स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुंड भावांपैकी एकाची पोलिसांनी भरदिवसा सर्वांसमोर धिंड काढून चांगलीच जिरवली आहे. कृष्णा पाटील असे या गुंडाचे नाव असून, त्याने आणि त्याचा भाऊ दत्ता पाटील या दोघांनी कुर्ला बैलबाजार, जरीमरी, संदेश नगर आणि घाटकोपर परिसरात खंडणी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, पॉक्सो यांसारखे गंभीर गुन्हे करुन स्थानिकांमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. या दोन्ही भावांच्या दहशतीमुळे त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची कुणाची देखील हिम्मत होत नव्हती.
२५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल
कृष्णा पाटील आणि दत्ता पाटील हे दोघे सख्ये भाऊ आहेत. कृष्णा हा लहान तर दत्ता मोठा भाऊ असून, दोघे कुर्ला बैल बाजार संदेश नगर परिसरात राहतात. अधिक काळ तर या दोघांनी तुरुंगातच काढला आहे. या दोघांविरुद्ध साकीनाका, घाटकोपर, कुर्ला आणि विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात २५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी सारखे गंभीर गुन्हे आहेत. हे दोघे परिसरातील दुकानदार, फेरीवाले यांना लक्ष करुन त्याच्याकडे खंडणी गोळा करत होते. खंडणी देण्यास नकार देणाऱ्यावर कृष्णा आणि दत्ता हल्ले करुन, त्यांच्या सामानाचे नुकसान करत होते. या दोघांना रोखण्यास कोणी पुढे आल्यास त्याच्यावर देखील हे दोघे तलवार, चॉपरने हल्ले करत असत.
(हेही वाचाः पोलिस चकमकीत दोन नक्षली ठार!)
पोलिसांना देत होता गुंगारा
घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरापूर्वी या दोघांनी एकावर हल्ला केला होता. त्यावेळी घाटकोपर पोलिसांनी दत्ताला अटक केली होती. कृष्णा मात्र पळून गेला होता. कृष्णा हा आपला ठावठिकाणा बदलत असल्यामुळे, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. महिन्याभरापूर्वी दत्ता हा जामिनावर बाहेर येताच, त्याने आणि कृष्णाने मार्च महिन्यात बैलबाजार येथे दारुसाठी एकाच्या मानेवर सूरा फिरवला होता. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात दत्ता उर्फ शेरू आणि कृष्णा पाटील उर्फ काळ्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच, मागील दोन महिन्यांपासून विनोबा भावे नगर पोलिस त्याच्या मागावर होती. मात्र दोघे आपला ठावठिकाणा बदलत होते. तसेच मोबाईल फोन मध्ये कार्ड न वापरता केवळ इंटरनेटच्या सहाय्याने व्हॉट्सअप कॉल करत असल्यामुळे, दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता.
दोघांच्या अटकेसाठी विशेष पथक
कृष्णा आणि दत्ता हे दोघे संदेश नगर परिसरात जाऊन-येऊन असायचे. मात्र, दोघांच्या दहशतीमुळे त्याची पोलिसांना खबर देण्याची हिम्मत कोणीच करत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आपले खबऱ्यांचे जाळे अधिक घट्ट केले. या दोघा भावांची दहशत संपवण्यासाठी अखेर विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पवार यांनी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले. या पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पवार, पोलिस निरीक्षक मारुती रढे, अजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी धुतराज, पोउनि पद्माकर पाटील, दीपक तायडे, पोलिस अंमलदार सिंगड, दीपक खरटमल, सुनील पाटील, पवार, संदीप पाटील, श्रीकांत उबाळे, अनिल शिंदे, पुजारी आणि राठोड यांच्या पथकाने खबऱ्यांचे जाळे मजबूत केले.
(हेही वाचाः माजी आमदार आनंदराव गेडामांच्या मुलाकडून कोविड योद्धा डॉक्टरला मारहाण!)
कृष्णा पाटीलची काढली धिंड
कुर्ला संदेश नगर या ठिकाणी कृष्णा येणार असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने साध्या वेशात कृष्णावर पाळत ठेवली. संदेश नगर मध्ये कृष्णा हा एका दुकानदाराकडे खंडणी वसुली करण्यासाठी येताच पाळतीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला जागीच अटक केली. त्याच अवस्थेत पोलिस पथकाने सर्वांसमोर त्याची धिंड काढत त्याला पोलिस ठाण्यात आणले. कृष्णाची धिंड काढून त्याच्या परिसरातील दहशतीवर चाप बसवला गेला आहे. कृष्णाच्या अटकेनंतर पोलिसांनी दत्ता याला देखील जरीमरी परिसातून अटक केली.