आंध्रप्रदेशची नवी राजधानी असणार विशाखापट्टणम; मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची घोषणा

157

विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी केली आहे. जगन मोहन रेड्डी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दौऱ्यावर आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत उपस्थित लोकांना संबोधित करताना जगन मोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे. मी तुम्हा सर्वांना विशाखापट्टणमला येण्याचे निमंत्रण देतो. ही आमची राजधानी असेल आणि आपण स्वतः विशाखापट्टणमला स्थलांतरित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रेड्डी यांनी यासंदर्भातील व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. विशाखापट्टणम येथे ३-४ मार्च रोजी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी मी तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले. तसेच आंध्रप्रदेशात व्यवसाय करणे किती सोपे आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आमंत्रित करतो असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान! पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य?)

यापूर्वी, २०२०मध्ये जगन मोहन रेड्डी सरकारने राज्याच्या सर्व क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत कायदा केला होता. या कायद्यात आंध्रप्रदेशच्या ३ राजधान्यांची चर्चा होती. त्यानुसार, आंध्रप्रदेशची कार्यकारिणी म्हणजेच सरकार विशाखापट्टणममधून काम करेल आणि राज्याची विधानसभा अमरावतीमध्ये असेल आणि उच्च न्यायालय कर्नूलमध्ये असेल. दरम्यान आंध्रप्रदेशमधून २०१४ मध्ये तेलंगणा राज्य तयार करण्यात आले. त्यानंतर आंध्रप्रदेश पुनर्रचनेत अशी तरतूद करण्यात आली की, हैदराबाद ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही देशांची १० वर्षे राजधानी राहील. यानंतर आंध्रप्रदेशात राजधानीसाठी जागेचा शोध सुरू झाला. तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नवी राजधानी म्हणून अमरावतीची निवड केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५मध्ये अमरावतीच्या नवीन राजधानीच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. त्यानंतर तेथे वेगाने विकासकामे सुरू झाली.

परंतु, २०१९ मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाले. जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर अमरावतीतील विकासकामे थांबली होती. रेड्डी सरकारने नवीन समिती स्थापन केली. यानंतर त्यांनी तीन राजधान्यांच्या मॉडेलवर विचार करत असल्याचे संकेत दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.