चंद्रपुरात वाढत्या वाघांच्या संख्येत आता जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या जागेच्या कमतरतेमुळे वाघाचे शेतात वावरणे, जंगलातील भक्ष्य सोडून मानवी समूहाजवळील गायी मारणे याबाबत वन्यजीव अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे वाघांना नरभक्षक म्हणता येणार नाही, असा दावा वन्यजीव अभ्यासकांनी केला आहे.
चंद्रपूरात एकाच वर्षात वाघाच्या हल्ल्यात 53 माणसांचा बळी, गडचिरोलीतील सिटी वन नावाच्या वाघाने वर्षभरात 13 माणसांचा घेतलेला बळी या घटना पाहता विदर्भात संघर्षमय परिस्थिती उद्भवली आहे. यंदाच्या वर्षात गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेला. वाघांना जागा अपुरी पडत असल्याने आपली हक्काची जागा शोधायला वाघ फिरत आहेत. प्रदेशवादात अगोदरच तरुण वाघांना जंगलात राहणे कठीण होत असताना माणसे जंगलात सरपण आणायला जातात आणि वाघाच्या हल्ल्यांना निमंत्रण देतात, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. अगदी 200 मीटरहून वाघांना माणसाची चाहूल लागते. वाघांना जेरबंद करणे आता अवघड होत असल्याची कबुलीही वनाधिकाऱ्यांनी दिली.
( हेही वाचा: 15 जानेवारी आणि विराटचे ‘असे’ आहे ‘खास’ कनेक्शन )
वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी वाघांच्या वाढत्या हल्ल्यामागे त्यांचा अधिवास आणि मानवी हस्तक्षेपाबाबत मुद्दा मांडला. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात काय बदल होत आहेत, याचा अभ्यास केला जावा. या मागणीकडे त्यांनी लक्ष वेधले. वाघांकडून माणसांवर हल्ले वाढले असतील पण वाघांना नरभक्षक म्हणता येणार नाही, सततच्या घटनांमधील वाघांना हल्लेखोर वाघ म्हणता येईल, असे ते म्हणाले.