कल्याणच्या काटेमानवली नाका परिसरातील व्हीजीएन ज्वेलर्सने सोन्यात गुंतवणूक करुन वार्षिक 15 टक्के व्याजाने आमिष दाखवून , 14 हजार 340 गुंतवणुकदारांना तब्बल 298 कोटी 96 लाख 92 हजार रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक आणि त्याच्या मुलाला आधीच अटक झाली असून, फरारी असणा-या मॅनेजरला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
असे होते आश्वासन
व्हीजीएन ज्वेलर्स या नावाने व्हीजीएन ज्वेलर्सचा मालक विरिथगोपालन नायर आणि वलसला नायर यांनी एक वित्तीय संस्था स्थापन केली होती. ज्वेलरीचा व्यवसाय सुरु असताना, त्यांनी महिन्याला 500 रुपये याप्रमाणे दोन वर्षात 12 हजार रुपये गुंतवल्यास 14 हजार रुपयांचा परतावा देण्याची स्किम सुरु केली. 14 हजार रुपये रोखीने न देता तेवढ्या किंमतीचे सोने देण्याचे आश्वासन या योजनेमध्ये दिले जात होते.
( हेही वाचा एसटी कर्माचा-यांचा संप थांबलाच पाहिजे, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल! )
मध्यमवर्गींयांची पुंजी अडकली
5 वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास, वार्षिक 15 टक्के व्याज दराने परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. 2006 ते 2021 या कालावधीत ही योजना सुरु होती. पहिल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांना परतावा मिळत होता. पण, नंतर परतावा देण्यास ही कंपनी अकार्यक्षम ठरली आणि कपंनीचा आर्थिक डोलारा कोसळला. त्यात हजारो मध्यमवर्गीयांची पुंजी अडकली.
चौकशी सुरु
याप्रकरणी व्हीजेएन ज्वेलर्सचने आपल्या योजनेच्या माध्यमातून ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस स्टेशनात दाखल करण्यात आली होती. त्याआधारे पोलिसांनी या ज्वेलर्सचे मालक विरथ गोपालन नायर आणि त्याचा मुलगा गोविंद याला गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मॅनेजर लीना पीटर हीला अटक करण्यात आली असून, तिला चौकशीसाठी ११ मार्च रोजी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.