विद्याधर गोखले यांची संस्कृतनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा

विद्याधर गोखलेंच्या अनेक विलोभनीय, लोकप्रिय गुणांपैकी संस्कृतनिष्ठा व हिंदुत्वनिष्ठा हे दोन विशेष उल्लेखनीय गुण होते. स्वतः विद्याधर गोखले हे मराठी, उर्दू वगैरे भाषांप्रमाणे संस्कृत भाषेचे केवळ गाढे अभ्यासकच नव्हे तर महान क्रियाशील उपासकही होते. ज्या ज्या वेळी शासनाच्या अपरिपक्व धोरणामुळे संस्कृतविषयक गंभीर शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या, त्या त्या वेळी संस्कृतच्या व्यासपीठावरून व दैनिक लोकसत्तातील प्रभावी अग्रलेखांच्या माध्यमातून विद्याधरजींनी शासनाचे कर्णोत्पाटण व जनतेचे उद्बोधन केलेले आहे.

हिंदुत्वाचा मुलाधार व राष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रभावी साधन म्हणजे संस्कृत भाषा आहे, अशी विद्याधर गोखले यांची तत्त्वनिष्ठ वैचारिक धारणा होती. म्हणूनच सातारा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षीय भाषणात संस्कृत विषयक खास मार्गदर्शन होते. सुधाकरराव नाईक त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नागपूर येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता आणि तसा राज्यपालांचा अध्यादेशही निघाला होता. त्याबद्दल विद्याधर गोखले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुक्तकंठाने अभिनंदन केले होते. त्याचा अधिकृत ठरावही सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकमताने संमत झाला होता. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात संस्कृतचा उल्लेख ही गोष्ट जाणकारांच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय होती.

(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)

नवव्या लोकसभेत शिवसेनेचे खासदार म्हणून विद्याधर गोखले निवडून आले. संस्कृतमधून शपथ घेण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. संस्कृत हा मूलाधार असलेल्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने आपल्या खासदारांना संस्कृतमधून शपथ घेण्यास अनुमती द्यावी या आमच्या प्रयत्नास यश येत नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत शिवसेनेवर ब्राह्मण्याचा आरोप केल्याने संस्कृतमधून शपथ घेतल्यास तो ब्राह्मण्याचा आरोप सुदृढ होईल या कल्पनेने शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते संस्कृत शपथग्रहणास प्रतिकूल होते, पण मराठी शपथ ग्रहणास अनुकूल होते. अशा परिस्थितीत ‘तुम्ही संस्कृतमधून शपथ कशी घेणार?’ हा प्रश्न मी माझे जेष्ठ क्रियाशील हितचिंतक सन्मित्र अण्णांना (विद्याधर गोखले) विचारला. या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विद्याधर गोखले म्हणाले ‘मी परवानगीचा विचार करत बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत खासदार म्हणून मी संस्कृतमधूनच शपथ घेणार. कारण मी शिवसेनेतील ३७० वे कलम आहे!…’ माननीय बाळासाहेबांशी विचार विनिमय केला असता, ‘दोघांनी संस्कृत मधून व दोघांनी मराठीतून शपथ घ्यावी’ अशी बाळासाहेबांनी अनुमती दिली. पण प्रत्यक्षात विद्याधर गोखले, वामनराव महाडिक व मोरेश्वर सावे या शिवसेनेच्या चारपैकी तीन खासदारांनी संस्कृत मधून शपथ घेतली!

विद्याधर गोखले हे मूळचे विदर्भातील अमरावतीचे. विद्याधरांचे वडील कै. संभाजीराव हे तत्कालीन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन मध्यप्रांतातील (वऱ्हाड) काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील एक मान्यवर मंत्री होते. पण विद्याधरांचा छात्रदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आल्याने ते हिंदुत्वनिष्ठ झाले. विद्याधर गोखले यांनी आपली संघनिष्ठा व वैचारिक तत्वधिष्ठित अशी हिंदुत्वनिष्ठा शासकीय व अशासकीय लाभासाठी म्हणून कधीही लपवली नाही. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाटककार, साहित्यिक अशा विद्याधर गोखलेंचा उर्दू भाषेसंबंधीचा अभ्यास लक्षात घेऊन शासनाच्या उर्दू अकादमीवर सन्माननीय मार्गदर्शक सदस्य म्हणून नियुक्ती केली. विद्याधर गोखलेंची उर्दू अकादमीवरील सदस्य म्हणून झालेली नियुक्ती संघटनेच्या व हिंदुत्वशत्रूंच्या डोळ्यात खुपली नसती तरच नवल! विद्याधर गोखलेंविरुद्ध अनेक तक्रारी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे गेल्याचे समजताच विद्याधर गोखले आपणहून शंकरराव चव्हाण यांना भेटले. ‘मी संघनिष्ठ व हिंदुत्वनिष्ठ आहे ही गोष्ट जाहीर आहे. तेव्हा तुमच्या काँग्रेस पक्षाच्या व शासनाच्या धोरणाविरुद्ध माझी उर्दू अकादमीवर कशासाठी नियुक्ती करता? मी त्यागपत्र आणलेले आहे.’ असे विद्याधर गोखले यांनी स्पष्टीकरण केले असता मुख्यमंत्री शंकराव चव्हाण गोखलेंना म्हणाले ‘अकादमी सारख्या संस्थेवर ज्ञानोपासकांची नियुक्ती इष्ट असते. पक्षीय व वैचारिक मतभेद येथे गौण असतात. या भूमिकेतून तुमची उर्दू अकादमीवर मी माझ्या अधिकारात नियुक्ती केली आहे. संघनिष्ठ व हिंदुत्वनिष्ठ म्हणून तुमच्या विरुद्ध माझ्याकडे भरपूर तक्रारी आलेल्या आहेत हे सत्य आहे पण संघनिष्ठा व हिंदुनिष्ठा हे निकष विचारात घ्यावे लागले तर मुख्यमंत्री म्हणून मला ८०% मंत्रालय खाली करावे लागेल.’ अर्थात विद्याधरजींचा राजीनामा स्वीकारला गेला नाही!

दोन वर्षे होते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष

विद्याधर गोखले हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे १९९४-१९९५ आणि १९९५-१९९६ ही दोन वर्षे अध्यक्ष होते. विद्याधर गोखले यांनी हिंदुहृदयसम्राट तात्याराव सावरकर यांच्या अजरामर जीवनाची यशोगाथा सांगणारे ‘झंझावात’ हे पुस्तक लिहिले. मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या गोखले यांनी ४० वर्षे पत्रकारिता केली. ‘साक्षीदार’ आणि ‘अमृत झाले जहराचे’ ही दोन गद्य नाटके त्यांनी लिहिली, तर ‘सुवर्णतुला’, ‘मंदार माला’, ‘बावनखणी’ अशी १० संगीत नाटके लिहिली आहेत. १९७४साली त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. तर १९९३ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. ९व्या लोकसभेत गोखले खासदारही होते. त्यांनी विविध विषयावर ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

लेखक – श्री. धुं. कवीश्वर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here