचे सोशल मीडियावरचे तोंड पाटीलकी करणारे सुधारक मात्र स्वतःला सावरकर प्रभृती सुधारकांपेक्षाही महान समजतात आणि सावरकरांच्या काळात जी प्रतिकूल परिस्थिती होती, तशी नसतानाही धार्मिक लोकांचा द्वेष करतात. आता म्हणावे तसे सनातनी देखील उरलेले नाहीत. आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी अतिशय पुष्ट वातावरण आहे. त्या काळी मात्र प्रतिकूल वातावरण होते. परंतु सावरकरांचे ह्रदय समाजाकडे पाहताना आईसारखे होते. ज्या प्रमाणे ज्ञानेश्वर माऊली दुरितांचे तीमीर जावो असे सहज म्हणून जातात त्याप्रमाणे सावरकर सनातन्यांचा द्वेष करु नये असे सहज म्हणून जातात.

(हेही वाचा काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?)

अशी तोंडपाटीलकी करणाऱ्या सुधारकांना सावरकरांनी संदेश दिला आहे. ते म्हणतत, ‘सुधारणा नुसती सुचवून दाखविणारे बहुत, ती करुन दाखविणारेच अल्प! कोणतीही सुधारणा जी यशस्वी होते ती मुख्यत्वे ती करुन दाखविणाऱ्यांच्याच बळावर होय!’  सावरकरांनी तत्कालिन सुधारकांना संदेश देत म्हटले आहे, ‘सुधारणा म्हणजे अल्पमत, रुढी म्हणजे बहुमत! तेव्हा जो सुधारक क्रांतिवादी तो प्रथम एकटाच असणार. रुढीच्या गणपतीपुढे जनता दाटणार, सुधारणेच्या गणपतीपुढे तुम्ही अवघे पाच नि भविष्यकाळ सहावा हे गृहीत धरुन हा उत्सव चालू करु या.’

सावरकरांच्या म्हणण्यानुसार आजचा काळ आपला आहे, आपण हिंदुंनी सुधारणा घडवत स्वतःची प्रगती केली. आज भारत देश जगाशी स्पर्धा करतोय आणि अनेक बाबींमध्ये अव्वल ठरतोय. प्रत्येक क्षेत्रात सुधारक हवा असतो आणि सावरकर प्रभृती सुधारकांमुळे हिंदू प्रगत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.