वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून चालकाचं नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली कार खाली कोसळली. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
भाजप आमदाराच्या मुलाचाही समावेश
सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचाही या अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना शोककळा पसरली आहे. अपघातातील फक्त एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, तर एक विद्यार्थी हा ओडिशाचा होता.
(हेही वाचा – राज्यात कृत्रिम ऑक्सिजन साठा तयार ठेवण्याची लगबग सुरु)
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.