डोंबिवलीच्या विवेकानंद सेवा मंडळाला ‘संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान पुरस्कार’!

कोविड काळात संपूर्ण महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये असलेल्या ६ हजार बंधू-भगिनींना अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा केल्याबद्दल आणि आदिवासी जंगलाच्या भागात राहणाऱ्या दोनशे महिलांना उद्योजक बनवल्याबद्दल डोंबिवलीच्या विवेकानंद सेवा मंडळाला ‘संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान पुरस्कार’ सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

विवेकानंद सेवा मंडळाचे कार्य

स्वामी विवेकानंदांच्या ‘सेवा’ या तत्त्वाने प्रेरित होऊन, डोंबिवली येथील ‘विवेकानंद सेवा मंडळ’ डोंबिवली, शहापूर आणि पालघर जिल्ह्यात गेली ३० वर्षे सेवा करत आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. भागवत म्हणाले की, “आजची तरुण पिढी सक्षम आहे आणि हे तरुण जेव्हा कुटुंबात संस्कार रुजवतील तेव्हाच हे तरुण भारताला यशाच्या नव्या उंचीवर नेतील.” कोरोना लॉकडाऊनमुळे विवेकानंद सेवा मंडळाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतील ६ हजार बंधू-भगिनींना अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जंगलात राहणाऱ्या आदिवासी भागात असलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी MUSE (मोबिलायझिंग अंडरप्रिव्हिलेज्ड सोशल एंटरप्रेन्युअर्स) उपक्रमांतर्गत, स्थानिक वनवासी महिलांना स्वयंरोजगार देऊन सक्षम करण्याचे कामही मंडळाकडून केले जात आहे. याशिवाय, आदिवासी जंगलातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, इच्छुक मुलांना उच्च शिक्षण, गावांमध्ये स्वयंरोजगार, वैद्यकीय सुविधा, सिंचन सुविधा अशा अनेक उपक्रम हे सेवा मंडळ राबवत आहे.

( हेही वाचा : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी का केली राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक? )

कृतज्ञता व्यक्त

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना विवेकानंद सेवेचे अध्यक्ष केतन बोंद्रे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या सेवा संस्थेकडून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या पुरस्कारामुळे आम्हाला अधिक प्रभावी सेवा कार्य करण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली असे, त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी कल्याण, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, कला, साहित्य, पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या निस्वार्थ योगदानाची प्रशंसा करण्यासाठी ‘संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान पुरस्कार’ हा २०१५ पासून दिला जातो.

विवेकानंद सेवा मंडळाविषयी…

महान योद्धा भिक्षू स्वामी विवेकानंद यांनी शिकवलेल्या सेवेच्या मार्गावर चालणारी ही एक अराजकीय युवा संघटना आहे. प्रामुख्याने तरुणांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील वंचितांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासासाठी हे मंडळ सेवा देत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here