कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊण्डच्या नजीक वसलेल्या कन्नमवार नगरमधील नागरिकांना डम्पिंग ग्राऊण्डच्या दुर्गंधीत जगणे नकोसे झाले आहे. याविरोधात न्यायालयीन लढा सुरु असतानाही, दररोज मध्यरात्री दुर्गंधीयुक्त वातावरणात जगणे अशक्यप्राय होऊन बसल्याचे नागरिक सांगतात. दर आठवड्याला तीन ते चार क्षयरोग किंवा न्यूमोनियाचे नवे रुग्ण आढळत असल्याची माहिती कन्नमवार येथील गेट वेल दवाखान्याचे डॉ. हरिश्रचंद्र पांचाळ यांनी दिली आहे.
स्थानिकांचे आयुर्मान कमी होत आहे
कन्नमवार येथील जवळपास ६० टक्के स्थानिक आमच्या दवाखान्याला भेट देतात. महिन्याभरातून किमान तीन ते चार वेळा प्रत्येकाला सर्दी, श्वसनाचा आणि तापाचा त्रास होत राहतो. इथल्या दुर्गंधीने जीवनमान त्रस्त आहे. कन्नमवार-२ मधील नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात आहे. हा परिसर डम्पिंग ग्राऊण्डला लागूनच वसलेला आहे. या परिसरातील स्थानिकांची परिस्थिती फारच भयावह असल्याचे डॉ. पांचाळ सांगतात. लहानग्यांना, वृद्धांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. कोरोनामुळे अगोदरच फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर ब-यापैकी परिणाम झाला आहे. सततच्या दुर्गंधीयुक्त वातावरणात राहणा-या स्थानिकांचे वयोमान या डम्पिंग ग्राऊण्डमुळे कमी होत असल्याची, खंतही डॉ. पांचाळ यांनी व्यक्त केली.
( हेही वाचा: नाटक नाटकच असतं हो, तीन तास एन्जाॅय करायचं आणि घरी जायचं; सुप्रिया सुळेंचा टोला )
कोणत्याही सरकारवर विश्वास नाही
आम्ही डम्पिंग ग्राऊण्डच्या उभारणी अगोदरपासूनच कच-याचा डोंगर नागरी वस्तीच्या जवळ नको, म्हणून लढत आहोत. प्रत्येक सरकारच्या कार्यकाळात आमची व्यथा मांडली. आता कुणावरही विश्वास उरला नाही. न्यायालयीन लढ्यात संयमाची परीक्षा आहे, या शब्दांत कन्नमवार येथील जयंत दांडेकर यांनी आपले दुःख व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community