परिचारिका रुग्णांच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेतात. मात्र आज परिचारिकांवर अन्याय होत आहे. जर त्यांचे मानसिक संतुलन योग्य नसेल, आवश्यक सोयीसुविधा, आर्थिक पाठबळ नसेल तर रुग्णसेवेवेवर परिणाम होईल, अशी भीती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. आझाद मैदानात गेले चार दिवस सुरु असलेल्या परिचारिकांच्या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा देत सरकारवर नाराजी व्यक्त केली. सरकारने परिचारिकांना संकटकाळात देवदूत बोलण्याचे केवळ नाटक करुन उपयोग नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
( हेही वाचा : रखडलेल्या एसआरए योजनेकरिता शासन मान्य विकासकांची यादी होणार तयार )
परिचारिकांच्या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत
कंत्राटीकरण, प्रशासकीय बदल्या, जोखीम आणि धुलाई भत्ता आदी मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आझाद मैदानात परिचारिकांची भेट घेतली. परिचारिकांच्या मागण्या रास्त आहेत. काही मागण्यांना बजेटची आवश्यकता नाही. मागण्यांमुळे सरकारवर आर्थिक भार येत नाही आहे. प्रशासकीय बदल्यांबाबतही सरकारकडून हालचाली होणे अपेक्षित आहे. जोखीम भत्त्याबाबत राज्य सरकार परिचारिकांना काहीही रक्कम देत नाही. केंद्र सरकारकडून जोखीम भत्ता दिला जातो मग राज्य सरकारनेही परिचारिकांना जोखीम भत्ता द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. धुलाईच्या भत्त्याबाबत १८०० रुपये केंद्र सरकार तर राज्य सरकार परिचारिकांना केवळ २०० रुपये देते. यामध्ये जवळपास १२०० रुपयांचा फरक आहे.
परिचारिकांच्या मागण्यांसदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच अर्थमंत्री यांच्याकडे आम्ही लेखी निवेदन देऊ. सरकारला परिचारिकांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देऊ, असे आश्वासनही दरेकर यांनी परिचारिकांना दिले. सरकारशी बैठक घेऊनही परिचारिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार झाला नाही तर आम्ही परिचारिकांच्या लढ्यात त्यांच्यासोबत आहोत, उद्या गरज पडली तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष परिचारिकांच्या पाठी उभी राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारने दुर्लक्ष केले
परिचारिकांच्या मागण्यांकडे माणुसकीच्या नात्याने पाहा, असे आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केले. संकटाच्या काळात परिचारिकांना हार, फुले, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मात्र, परिचारिकांच्या कौटुंबिक आणि जीवनमरणाच्या प्रश्नावेळी सरकारने दुर्लक्ष केले, या शब्दांत दरेकर यांनी संताप व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community