तौक्ते वादळात सापडलेल्या गिधाडांना पाठवले पशुवैद्यकीय अधिकारी नसलेल्या नॅशनल पार्कमध्ये

प्राण्यांच्या संगोपनाच्या मुद्द्यावर टीकेला सामोरे जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात श्रीवर्धनहून चार गिधाडे कायमस्वरूपी संगोपनासाठी आली आहेत. मात्र उद्यानात पूर्णवेळ आणि निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने उद्यानातील प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न अजूनच गंभीर होत चालला आहे.

(हेही वाचा – संजय राऊतांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, गुरूवारी होणारी सुनावणी?)

का आली गिधाडे?

2021 साली तौक्ते चक्रीवादळाचा फटका अलिबाग, रोहा या रायगड जिल्ह्यातील विभागाना मोठ्या प्रमाणात फटका बसला. नारळ आणि सुरूच्या झाडावरील सहा गिधाडांची पिल्ले वादळाच्या प्रभावाने जमिनीवर आदळली. त्यांना रोहा वनविभागाने स्वतःच्या ताब्यात घेऊन नवे जीवनदान दिले. पिल्लांना कोंबडी, मटण खाऊ घातले. पिल्ले मोठी झाल्यानंतर रोहा वनविभागाने सहा गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला.

दोन गिधाडे उडाली

गिधाडांना जवळपास दीड वर्ष सांभाळल्यानंतर त्यांना पिंजाऱ्यातून मुक्त करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. मात्र केवळ दोन गिधाडे पिंजऱ्यातून उडाली. चार गिधाडे त्याच परिसरात राहिली.

गिधाडांची फौज मटण आणि कोंबडीच्या दुकानात

चार गिधाडे खाण्यासाठी श्रीवर्धन येथील कोंबडी आणि मटणाच्या दुकानात येऊ लागली. दीड वर्षांत त्यांना आयते अन्न खाण्याची सवय लागली होती. त्यामुळे चार गिधाडांमध्ये शिकारीची सवय तयार झाली नाही. ही गिधाडे त्यांना संगोपन केलेल्या कार्यालयीन परिसरातही येऊन बसू लागली. माणसाच्या सहवासातच मोठी झाल्याने त्यांना माणसापासून कोणताच धोका वाटत नव्हता. मटणविक्रेते गिधाड मटण पळवत असल्याची तक्रार करत होते. परिणामी रोहा वनविभागाने जुलै महिन्यात गिधाडांना बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याबाबत कंत्राटी पद्धत राबवण्याची विनंती

दीड वर्षांपासून उद्यानात पूर्णवेळ आणि रहिवासी पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्याअगोदर पाच वर्ष उद्यानात पूर्णवेळ पशु्वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला पशुसंवर्धन विभागाने मूळ विभागात पदोन्नती दिली. मात्र उद्यानाला पूर्णवेळ पशवैद्यकीय अधिकारी मिळेपर्यंत त्यांना उद्यानाचे पशु्वैद्यकीय अधिकारी म्हणून अतिरिक्त कामकाज दिले गेले. पशुसंवर्धन विभागात पदोन्नती मिळल्यानंतर उद्यानात दररोज येणे या अधिकाऱ्याला शक्य नाही. याच विभागातील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी उद्यानाच्या रिक्त पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी मोठ्या संख्येने अर्जही करत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने पद भरण्याची विनंती उद्यान प्रशासनाने अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम (वन्यजीव) डॉ. व्ही क्लेमेंट बेन यांना केल्याचे समजते. मात्र त्यांना संपर्क होऊ शकला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here