राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली असताना, आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून आता विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जुलैपासून फणसळकर हे मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत.
संजय पांडे यांची निवृत्ती
मुंबईचे सध्याचे पोलिस आयुक्त संजय पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी आता विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असताना राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेल्या विवेक फणसळकर यांच्यासमोर फार मोठे आव्हान असणार आहे.
शिंदे यांच्या जवळचे फणसळकर?
विवेक फणसळकर हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात, फणसळकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी फणसळकर यांचे नाव मुंबईच्या आयुक्तपदासाठी निश्चित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
कोण आहेत फणसळकर?
- विवेक फणसळकर हे 1989च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
- यापूर्वी 31 जुलै 2018 रोजी त्यांना ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
- त्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मे 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
- वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी म्हणून विवेक फणसळकर यांची ओळख आहे.