सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘एकाच दिवशी एकाच वेळी’ संकल्पनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या दहा ठिकाणी सादर झालेल्या विविध कार्यक्रमांपैकी मुख्य कार्यक्रम दादर मुंबई येथील ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात सादर झाला.
१९६० च्या दशकात काहीशा मरगळलेल्या मराठी रंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा दमदार शुभारंभ श्रेष्ठ सतारवादक पंडित शंकर अभ्यंकर यांच्या उपस्थितीत साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात रंगशारदा प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनील कर्वे व पंडित शंकर अभ्यंकर यांनी गोखले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केली. आपल्या खुमासदार शैलीत विद्याधर गोखले यांच्या अष्टपैलू आणि हजरजबाबी व्यक्तिमत्वाचं दर्शन पंडित अभ्यंकर यांनी रसिकांना घडवलं. सुनील कर्वे यांनीही गोखले यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांनी आपल्या ओघवत्या आणि सहज सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत किस्से ऐकवत कार्यक्रमाचं निवेदन करत आपल्या वडिलांच्या आठवणींचा पट रसिकांसमोर उलगडला.
( हेही वाचा: धक्कादायक: 200 दशलक्ष ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला; ईमेल आयडी लीक )
कार्यक्रमाला मान्यवर आणि रसिकांचा भरघोस प्रतिसाद
या कार्यक्रमात गोखले यांच्या संगीत नाटकांतील वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी दिग्गज गायक कलाकार पंडित राम देशपांडे, पंडित सुरेश बापट, विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, ज्ञानेश पेंढारकर आणि मैत्रेयी रॉय दादरकर यांनी सादर केल्या. या सर्व कलाकारांनी मंदारमाला, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजिरी, पंडितराज जगन्नाथ या नाटकांतील रागदारी बंदिशी व उपशास्त्रीय गीते अत्यंत कसदार आणि भावपूर्णरित्या सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचा कळस म्हणजे मंदारमाला नाटकातील जुगलबंदी ‘बसंत की बहार आयी’. संवादिनीवर पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि तबल्यावर धनंजय पुराणिक यांची तितकीच दमदार साथ मिळाल्यामुळे कार्यक्रमाला जणू चार चांद लागले. अतिशय रंगतदार होत गेलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि रसिकांनी अतिशय मनापासून प्रतिसाद दिला.
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपूर्ण वर्षभर अनेक कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच नाट्यगीतरंग या यूट्यूब वाहिनीवर गोखले यांची नाटके, व्याख्याने, अग्रलेख यांचं अभिवाचन, त्यांच्या नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम यातून त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे दर्शन रसिकांना घडणारच आहे, असे शुभदा दादरकर यांनी सांगितले.