Yamunabai Savarkar : त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई !

614
Yamunabai Savarkar : त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई !
Yamunabai Savarkar : त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई !
  •  नमिता वारणकर

यमुनाबाई सावरकर (Yamunabai Savarkar) अर्थात माई सावरकर…स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी आणि जव्हार संस्थानचे तत्कालिन रामचंद्र त्र्यंबक उपाख्य भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. वीर सावरकर यांच्या देदीप्यमान जीवनप्रवाहाशी एकरूप होणाऱ्या माईंचा आज स्मृतिदिन ! यानिमित्त देशसेवेचे अव्याहत व्रत घेतलेल्या, धाडसी, कणखर, परिश्रमी माईंच्या आठवणींना उजाळा देणारी ही शब्दसुमनांजली!! 

सन १९०१ मध्ये मार्च महिन्यात नाशिक येथे वीर सावरकर यांच्यासोबत माईंचा विवाह थाटामाटात पार पडला आणि चिपळूणकरांची येसू विवाहानंतर सौ. यमुनाबाई अर्थात माई सावरकर झाली. माईंचा लग्नाआधीपासून केवळ परिचयच नव्हे, तर घरोबा होता. त्यामुळे सावरकर कुटुंबातील देशभक्तीविषयी आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांविषयी त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे सासरी आल्यावर सौ. माईंना ‘सावरकरी’ वातावरणाशी एकरुप होणं शक्य झालं. वीर सावरकर यांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर यांच्या पत्नी येसू वहिनी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले पोवाडे, चाफेकरांचा फटका, देशभक्तीची पदे ते आपल्या कुटुंबातील स्त्रियांकडूनही म्हणून घेत. येसूवहिनींना ते त्यांचा अर्थ समजावून सांगत. येसूवहिनींना आर्या, ओव्या म्हणण्याची आवड मुळात होती. पुढे क्रांतीकार्याचा प्रचार करण्याच्या हेतूने येसूवहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ नावाची महिलांची संस्था स्थापन केली. त्यामुळे तात्यांनी रचलेल्या देशभक्तीने भारलेल्या आर्या त्या आणि माई म्हणत आणि संस्थेच्या बैठकीत त्याचे सामुदायिक गायनही करत.

१९५० मध्ये पुण्यात माईंचा प्रकट सत्कार करण्यात आला. त्यावेळी माई म्हणाल्या, ‘तुळशीचे पान ते काय ! पण देवाच्या पायावर पडून ते कोमेजले की, निर्माल्य म्हणून साधुसंतही त्याला मस्तकी धरतात. माझीही गत आज तशीच झालेली दिसते. मी म्हणजे एक पालापाचोळा ! देवाच्या पायांवर वाहिले जाऊन कोमेजले इतकेच माझे भाग्य. म्हणून काय ते माझ्या जीवनाच्या या निर्माल्याला तुम्ही थोरथोर भगिनी आज सत्कारीत आहात अर्थात हा सत्कार हा निर्माल्याचा नसून तो वस्तुत: आहे त्या देवाचा.

महात्मा गांधींचे माईंसंबंधी धन्योद्गगार
महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि सावरकरांची रत्नागिरीत मार्च १९२७मध्ये भेट झाली होती. अस्पृश्यता आणि स्वदेशी यावर दोघांची चर्चा झाली. सावरकर करत असलेल्या कार्याविषयी गांधींनी त्यांना धन्यवाद दिले. ही चर्चा चालू असताना कस्तुरबा गांधींनी माईंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. माई आल्या त्यांना महात्माजींनी आणि कस्तुरबांनी नमस्कार केला. त्यानंतर महात्माजी कस्तुरबांना म्हणाले, ‘आपल्या पतीला ५० वर्षांची खडतर शिक्षा झाली असता मनोधैर्य दाखवून संकटास तोंड दिले, त्या या साध्वीला आपण नमस्कार करुया.’

चिरंतन संदेश
वीर सावरकरांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानात जाण्यापूर्वी त्यांची आणि माईंची डोंगरीच्या कारागृहात भेट झाली. त्यावेळी सावरकरांचं वय होतं २८ आणि माईंचं वय होतं २३. आपला पती बॅरिस्टर होऊन परत येईल, अशी स्वप्न रंगवलेल्या माईंच्या समोर उभे होते कैद्याच्या वेशातले सावरकर. पुन्हा कधी भेटू याची शाश्वती नसताना वीर सावरकर आपल्या पत्नीला म्हणाले, ‘माझा वेष बदलला असला, तरी मी तोच आहे. चार काटक्या गोळा करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचं असेल, तर असा संसार कावळा चिमणीही करतात. संसाराचा याहून भव्यतर अर्थ घेणे असेल, तर मनुष्यासारखा संसार करून आपण कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूलबोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे कदाचित हजारो जणांच्या घरी सोन्याचा धूर निघेल. रविंद्र पिंगे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘माईंनी एकाच संसाराची ५ विराट पर्वे पाहिली. नाशकातले पहिले सौभाग्य पर्व, तात्या विलायतेत असतानाचे विरहपर्व, तात्यांच्या काळ्या पाण्याच्या कालखंडाचे उदासपर्व, रत्नागिरीतल्या बंदीवासातले सहजीवन पर्व आणि मुंबईतले अखेरचे साफल्य पर्व.’

(हेही वाचा – Veer Savarkar : युवकांना सावरकर समजले नाहीत, हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव – रणजित सावरकर )

स्त्रियांना धीट होण्यासाठी उपदेश
रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना तात्यांनी आरंभलेल्या शुद्धी चळवळीत परधर्मातील लोक स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारू पाहात होते. त्यांना धार्मिक विधी करून हिंदुधर्माची दीक्षा दिली जावी. अशा समारंभात शुद्ध होणाऱ्या महिलांना हिंदु समाजात रुळवण्यासाठी माई त्यांना सहभोजन व हळदीकुंकू समारंभाचे आमंत्रण देत. तेथे त्यांचा ओटी भरून सत्कार करत. ख्रिश्चन झालेल्या कुटुंबियांना शुद्ध करून घेतल्यानंतर त्यांच्या मुलांची मुंज आणि लग्ने लावून देत. नाशिकला झालेल्या अनेक समारंभात त्यांनी स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश केला.

निरीच्छ वृत्तीच्या माई !
श्रद्धाळू, प्रेमळ, सरळ स्वभावाच्या, सोशिक स्वभावाच्या, परोपकारी माई घरातल्या सर्वांची आपुलकीने काळजी घेत. कुठलीही अभिलाषा त्यांना शिवली नाही. १९५५-५६ साली अस्थि क्षयाने आजारी पडल्यानंतर तात्या त्यांना म्हणाले, माई, गेली २० वर्षे सुखाने संसार केलास, मानसन्मान पाहिलेस, वैभव उपभोगलेस. आता आजारपण वाढतच जाणार. असा स्थितीत अंगावर सुवर्णलंकार ठेवून काय उपयोग. तेव्हा आता ते काढून ठेवा. तेव्हा माईंनी तात्यांच्या म्हणण्याचा आशय लक्षात घेऊन तात्काळ मंगळसूत्रावाचून अंगावरील सर्व दागिने उतरवून ठेवले आणि म्हणाल्या, ‘त्यांना’ हे दागिने तेवढे नेऊन दे. त्यांचे म्हणणे योग्यच आहे. त्यांच्यापुढे या दागिन्यांचे काय महत्त्व?

कै. माईंविषयी आपले विचार प्रकट करताना प्रख्यात लेखिका गिरीजा कीर म्हणतात, ‘माईंचं मोठेपण दिनांक बघून आठवण्याची जरूरीच नाही. हिंदू स्त्रीचं जगणं अन् जगवणं याचं प्रतीक म्हणजे माई! दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेला तेजस्वितेचा अंश म्हणजे माई !! त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई!!!

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांचा जीवनपट वेबसीरिजमधून उलगडणार; ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’च्या चित्रीकरणास प्रारंभ)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.