सापांबद्दलच्या अज्ञानामुळे एका व्यक्तीने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना वर्धा येथून समोर आली आहे. धामण साप समजून मण्यार जातीच्या सापासोबत खेळणे एका व्यक्तीच्या अंगलट आले आहे. या सापाच्या दंशाने त्याचा मृत्यू झाला आहे. प्रशांत उर्फ बबलू काकडे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
अविवाहित असलेला बबलू काकडे पेंटिंगचे काम करायचा. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता त्याने एका घरातून या मण्यार जातीच्या सापाला पकडले होते. परंतु सापाबद्दल फारशी माहिती नसल्याने, हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करत बबलू काकडे संपूर्ण परिसरात फिरला. केवळ फिरलाच नाही तर त्याने मण्यारला हातात घेऊन खिशातही टाकण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी मोबाईलवर त्याचा व्हिडीओ बनवला. मण्यार सापाशी खेळतानाचा बबलू काकडेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
( हेही वाचा: कांदिवलीत चार तरुणांवर गोळीबार; एका तरुणाचा मृत्यू )
उपचारादरम्यान बबलू काकडेचा मृत्यू
साडेतीन फुटाचा मण्यार बबलूला दंशदेखील करत होता, पण काहीच होत नाही, असे तो लोकांना सांगत होता. अखेर रात्री आठ वाजता बबलूला उलटी झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. बबलूवर त्वरित उपचार व्हावेत म्हणून धडपड केली, मात्र रात्री 11:30 वाजताच्या सुमारास बबलूचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community