जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धती हवी – राज्यपाल

129

ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावतात. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

( हेही वाचा : अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरत्या निवासांत )

आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण, शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार अशा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहयाद्री अतिथीगृहात करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे पहिले आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलियाच्या कुलगुरु प्राध्यापिका सेलमा अलिक्स, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळया पॅथींचा समावेश आहे. पण आजच्या विद्यार्थ्यांना या पॅथी शिकताना रुग्णांबरोबर सिंपथी दाखवणे आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी आपल्या वेगवेगळया पॅथी चांगल्या समजू शकतील. भारतासह अन्य देशांनी वेगवेगळया क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आरोग्य, दळवणवळण, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारतासह सगळेच देश प्रगतीबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गौतम बुद्धांचे विचार आणि भगवान महावीर यांनी दिलेली शांततेची शिकवण भारतासह इतर देशालाही प्रेरित करत आहे. सध्याच्या शिक्षणात सुद्धा शांतता आणि एकात्मता यावर भर असणे आवश्यक आहे. भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे निश्चित केल्यानंतर हा दिवस १०८ देशांमध्ये साजरा केला जातो. हीच आपली एकात्मता आहे, असेही कोश्यारी म्हणाले.

भारतासमवेत करार करणे ही आनंदाची बाब

पश्चिम ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन म्हणाले की, कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. शिक्षणक्षेत्रासाठी सगळयात सुरक्षित अशी ओळख असणाऱ्या या राज्यात रोजगार आणि शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट सागर किनारे, स्वच्छ आणि सुरक्षित शहर, चांगला सूर्यप्रकाश आणि प्रदूषणविरहीत हवा याबरोबरच चांगली शैक्षणिक व्यवस्था यासाठी सुद्धा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ओळखले जाते. आजमितीस भारतातले १ लाखांहून अधिक विद्यार्थी या देशात शिकत आहेत. येणाऱ्या काळात पर्यटन, शिक्षण, कौशल्य विकाय या क्षेत्रातील बारकावे शिकण्यासाठी आमच्या राज्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात येतील असा विश्वास वाटतो. भारतासारख्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री म्हणून आल्यानंतर आपल्याच घरी आल्याचा भास होतो. आमच्या राज्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही हीच भावना असेल असा विश्वास टेम्पलमन यांनी व्यक्त केला.

आरोग्य कोशाचे प्रकाशन

आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशनही गुरुवारी करण्यात आले. या आरोग्य कोशात सुमारे ५५० पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून, विद्याशाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्यकोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरीता उपयुक्त असणार आहे. याच कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारातंर्गत शिक्षणाकरीता आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मूल्यानुसार संबंधित विषयांमधील तज्ञांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थी आणि कर्मचारी गतिशीलतेसाठी संधी वाढवणे. आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य मजबूत करणे, विद्यापीठ संसाधने आणि सुविधाच्या परस्पर विनिमयासाठी प्रक्रिया सुरु करणे, उच्च दाक्षिण संशोधन संदर्भात जागरूकता वाढविणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.