Ed Raid: ईडीने जप्त केलेल्या नोटांचे पुढे होते तरी काय?

ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय. जेव्हा ईडी विविध ठिकाणी छापेमारी करते तेव्हा करचोरी केलेला पैसा आणि इतर संपत्ती जप्त करते. सध्या ईडी अॅक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत असून ईडीने भ्रष्ट व्यापारी, अभिनेते, राजकारणी आणि नेते यांच्यावर छापे टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि बेकायदेशीर मालमत्ताही जप्त केली आहे. ईडीचे हे मोठ-मोठे छापे पाहता या जप्त केलेल्या रोख रकमेचे ईडी करते तरी काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच कधी ना कधी आला असेल. ही रक्कम ईडी कुठे ठेवते? आणि जप्त केलेल्या मालमत्तांचे होते तरी काय?

(हेही वाचा – 30 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर धावणार ‘वंदे भारत’, किती असणार भाडे?)

जेव्हा ईडी रोख, साहित्य किंवा मालमत्ता जप्त करते, तेव्हा त्याचे मूल्यांकन नंतर केले जाते. त्यानंतर जप्त केलेल्या मालाचा सविस्तर अहवाल किंवा पंचनामा अहवाल तयार करून तो फाईल केला जातो. छापेमारी दरम्यान, जर रोख रक्कम ईडीने जप्त केली तर बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची मोजणी केली जाते. विशिष्ट फॉर्मवर या नोटांचे नंबर आणि कोणत्या चलनातील या नोटा आहेत, याची नोंद केली जाते. त्यानंतर या नोटा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केल्या जातात.

जप्त केलेले पैसे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी, बँक किंवा सरकार वापरू शकत नाहीत. या नोटा जमा केल्यानंतर तपासादरम्यान ज्या व्यक्तीकडून या नोटा, संपत्ती जप्त करण्यात आली आहे, त्या व्यक्तीला पैशांचा स्त्रोत आणि त्याचा हिशोब विचारला जातो, त्याचा एक अहवाल तयार केला जातो. जर त्या व्यक्तीने रोख रकमेचा हिशेब दिला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना याची खात्री पटली की न्यायालयाच्या निरीक्षणाखाली आणि योग्य ती प्रक्रिया पार पाडून ती रक्कम संबंधित व्यक्तीच्या परत ताब्यात देण्यात येते. आरोपी दोषी ठरल्यास ही रोख रक्कम केंद्राची मालमत्ता बनते आणि आरोपीला न्यायालयाने निर्दोष सोडल्यास रोख रक्कम परत केली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here