ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

140

“मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जीवंत केली. त्यामुळेच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले.

त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.