मुंबई महापालिकेनंतर आता पुणे महापालिकेवर प्रशासक!

122

मुंबई महापालिकेची मुदत येत्या आठ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या ७ मार्चनंतर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाईल, असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता पुणे महापालिकेवर प्रशासन नेमण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत.

१४ मार्चनंतर पुणे महापालिकेवर प्रशासक येणार

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च महिन्यात होऊन १३ मार्च पूर्वी नवी महापालिका अस्तित्वात येणे आवश्यक होते. पण कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. ही निवडणूक दोन महिने ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १४ मार्चनंतर पुणे महापालिकेवर प्रशासक येणार हे निश्चीत झाले आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या आवाजात होणार महागर्जना!)

आयुक्त विक्रम कुमार प्रशासकाच्या भूमिकेत

त्यामुळे तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. ही जबाबदारी १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत. याबाबत विक्रम कुमार यांनीही दुजोरा दिला असून, १५ मार्चपासून प्रशासक म्हणून काम करण्याचे आदेश मिळाले आहेत, असे कुमार यांनी सांगितले.

पंचायत समित्यांवर आणि जिल्हा परिषदेवरही प्रशासक

पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे विद्यमान सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ हा आता अवघा दहा तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अवघा वीस दिवस इतका उरला आहे. पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या १३ मार्चला तर, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या २० मार्चला संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर १३ मार्चपासून तर, जिल्हा परिषदेवर २० मार्चपासून प्रशासक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृत्ताला राज्याच्या ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी आपापल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तर, जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी हेच प्रशासक असणार आहेत. यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचा प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. याआधी प्रसाद यांनी विदर्भातील अकोला जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची अकोल्यातून पुणे जिल्हा परिषदेत बदली झाली. येथेही त्यांना पुन्हा प्रशासकाची भूमिका निभवावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.