मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, क्षेत्रीय निर्देशालय पुणे आणि केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या शिबिरात १२ राज्यांतील २८ विद्यापीठे सहभागी झाली आहेत. विविधेतून एकता जपणाऱ्या आपल्या देशातील परंपरा आणि संस्कृतीची ओळख राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना व्हावी हा यामागील उद्देश आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! १ जुलै पासून पगारवाढ होणार? )
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट
शिबिरासाठी १२ राज्यांतील २८ विद्यापीठांमधून २१० मुलांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा २७ मे रोजी सहावा दिवस होता. यातील २१० मुलांना मुंबई दर्शन करण्याची संधी मिळाली. यावेळी या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे भेट दिली.
यावेळी या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील, सावरकर IAS स्टडी सर्कलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विवेक पाटील यांनी मार्गदर्शन करत संपूर्ण स्मारक, सशस्त्र क्रांतिकारकांची यशोगाथा (म्युरल), वीर सावरकरांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना संपूर्ण दिवसभर मुंबई दर्शन करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती मिळाली. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीर स्मारकाला भेट देण्याचे आयोजित करण्यात आले होते असे राष्ट्रीय शिबिराच्या आयोजकांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community