बेलापूर ते एलिफंटादरम्यान चालणाऱ्या हायस्पीड वॉटर टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या वॉटर टॅक्सीच्या तिकीट दरात ३०१ रूपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. बेलापूर ते एलिफंटा या मार्गावर वॉटर टॅक्सीचे दर ८०० वरून आता ४९९ रूपयांवर आले आहेत. या कपातीमुळे सर्वसामान्य पर्यटकांना देखील आता या टॅक्सीतून समुद्र सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
(हेही वाचा – भाजपसाठी पॉझिटिव्ह बातमी! देवेंद्र फडणवीस Corona निगेटिव्ह)
…म्हणून घेतला तिकीट दर कमी करण्याचा निर्णय
काही महिन्यांपूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा मार्गावर ही वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. या सेवेला पर्यटकांना पसंती दिली आणि मोठा प्रतिसाद या सेवेला मिळत आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी, सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वॉटर टॅक्सीतून पर्यटक मोठ्या प्रमाणात एलिफंटाला जाताना दिसताय. मात्र हायस्पीड वॉटर टॅक्सीचे भाडे अधिक असल्याने सर्वसामान्य पर्यटकांना या सेवेपासून वंचित रहावे लागत होते. मात्र आता सागरी महामंडळाने घेतलेल्या पुढाकाराने बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता सर्वसामान्य प्रवाशांची संख्या वाढणार
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग मुंबईला प्रवास करतो. या सर्वांना सुरू झालेल्या वॉटर टॅक्सीचा फायदा आहे मात्र दर परवडणारे नसल्याने तसेच आवाक्याबाहेर असल्याने ते तिकीटदर कमी करावे, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या मागणीचा विचार करता तिकीट दर कमी करण्यात आले आहे. आता सर्वसामान्य प्रवासी संख्या वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.