राज ठाकरेंचे नाव घेऊन खंडणी मागणारी ‘ती’ आहे कोण?

व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. ही महिला स्वतःला चित्रपट दिग्दर्शक असल्याचे सांगते.

मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना, मुंबईत गुन्हेगारीने देखील डोके वर काढायला सुरुवात केली आहे. खून, दरोडे, बलात्कार, खंडणी उकळणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह सोनसाखळी चोरी, घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

खंडणी मागण्याचा व्हिडिओ व्हायरल

राजकीय नेते, राजकीय पक्षांच्या नावाने देखील गुन्हे घडू लागले आहेत. असाच राजकीय पक्षाच्या नावाखाली मारहाण करुन खंडणी मागितल्याचा व्हिडिओ रविवारी समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनी तात्काळ दखल घेत खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिघांना या प्रकरणात अटक देखील करण्यात आली आहे. तरी व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. ही महिला आपण चित्रपट दिग्दर्शक असल्याचे सांगते. मात्र ती नक्की कोण, कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे याची खात्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचाः मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स डिलीट झाले तर कसे मिळवाल? वाचा)

काय आहे व्हायरल व्हिडिओ?

रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे असाच एक प्रकार समोर आला आहे. ‘मढ आयलँड’ येथील एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला एक महिला मारहाण करुन त्याला पाय धरायला सांगत आहे. या महिलेच्या अवतीभोवती आणखी तीन पुरुष उभे आहेत. “तुम्ही राज साहेबांना ओळखत नाही का? तुम्ही मुंबईत राहून तुम्हाला मराठी बोलता येत नाही का?, तुम्ही कोणासाठी काम करता, असे विचारुन ही महिला सुरक्षा रक्षकाला चोप देताना व्हिडिओमध्ये दिसत असून, तिच्यासोबत असणारे पुरुष देखील ‘माफी माग’, असे सांगताना दिसत आहेत.

तिघांना अटक

याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन त्याच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मालवणी पोलिसांनी या तक्रारीवरुन मिलन वर्मा, युवराज बोहाडे आणि सागर सोलंकर यांच्याविरुद्ध मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओतील महिलेला नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे. वर्मा हा चित्रपट दिग्दर्शक असल्याचा दावा करत असून, बोहाडे हे निर्माता असल्याचे सांगत आहेत. अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंचे नाव घेत असल्यामुळे ते नक्की पक्षाशी संबंधित आहेत का, हे पडताळून बघत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचाः आता दिवाळीचा केला ‘जश्न-ए-रिवाज’! ट्विटरवर युजर्सनी व्यक्त केला संताप)

बंगल्यांमध्ये बेकायदेशीर कामे

मुंबई पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड येथील ‘मढ आयर्लंड’ या ठिकाणी अनेक बंगले आहेत. हे बंगले मोठ्या प्रमाणात शूटिंगसाठी भाड्याने देण्यात येतात. या बंगल्यात शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, तसेच टीव्ही मालिकांचे शूटिंग तसेच अॅड फिल्मचे शुटिंग सुरू असते. या बंगल्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई देखील करण्यात येत असल्यामुळे हे स्पष्ट होते की, या बंगल्यांमध्ये बेकायदेशीर कामे देखील सुरू असतात. याचाच फायदा असामाजिक घटकांकडून घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here