ब्रँडेड कुंकवासाठी मोडले लग्न

पालघर तालुक्यात ठरलेले लग्न क्षुल्लक कारणावरून मोडल्याने नवरा मुलाकडच्या लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

sudamहुंड्यासाठी लग्न मोडल्याचे ऐकले आहे, मात्र हलक्या दर्जाचे कुंकू लावले म्हणून लग्न मोडल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. अतिश्रीमंतीत वाढलेल्या नवऱ्या मुलाने सुपारीच्या कार्यक्रमात मुलीकडील मंडळींनी ब्रँडेड कुंकू वापरले नाही, त्यामुळे त्यांनी सरळ लग्नाला नकार दिला, लग्न मोडल्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या मुलीच्या वडिलांनी अखेर गुरुवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा आणि त्याच्या आई-वडील आणि काका यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत नवरा मुलगा त्याचे आई-वडील आणि काका यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नवऱ्या मुलाकडील लोकांचे सर्व आदरतिथ्य झाले, पण… 

भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुदाम पाटील हे सध्या वसई तालुक्यात राहण्यास आहे. त्याच्या मुलगा नीरज हा सिव्हिल इंजिनियर आहे. सुदाम पाटील यांच्या मुलासाठी महसूल विभागात असणारे मुलाचे काका कमलाकर पाटील यांनी वाडा तालुक्यातील एका सुसंस्कृत कुटुंबातील उच्चशिक्षित मुलीचे स्थळ आणले होते. सर्व काही बोलणी झाल्यानंतर लग्न जमवण्यात आले होते. दरम्यान टिळा (सुपारी) चा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी आयोजित करण्यात आला होता, ३० ते  ४० लोकांच्या उपस्थितीत टिळ्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. मुलीच्या वडिलांकडून मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचा आदर सत्कार करून सर्वांना ब्रँडेड कपडे भेट म्हणून दिले होते. जेवणाचा बेत आखण्यात आला होता. सर्वकाही व्यवस्थित पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली.

(हेही वाचा : अनुराग कश्यप, तापसीने ३५० कोटींचा कर बुडवल्याचा संशय  )

पोलिसांनी समजावूनही हट्ट सोडला नाही!  

मात्र मुलाच्या काकांनी मुलीच्या वडिलांशी बोलणे टाळले असता मुलीकडील मंडळींनी थेट मुलाची भेट घेतली असता त्याने चक्क आम्ही लग्न मोडत असून मला लग्न करायचे नाही, असे उत्तर देताच मुलीचे वडील मानसिक तणावाखाली आले. त्यांनी कारण विचारले असता त्यांनी कारण सांगण्यास टाळाटाळ केली. अखेर मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करताच पोलीस निरीक्षक दिलीप संखे यांनी मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन लग्न का मोडत आहे, याबाबत विचारणा करताच मुलाचे आणि आई-वडिलांचे उत्तर ऐकून पोलीस देखील अवाक झाले. मुलीच्या कुटुंबियांनी टिळ्याच्या कार्यक्रमात हलक्या दर्जाचे कुंकू वापरले त्यांनी ब्रँडेड कुंकू वापरले पाहिजे होते, त्यामुळे आम्ही लग्न मोडले असल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक संखे यांनी मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना समजवण्याच्या प्रयत्न केला, मात्र ही मंडळी समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर वाडा पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here