ताडोबातील ‘या’ प्रसिद्ध वाघाचा मृत्यू

80

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघ वाघडोह या वयोवृद्ध वाघाचा सोमवारी जंगलात मृतदेह आढळून आला.  ताडोबातील जवळपास सर्वच वाघांचा बाप असलेल्या वाघडोहने व्याघ्र प्रकल्पाला नवा उजाळा दिला. त्याच्या मृत्यूने ताडोबातील एका प्रसिद्ध वाघाचे पर्व संपल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी मिळाली ओळख

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विनीत अरोरा यांनी २०११ साली वाघडोहला पहिल्यांदा पाहिले. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाचे पहिल्यांदा वाघडोह या भागांत दर्शन झाले. तीन-चार वर्षांच्या या वाघाला वाघडोह या नावानेच ओळख मिळाली. आपल्या कार्यकाळात वाघडोहने ताडोबातील सर्वच भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ताडोबातील सर्वच बछड्यांचा तो पिता असल्याने वाघडोहला बिग डॅडी हे नाव मिळाले.

बछड्यांचा सांभाळ करणारा वाघडोह

ताडोबात येण्यापूर्वीच वाघडोहच्या एका डोळ्याला जखम आढळून आली होती. वाघीणीसोबत झालेल्या मारामारीत वाघडोहाच्या एका डोळ्याला जखम झाली होती. वाघडोहाच्या डोळ्यावरील जखमेमुळेच तो सहज ओळखला जायचा. आपली साथीदार माधुरीसह जन्मलेल्या बछड्यांना वाघडोह प्रेमाने सांभाळायचा. कित्येकदा माधुरी शिकारीला जायची अन् वाघडोह आपल्या बछड्यांना सांभाळायचा. वाघडोहाच्या या स्वभावाने वाघांमध्ये पिताही आपल्या बछड्यांची काळजी घेते, हे पहिल्यांदा वन्यजीव प्रेमींना दिसून आले. सुरुवातीला ताडोबात आल्यानंतर पर्यटकांची गाडी पाहून त्याला राग अनावर व्हायचा. मात्र हळूहळू त्याने पर्यटकांना आपलेसे केले. ताडोबात २०११ ते २०१७ सालापर्यंट भेट देणा-या कित्येक पर्यटकांच्या कॅमे-यात वाघडोहच्या हालचाली सहज कैद झाल्या.

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

वयोमानामुळे १७ वर्षांच्या वाघडोहला शिकार करणे अवघड होऊ लागले होते. काही दिवसांपासून वाघडोह सिनाळा येथे वास्तव्यास होता. या भागांत अजून दोन वाघीणीही राहतात. शनिवारी सिनाळ्यातील मेंढपाळाचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र या हल्ल्यात कोणता वाघ होता, याची माहिती वनविभागाकडून मिळालेली नाही. अखेर सोमवारी सकाळी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह वनाधिका-यांना आढळून आला.

(हेही वाचा- पुण्यातही ‘ज्ञानवापी?’; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा)

वाघांमध्ये १७ वर्षांपर्यंतचे वयोमान हे वार्धक्याचे समजले जाते. या वयोमानात कित्येकदा जंगलातील वाघाला बेशुद्द करुन उपचार दिले जातात. वाघाची तब्येत सुधारली तर पुन्हा जंगलात सोडले जाते. वाघडोह आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाही आजारी पडला नाही, त्याला बेशुद्ध करुन उपचार देण्याचीही वेळ आली नाही. शेवटपर्यंत त्याचे दातही शाबूत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.