उत्तर प्रदेशात आल्या निवडणुका, मुंबईकरांनो, तुमची वाहने सांभाळा…

75

उत्तर प्रदेशात निवडणुकीची चाहूल लागली आहे, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढते आणि ही मागणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांतून पूर्ण केली जात असल्याचे मागील काही निवडणुकीच्या काळात समोर आले आहे. या शहरांमधून मोठ्या प्रमाणात चोरीच्या वाहनांची तस्करी उत्तर प्रदेशात होत असल्याचे मुंबई, ठाणे पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेले आहे. इतर वेळीही चोरीची वाहने मेरठ शहरातील सर्वात मोठे स्क्रॅप्ट मार्केटमध्ये पाठवले जात असल्याचे समोर आले आहे.

निवडणुका संपल्यावर तीच वाहने भंगारात काढली जातात

उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २०२२मध्ये उत्तर प्रदेशात लवकरच निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे. मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये वाहन चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे, येथील वाहन चोर टोळ्या सक्रिय झालेल्या असून मागणीप्रमाणे वाहने चोरी करून उत्तर प्रदेशातील अपक्ष तसेच लहान मोठ्या पक्षांचे उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पुरवली जातात. निवडणुका संपल्यावर तीच वाहने भंगारात काढली जात असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील एका अधिका-याने दिली आहे.

(हेही वाचा 2014 ला माॅब लिचिंग, तर 1985 ला काय आंधळी कोशिंबीर होती का?)

चोरीच्या वाहनांचा वापर प्रचारासाठी केला

युपी, बिहार राज्यातील पंचायतीच्या निवडणुका असुद्या अथवा स्थानिक पातळीच्या निवडणुका असू द्या, या राज्यात वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते, मात्र प्रत्येक उमेदवारांना नवीन वाहने घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चोरीच्या वाहनांचा वापर प्रचारासाठी केला जातो. ही चोरीचे वाहने पुरवणाऱ्या टोळ्या मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात असून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चोरी करून त्या वाहनांना बनावट नंबर प्लेट बदलून बनावट कागदपत्रे तयार करून ही वाहने राज्याच्या बाहेर पाठवले जातात, अशी माहिती एका पोलिस अधिकारी यांनी दिली.

या वाहनांना सर्वाधिक मागणी

निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनामध्ये उत्तर प्रदेश, बिहार राज्यात स्कॉर्पिओ, झायलो, बोलेरो, इत्यादी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.तसेच दुचाकीमध्ये बुलेट व महागड्या बाईक्स या वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मागणी प्रमाणे मुंबई ठाण्यातील टोळ्या मागणी पूर्ण करण्यासाठी शहरात पार्क करण्यात आलेल्या या वाहनांना लक्ष करून ही वाहने चोरी करून त्या परराज्यात पाठवल्या जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.