गाळाच्या वजनाला अघोषित भारनियमनचा शॉक

181

मुंबई महापालिकेच्या सुरु असलेल्या नाल्यातील काढलेला गाळ कंत्राटदार मुंबईबाहेरील भराव भूमीवर(डम्पिंग ग्राऊंड) टाकला जातो. परंतु नाल्यातील काढलेल्या ट्रकमधील गाळाचे वजन आणि भराव टाकून आल्यावर रिकामा केल्यानंतरच वजन हे वजन काट्यावर नोंदवणे बंधनकारक आहे. परंतु हे वजन काटे मुंबईबाहेर असल्याने अनेकदा अघोषित भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याने या गाळाचे तसेच रिकाम्या वाहनांचे वजन होण्यातच अनेक अडचणी येत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे आधीच गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांना नियोजित वेळेतच गाळाची वाहतूक करण्यास परवानगी असून त्यातच अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होत असल्याने गाळाच्या वाहतुकीचा स्पीडही कमी झाल्याने गाळ अजूनही नाल्याशेजारीच पडून राहिल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : पूर्व उपनगरातील पूरपरिस्थितीवर उपाय : पूर्व द्रूतगती महामार्गाखाली १० नाल्यांचे होणार रुंदीकरण)

सुमारे ४० टक्के गाळ काढला

मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांसह नद्यांमधील गाळ हा पावसाळ्यापूर्वी निश्चित केलेल्या एकूण परिमाणांच्या तुलनेत ७५ टक्के एवढा काढला जात आहे. त्यामुळे या पावसाळ्या पूर्वीच्या परिमाणांच्यातुलनेत शनिवारपर्यंत सुमारे ४० टक्के गाळ काढला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यंदा सर्व नाले व नाल्यांमधून आतापर्यंत ९ लाख मेट्रीक टनाच्या तुलनेत साडेचार लाख मेट्रीक टन काढण्यात आल्याचा दावा महापालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी केला होता.

नाल्यातील गाळ हा नाल्याशेजारी जागा असल्यास तिथे टाकून सुकल्यानंतर ट्रकमधून भराव भूमीवर पाठवला जातो, परंतु जिथे अशाप्रकारची व्यवस्था नाही तिथे थेट गाळ ट्रकमध्ये भरला जातो. त्यामुळे या ट्रकमध्ये गाळ भरण्यापूर्वी वजन केले जाते आणि त्यानंतर गाळ भरताना तसेच भरल्यानंतर पुन्हा वजन काट्यावर सिसी टिव्ही नियंत्रणाखाली वजन केले जाते. यानंतर हे डम्पिंग ग्राऊंडवर गाळ रिकामा करण्यात आल्यानंतर पुन्हा त्या रिकाम्या ट्रकचे वजन काट्यावर वजन केल्यानंतर पुढील गाळ त्या वाहनात भरला जातो,असे सांगितले.

वीज पुरवठा खंडित होत असल्याने वाहनांना मोजमापासाठी थांबावे लागते

आरटीओच्या नियमानुसार नाल्यातील गाळ वाहून नेणाऱ्या ट्रक सात ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या वेळा टाळून गाळाच्या विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक केली जात असून या सर्व ट्रकना जाताना आणि येताना महापालिकेने निश्चित केलेल्या सहा ते सात वजन काट्यांच्याठिकाणी वजनांची नोंद करावी लागते. जो गाळ आहे तो भिवंडीतील मानकोळीस वसई जिल्ह्यात असल्याने त्या भागातच वजन काटे मापन केले जाते. परंतु या भागांमध्ये बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने वाहनांना मोजमापासाठी थांबावे लागते. त्यामुळे दिवसाच्या वाहनांच्या फेऱ्या पूर्ण करता येत नाही. त्यामुळे नाल्यातून काढलेल्या गाळाची योग्यप्रकारे वाहतूक होत नाही. याला विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र,वजन काटा करणाऱ्या ठिकाणी कधी कधी वीज पुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले. परंतु त्यावरही मात करत जास्तीत जास्त गाळ कशाप्रकारे भराव भूमीवर टाकला जाईल यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे जेवढा गाळ काढला जातो, त्यापेक्षा जेवढ्या गाळाची विल्हेवाट लावली जाते, त्या गाळाच्या वजनानुसार कंत्राटदारांना पैसे दिले जातात. त्यामुळे कंत्राटदारही गाळाची विल्हेवाट वेळेत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.